Shravan Maas 2025: उत्तर भारतात श्रावण मास सुरू झाला आहे. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे पौर्णिमेनंतर महिना सुरू करण्याची प्राचीन परंपरा आहे. तर, महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांतील पंचांग पद्धतीप्रमाणे अमावास्येला महिना होण्याची परंपरा आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेनंतर उत्तर भारतात श्रावण मासाची सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये आषाढ अमावास्येनंतर श्रावण मासाची सुरुवात होईल. महाराष्ट्रात यंदा श्रावण मास कधी सुरू होणार? यंदा श्रावणी सोमवार किती असणार? जाणून घेऊया...
देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार, पालन यांची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते, असे मानले जाते. त्यामुळे या काळात महादेवांची उपासना, नामस्मरण करण्यावर भर दिला जातो, असे म्हटले जाते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो.
व्रतांचा राजा अन् व्रते-सण-उत्सवांची रेलचेल
श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. पृथ्वीने नवीन गालीचा ओढण्याचा काळ म्हणजे श्रावण. नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते. श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकांतील नाते संबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी एक भावनिक; पण विशिष्ट नियमात जगणारी अमृत महिरप आहे ती. आषाढ अमावास्येनंतर श्रावणास सुरुवात होते.
यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार?
श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. यंदा शुक्रवार, २५ जुलै २०२५ पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होत असून, शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत श्रावण महिना असेल. श्रावण महिन्यात २८ जुलै रोजी विनायक चतुर्थी, २९ जुलै रोजी नागपंचमी, ५ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकदशी, ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, १२ ऑगस्ट अंगारक संकष्ट चतुर्थी, १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती, १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाळा, दहिहंडी, १९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे.
यंदा श्रावणी सोमवार किती आणि कधी?
- पहिला श्रावणी सोमवार: २८ जुलै २०२५ - शिवामूठ: तांदूळ
- दुसरा श्रावणी सोमवार: ०४ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: तीळ
- तिसरा श्रावणी सोमवार: ११ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: मूग
- चौथा श्रावणी सोमवार: १८ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: जव