हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (उत्तरार्ध)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 2, 2020 03:00 PM2020-11-02T15:00:42+5:302020-11-02T15:01:13+5:30

देवाचा शोध घेत बसलात, तर आयुष्य संपून जाईल. त्यापेक्षा तुमच्या सभोवताली वावरणाऱ्या प्रत्येक जीवात पांडुरंग शोधा. त्याच्याशी प्रेमळ संवाद साधा, बोला, चर्चा करा, चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करा. त्यामुळे कोणालाही एकटेपणा जाणवणार नाही आणि आयुष्य सुसह्य होईल. 

sharing of good things is important! (Second half) | हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (उत्तरार्ध)

हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (उत्तरार्ध)

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ

लेखाच्या पूर्वार्धात आपण कान नसलेल्या राजाची गोष्ट वाचली. एका मुलाने ती गोष्ट मनात न ठेवता झाडाला सांगून टाकली आणि बूमरँग होऊन ती परत राजाकडे आली. याचाच अर्थ सुख, दु:खं, उद्विग्न, चिंता या गोष्टी आपण मनात फार काळ साठवून ठेवू शकत नाही. एक तर त्या सोडून दिल्या पाहिजेत किंवा कोणाशीतरी त्यावर बोलले पाहिजे. फुलांचे निर्माल्य जमा करून ठेवले, तर त्याला जसा कुबट वास येतो, तशी विचारांना दुर्गंधी येण्याआशी त्याचा निचरा झाला पाहिजे. शेअरिंगचे हेच महत्त्व समजावून सांगत आहेत, नामदेव महाराज-

दुर्लभ नरदेह झाला तुम्हा आम्हा, येथे साधू प्रेमा राघोबाचा,
अवघे हातोहाती तरो भवसिंधु, आवडी गोविंदु गाऊ किती,
हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे
एकमेका करू सदा समाधान, नामी अनुसंधान तुटो नेदू
घेऊ सर्वभावे रामनाम दीक्षा, विश्वासे सकळिका हेचि सांगो,
नामा म्हणे शरण रिघो पंढरीनाथा, नुपेक्षि सर्वथा दिनबंधु।।

संत नामदेवांचे शेअरिंग आध्यात्मिक पातळीचे होते. त्यांच्याशी तर पांडुरंग बोलायचे, त्यांच्या हातून जेवायचे, त्यांच्याबरोबर नाचायचे. म्हणजे, त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खाचा वाटाड्या पांडुरंग असे. मात्र, आपले एवढे भाग्य कुठे? मग आपण कोणाशी अशी हितगुज करू शकतो? तर नामदेव महाराज सांगतात, देवाचा शोध घेत बसलात, तर आयुष्य संपून जाईल. त्यापेक्षा तुमच्या सभोवताली वावरणाऱ्या प्रत्येक जीवात पांडुरंग शोधा. त्याच्याशी प्रेमळ संवाद साधा, बोला, चर्चा करा, चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करा. त्यामुळे कोणालाही एकटेपणा जाणवणार नाही आणि आयुष्य सुसह्य होईल. 

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (पूर्वार्ध)

आज नैराश्याचे सावट वाढत आहे, मानसोपचार तज्ज्ञांची गरज वाढत आहे, मनोविकार कारोनापेक्षा भयंकर परिणाम करत आहे, हे सर्व कशामुळे? वेळोवेळी शेअरिंग न झाल्यामुळे. तंत्रज्ञानामुळे एका फोन कॉलवर विंâवा एका मेसेजवर व्यक्ती उपलब्ध असूनही मनातील अंतर एवढे वाढले आहे, की संवादाची साधने असूनही लोक अबोल होत आहेत. पूर्वीसारखा, पती-पत्नी, पिता-पुत्र, आई-मुलगी, बहिण-भाऊ, आजी-नातू, आजोबा- नात, मित्र-मैत्रिणी यांच्यातला मनमोकळा संवाद हरवला आहे. लोक कामापुरते जमतात, काम उरकले की दूर होतात. शब्द, स्पर्श, भावना ही भूक संवादातून भागत असते. `पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा' असे सांगणारे आश्वासक शब्द लागतात.

संत नामदेव म्हणतात, 'एकमेकांच्या मदतीने हा संसाररूपी समुद्र आपण तरुन जाऊ. त्यासाठी परस्परांना हिताच्या गोष्टी सांगू. म्हणजे आपली दु:खं, मोह, अडचणी या सगळ्याच गोष्टींचे निराकरण होईल. 

संतांनी हे विचार सांगण्याआधी स्वत: ही अनुभूती घेतली आहे. मगच लोकहिताची अमृतवाणी अभंगरूपाने सांगितली. `बुडती हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा आम्हालागी' असे तुकोबाराय म्हणतात. तेही हितगुजाच्या गोष्टींचे शेअरिंगच आहे ना?

एखादी गोष्ट, नाते, प्रसंग विकोपाला जाण्याआधी कोणाशीतरी ते बोलून तर पहा. कोणीच नसेल, तर निसर्गाशी, स्वत:शी नाहीतर भगवंताशी हितगुज करा. मार्ग नक्की सापडेल. 'एकमेका करू सदा सावधान' असे नामदेव महाराज म्हणतात, ते यासाठीच! चला, तर चांगल्या गोष्टींचे `शेअरिंग' करूया आणि आपले व इतरांचे आयुष्य आनंदात घालवुया.

हेही वाचा : अपयशाची कारणे देण्यापेक्षा, अपयाशाची कारणे शोधा! - रतन टाटा!

Web Title: sharing of good things is important! (Second half)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.