स्वामी समर्थ महापर्वणी: स्वामी सेवेची १५० वर्ष, स्वामीसुतांची अखंडित परंपरा, कसा होतो उत्सव?

By देवेश फडके | Updated: February 28, 2025 11:24 IST2025-02-28T11:19:31+5:302025-02-28T11:24:41+5:30

Shree Swami Samarth Mahaparvani Mumbai: स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सर्वप्रथम स्वामीसुतांनी साजरा करण्यास सुरुवात केली. सुमारे १५० वर्षांहून अधिक काळ ही अखंडित परंपरा मुंबईत सुरू असल्याचे सांगितले जाते.

shree swami samarth mahaparvani know about when and how started in mumbai and 150 years of swami seva amazing tradition of swamisut maharaj | स्वामी समर्थ महापर्वणी: स्वामी सेवेची १५० वर्ष, स्वामीसुतांची अखंडित परंपरा, कसा होतो उत्सव?

स्वामी समर्थ महापर्वणी: स्वामी सेवेची १५० वर्ष, स्वामीसुतांची अखंडित परंपरा, कसा होतो उत्सव?

Shree Swami Samarth Mahaparvani Mumbai: दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा, नामस्मरण केले जाते. श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला, तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. स्वामींचे अनेक दैवी शिष्य झाले. स्वामींनी अनेकांवर दैवी कृपा केली. त्यातील एक नाव म्हणजे स्वामीसुत.

हरिभाऊ तावडे हे मुंबईत नोकरीला होते. त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्रीस्वामीकृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामीकृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले. श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की, तू कुळावर पाणी सोड व माझा सुत (पुत्र) हो. झालेल्या फायद्यातील ३०० रुपये त्यांनी सोबत आणले होते. त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने स्वामींनी सलग १४ दिवस वापरल्या. अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात, अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने त्या पादुका श्रीस्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या. स्वत: श्रीस्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन, तू तुझे घरदार, धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर!, अशी आज्ञा केली. त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्रीस्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला आणि कृपा केली.

खुद्द स्वामींनी कृपा केलेल्या स्वामीसुतांनी सुरू केली स्वामी समर्थ महापर्वणी दिव्य परंपरा

शनिवार, ०१ मार्च २०२५ रोजी 'श्रीस्वामी महापर्वणी' आहे. सन १८७० साली श्रीस्वामीसुतानी सर्वप्रथम श्री स्वामींचा प्रकट दिन साजरा केला. त्याअगोदर बरोबर एक महिना श्री स्वामी प्रकट दिन उत्सवाची स्वामीसुतांनी नांदी केली. फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा हा नांदी सोहळा म्हणजेच 'श्रीस्वामी महापर्वणी' होय. 
यादिवशी भल्या पहाटे श्रीस्वामीसुत महाराज श्रींच्या पादुकांचे षोडपचार पूजन करून समुद्रस्नानाकरिता गिरगांव चौपाटीकडे श्रींच्या पादुका पालखीचे प्रस्थान करीत. पालखी मिरवणुकीचा थाट राजाधिराज श्रीस्वामी महाराजांना साजेसा असत. मिरवणुकीची वाट सेवेकरी कुंचल्याने झाडत. इतर सेवेकरी लगबगीने पायघड्या पांघरत. पायघड्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढली जात. फुलांचा सडा, अत्तरांचा फवारे आणि श्रीस्वामी नामाचा जल्लोष. वातावरण कसे अगदी स्वामीमय होत.

जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे

या मिरवणुकीच्या पुढे उंचपुरी गुढी व श्रीस्वामी महाराजांचे भव्य निशाण मिरवले जात. यामागे तेजरूपी अश्व (पांढरा शुभ्र घोडा), पाच नद्यांच्या पाण्याचे जलकुंभ डोक्यावर घेऊन महिला, आरत्या घेऊन महिला मंडळ आणि श्रींचा सुबक सजवलेला छबिना. हा थाट, जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे. मिरवणुकीत श्रीस्वामीसुत महाराज अभंग गाण्यात मग्न असत. अशा थाटात हा लवाजमा चौपाटीवर सागरतीर्थाकडे जात. येथे स्वतः श्रीस्वामीसुत महाराज समस्त श्रीभक्तजनांसह छबिण्यातील पादुका घेऊन श्रीस्वामी नामाच्या जयघोषात सागरतीर्थात प्रवेश करीत. शास्त्रोक्त समुद्रस्नान सोहळा संपन्न होत. नंतर किनाऱ्यावर श्रींच्या पादुकांना ते चंदन लेपन करीत. गोड पोह्यांचा नैवेद्य अर्पण होत. मग आरती आणि पुन्हा श्रीस्वामीसुतांच्या अभंगात भक्तजनांचा जल्लोष. छबिण्याभोवती श्रीस्वामी नामाचा फेर धरला जात. श्रीस्वामीसुत महाराज तेव्हा प्रामुख्याने अगदी पुढे असत.

या सोहळ्याकडे पाहण्याऱ्यांचे डोळे दिपून जात

अशाच प्रसन्न रमणीय वातावरणात श्रींच्या पालखीचा लवाजमा त्याच थाटात मठाकडे येण्यास माघारी फिरत. या सोहळ्याकडे पाहण्याऱ्यांचे डोळे दिपून जात. एवढेच नाही तर रस्त्यावरील कुत्री, गायी व गुरे श्रींच्या मिरवणुकीत सामिल होत असा जुना उल्लेख काही ठिकाणी आढळतो, असे सांगितले जाते. त्यानंतर श्रीस्वामीसुत महाराज श्रींना नैवेद्य अर्पण करीत. भक्तजनांना स्वतः मोठ्या प्रेमाने महाप्रसाद वाढीत. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या ओंजळी प्रसादाने भरीत. या श्रीस्वामी महापर्वणीपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सोहळ्यास प्रारंभ होत. चैत्र शुद्ध द्वितीयेपर्यंत पूर्ण एक महिना कांदेवाडीच्या श्रीस्वामी मठात श्रीस्वामीसुत महाराज धुमधडाक्यात श्रींचा उत्सव साजरा करीत. या उत्सवास मुंबापुरीतील सर्व जाती धर्माचे लोग अगत्याने हजर राहत. आज सर्वत्र श्रीस्वामी महाराजांचा प्रकट दिन माहिती आहे. परंतु श्रीस्वामीसुतानी श्रींच्या या प्रकट दिन सोहळ्याची नांदी, श्रीस्वामी महापर्वणी उत्सव फारसा प्रचलित नाही.  श्री ठाकूरदास बुवा स्थापित श्रीस्वामी समर्थ मठ, ठाकूरद्वार नाका, गिरगांव, मुंबई येथे हा उत्सव साजरा होतो.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचीच महापर्वणी

श्रीस्वामीसुतांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी प्रस्थापित केलेला हा सोहळा त्याच थाटात साजरा होणे, ही मायमाऊली श्रीस्वामी महाराजांचीच कृपा असल्याचे म्हटले जाते. फाल्गुन शुद्ध द्वितीयेस साजरी होणारी श्रीस्वामी महापर्वणी होते. या उत्सवास पहाटे साडेचार वाजता प्रारंभ होतो. श्रीस्वामी महाराजांचे षोडपोचार पूजन व नंतर पालखी मिरवणुकीचे सागरतीर्थाकडे प्रस्थान. भक्तगण आदल्या रात्रीपासूनच मुक्कामास येतात. आदल्या रात्री महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था केली असते. महिला सेवेकऱ्यांकरिता स्वतंत्र सोय केली जाते. श्रीस्वामी महापर्वणीस प्रत्यक्ष श्रीस्वामीसुतानीच आपल्याला निमंत्रण दिले आहे. ते म्हणतात की,

याहो सर्व तुम्ही, होऊनि सावचित्त। नाचू आनंदात, एकमेळी।।
स्वामीसुत म्हणे उत्साहासि यावे। सर्व तुम्ही भावे, समर्थांच्या।।

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

Web Title: shree swami samarth mahaparvani know about when and how started in mumbai and 150 years of swami seva amazing tradition of swamisut maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.