Shravan Amavasya 2023:पिठोरी अमावस्येला गावातच नाही तर शहरात राहूनही बैलांची पूजा का करायची?वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:03 PM2023-09-12T12:03:39+5:302023-09-12T12:03:58+5:30

Pithori Amavasya 2023: १४ सप्टेंबर रोजी बैल पोळा आहे, हा केवळ ग्रामीण भारताचा सण नसून शहरी भागात राहून कृतज्ञतेने तो साजरा केला पाहिजे. 

Shravan Amavasya 2023: Why worship bulls not only in villages but also in cities on Pithori Amavasya? Read! | Shravan Amavasya 2023:पिठोरी अमावस्येला गावातच नाही तर शहरात राहूनही बैलांची पूजा का करायची?वाचा!

Shravan Amavasya 2023:पिठोरी अमावस्येला गावातच नाही तर शहरात राहूनही बैलांची पूजा का करायची?वाचा!

googlenewsNext

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

आपला देश ऋषीप्रधान होता, आता तो कृषीप्रधान झाला आहे. हा खेड्यांचा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा देश. निसर्गसंपत्तीने भरलेला आणि भारलेला. संस्कृतीने नटलेला, ग्रामीण लोककलांनी नटलेला. इथे प्रत्येक गोष्टीचे अप्रूप, कौतुक आणि कृतज्ञता. शेतकऱ्यांच्या जीवाला जीव देणारा आवडता प्राणी म्हणजे त्याचे बैल-राजा आणि सर्जा! रात्रंदिवस त्याच्याबरोबर राब-राब राबणारा. म्हणून तर संध्याकाळी गोठ्यात दावणीला बांधल्यावर या राजाच्या आणि सर्जाच्या पाठीवर, मानेवर शेतकरी प्रेमाने आणि कौतुकाने हात फिरवतो. बैलही प्रेमाने भारावून थरथरतात. त्यांच्याशी तो मुकसंवाद साधतो. तोच खरा प्राणिमित्र. हे बैल म्हणजे त्याचे जीव की प्राण. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येते. वर्षभर बैलाशी क्रूरतेने वागल्याचा पश्चात्ताप होतो. म्हणून बैलाला या दिवशी आराम दिला जातो.

याच कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आज बैलांना काहीही काम द्यायचे नाही. ही त्यांची हक्काची सुटी. अगदी सकाळी उठून त्यांना नदीवर नेऊन, साबणाने स्वच्छ आघोळ घातली जाते. मग त्याच्या पाठीवर रंगाचे हाताचे ठसे, शिंगांना फुगे, बाशिंगे, बेगडी कागदी पट्ट्या, रिबीनी बांधल्या जातात. गळ्यात घुंगरु, घंटा, मणी-माळा, कवड्या, गोफ, अंगावर  रंगीबेरंगी कापडांची आरसे लावलेली झूल, गोंडे, रंगीत कासरे अशी सजावट होते. त्यानंतर धूप, दीप लावून पूजा करतात. यावेळी पायावर दूध, पाणी घालून, आरती ओवाळून त्यांना पुरणपोळ्यांचा प्रसाद दिला जातो. शिवाय बाजरी-घुगऱ्या, कडबा, चारा, हिरवे गवत, सरकी, भिजवलेले आंबोळ, अनेक धान्यांची केलेली खिचडी, कोंड्याचे मुटके इ. देतात. मग पळण्याची स्पर्धा, बैलांची मिरवणूक, याला बेंदूर (पोळा) म्हणतात. काही ठिाकणी पळवत नेत असताना धष्ट-पुष्ट बैलांकडून उंच उडी मारून तोरण तोडण्याची रीत आहे. ती पाहण्यासारखी असते. तोरण तोडणाऱ्या  बैलाला बक्षीस मिळते. त्याची वाजत-गाजत मिरवणूक निघते.

आपल्याला उपयोगी पडणाऱ्याच्या उपकाराची परतफेड म्हणून पूजा करणे याला हिंदू संस्कृती आणि संस्कार म्हणतात. पौर्णिमेला किंवा मूळ नक्षत्र असेल, त्या दिवशी हा उत्सव असतो. हल्ली ट्रॅक्टरमुळे किंवा तत्सम यांत्रिक अवजारांमुळे बैल कमी झाले असले, तरी पूजा ही सुरूच आहे.

पावसाळ्यात जरा विसावा मिळतो. म्हणून हा सण, सर्व कुटुंबासाठी झटणाऱ्या बैलासाठी त्या दिवशी सेवेचा आनंद घेतला जातो. तो शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक महत्त्वाचा घटकच. बैलासाठी चाळ, कडे, वेसण, कासरे, घंटा, घुंगरू, रंग, बाशिंग, हुरमुस, तेल, औषध इ. महाग असली, तरी थोड्या प्रमाणात खरेदी करतातच. बैलाच्या मानेवर, वशिंडावर तेलपाणी करून खांदे उतरवले जातात. कुंभार, मातीचे रंगीबेरंगी सुंदर बैल करून पुजेसाठी विकतात. बैलाला पूर्ण सजवून गावाबाहेर मारुती मंदिरापाशी जमतात. गावच्या पाटलाचे आशीर्वाद घेऊन मिरवणुकीने घरी आल्यावर घरधणीन औक्षण करते. या सणात अनेक व्यावसायिकांचा सहभाग असतो. सगळ्यांच्या हाताला काम मिळते. सर्वांचा हातभार लावून एकजूट होते. त्याच दिवशी त्यांच्या सहकार्याची विनिमय पद्धतीने पैसा-धान्य देऊन परतफेड केली जाते. पूर्वी ही सुंदर सोय होती. आता मात्र हे सर्वजण आपापली पारंपरिक कला, व्यवसाय केवळ लाजेखातर सोडून इतस्तत: फिरत आहेत. धड हे नाही आणि तेही नाही. विज्ञानाच्या अतिरेकामुळे अंगभूत व्यवसायाला, कलेला आपण पारखे होत चाललेलो आहोत. तसे होऊ न देता, चला, पुन्हा आपण संस्कृतीशी संधान साधूया आणि राजा-सर्जाच्या पूजेच्या तयारीला लागूया.

Web Title: Shravan Amavasya 2023: Why worship bulls not only in villages but also in cities on Pithori Amavasya? Read!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.