>> योगेश काटे, नांदेड
हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याचे नाव श्रावण(Shravan 2025) पडले आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूंची वतवैकल्ये व सण सर्वाधिक असल्याने चातुर्मासातील या महिन्याला सर्वांत जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते. सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्टयपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची तर गुरूवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुकवारी गौरीची पूजा करतात, सवाष्णीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध-फुटाणे देऊन हळद-कुंकू लावतात. शनिवारी शनी, मारूती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा (आदित्यपूजन ) करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवितात.
श्रावण महिन्यात अनेक सण असतात. उदा., शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करून त्याला दूध देतात. पौर्णिमेला समुद्रकिनारी वरूणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरून नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे, तर या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन वा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुताची पोवती पण हातात बांधण्याची प्रथा असल्याने पोवती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असल्यास उपाकर्म करून पुरूष नवीन यज्ञोपवीत ( जानवे ) धारण करतात. या विधीला श्रावणी म्हणतात. उत्तर भारतात पौर्णिमेला राधाकृष्णाला झोक्यावर बसवून झोके देतात आणि त्यांची गीते गातात. श्रावण वद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म झाल्याने तिला कृष्णाष्टमी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्णजन्मोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात याच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा केला जातो. श्रावणातील अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. कारण या दिवशी संततिप्राप्तीसाठी पिठोरी वत केले जाते. काही भागांत या दिवशी बैलपोळ्याचा सणही साजरा केला जातो.
संपत शुक्रवार वा जेष्ठा देवी पुजन
श्रावण मासाची सुरुवात श्रावणी शुक्रवाराने होत आहे. पहिला संपत शुक्रवार आहे. मराठवाड्यात या दिवशी ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले म्हणतात तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी जिवतीची पूजा केली असे म्हणतात. पण मराठवाड्यात मुखवटा बसवुन प्रत्येकाच्या घरच्या कुळधर्माप्रमाणे पुजा केली जाते. कोणाकडे एकाच शुक्रवारी तर जेवढे संपत शुक्रवार येतील तेवढ्या शुक्रवारी पुरणावरणाचा नैवद्य व सवाष्ण जेवू घालतात. महाराष्ट्र.तेलंगाणा, तसेच कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने संपत शुक्रवारचा कुळाचार केला जातो. तेलंगाणात, कर्नाटक मध्ये वरदलक्ष्मी म्हणून व्रत केले जाते, श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी श्री महालक्ष्मी चा मुखवटा स्थापन करता व कुंकुमार्चन करतात. तेलंगाणात देवीस पायस तसेच कर्नाटकात हयग्रीवाचा नैवद्य दाखवतात. सर्व सवाष्णीस हळीद कुंकाला बोलवतात. पुजा अगदी आपल्या येथे भाद्रपदातील शुक्ल पक्षातील महालक्ष्मी पूजन आपण करतो तशीचअसते. आपल्या कडे प.महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश व मराठवाड्यात वेगवेगळ्या पध्दतीने हा कुळाचार केला जातो. मराठवाड्यात खास करुन ब्राम्हण समाजात हा कुळाचार करतात.
या दिवशी घरातील स्त्रिया उपवास करतात. सकाळी देवीचा मुखवटा स्थापन करतात, तसेच आघाडा, केना, दुर्वा, दुध व साखरेचा तसेच गुळ फुटाण्याचा नैवद्य दाखवला जातो. पूजा होते. मग सोवळ्यात पुरणावरणाचा स्वयंपाक होतो. संध्याकाळी महाआरती होते. सवाष्ण व ब्राम्हणास जेवू घातले जाते. हा कुळाचार जेवढे शुक्रवार येतील तेवढ्या शुक्रवारी याच पध्दतीने केला जातो. या दिवशी विशेष म्हणजे आपली आई जगत् जननी जगदंबेस आपल्या मुलांच्या दीर्घ व कीर्तीमान आयुष्यासाठी प्रार्थना करते तसेच आपल्या डोक्यावर अक्षदा टाकते. पूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हा कुलाचार होतो. संध्याकाळी सवाष्णीस हळदी कुंकावाचे आमंत्रण देवून ओटी भरली जाते. प्रत्येक शुक्रवारी नाही जमले तर पहिल्या नाही तर शेवटच्या शुक्रवारी आपल्या घरी हा कुलाचार करावा. सवाष्णीस बोलवुन घरीच स्वयंपाक केल्यास मानसिक समाधान मिळते.
श्रावण शुक्रवार पूजा विधी : >> श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. श्रावण महीन्याच्या प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे द्यावेत. प्रत्येक शुक्रवारी पुरण घालावे तसेच आपल्या कुलाचारप्रमाणे पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी. श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते.
>> जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हार्याजवळ भिंतीवर लावावा. त्याची पुजा आठवड्यातून चार दिवस करावी.
>> श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी. फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद्-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करावी.
>> पुरणाचे ५ / ७ / ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध-साखरेचा व गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.