>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
वर्तमानकाळात जगायला शिकवणारा शनी आहे. संसाराची जबाबदारीने स्वीकार करून पुढे चालत राहणे हा शनीचा विचार आहे. भोगा आणि मुक्त व्हा हा मानवाला त्याचा संदेश आहे. जीवनात जे जे म्हणून अटळ आहे त्याच्याशी शनीचा संबंध जोडला जातो . जन्म जन्मांतरीच्या प्रवासात शाप , वरदान आणि शपथ ह्या गोष्टींचा हिशोब ठेवणारा शनी आहे. शनीचे वडील म्हणजे रवी ,शनी सूर्यपुत्र आहे. रवी हा आत्म्याचा कारक असून शनी आत्मनिरीक्षण करतो. एकलकोंडेपणा हे शनीचे वैशिष्टय आहे. शनीच्या अमलाखालील व्यक्ती मितभाषी असतात, वायफळ बडबड करणार नाहीत. बुध चंद्र शुक्राचा माणूस गप्पा मारेल. त्रासाचे अंतिम टोक शनी देतो तसेच ऐश्वर्याची खैरात करणारही शनीच आहे . साडेसातीत शनी माणसाला जागेवर आणतो, नव्हे त्याची लायकी दाखवून देतो . कामापुरते वापर करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवतो .
चंद्र म्हणजे मन आहे. त्या मनाला जगाचा पूर्ण अनुभव देऊन सत्याची दुनिया दाखवणारा शनी आहे. चंद्र म्हणजे माया आणि शनीला मायेचा तिटकारा आहे आणि म्हणून तो चंद्राला साडेसाती लावतो. कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करावे हे शनीचे सूत्र आहे. चिकाटी संयम चिवटपणा चिकित्सा प्रगल्भता शनीकडे आहे आणि प्रत्येक गोष्ट का आणि कशी ते शनीच आपल्याला दाखवत असतो . शनी हा थंडपणाचा ग्रह आहे . गुरूसारखा हा ज्ञानी नसून तत्वनिष्ठ आहे.
साडेसातीला सगळेच घाबरतात . साडेसाती म्हणजे चंद्राचा शनीकडून झालेला अस्त आहे . साडेसातीत मनाचा अस्त होतो, बुद्धीचा पराभव होतो आणि अहंकाराचा नाश होतो . संपूर्ण मन ढवळून टाकणारा शनी साडेसातीत परीक्षा घेतोच. साडेसातीत आपण आपले कर्म कसे करतो ह्यावर बरेच काही अवलंबून असते. साडेसातीत माणूस अक्षरशः नव्याने घडताना दिसतो..साडेसातीत सद्विचार करून नितीमत्तेने चांगले आचरण केले तर नक्कीच भरभराट होते आणि चुकीचे अनीतीने घेतलेले निर्णय अधोगतीस कारणीभूत ठरतात , माणूस रसातळाला जातो जे नक्की.
आज आळस केला तर उद्याचा दिवस शनी तुम्हाला दैन्य देणारच. दैन्य आणि आळस ह्यावर शनीचा अंमल आहे. त्याच्याकडे आपला सगळा लेखाजोखा असतोच. आयुष्यात अनेक मोहाचे क्षण समोर येतात त्या क्षणांच्या मोहात न पडता राजमार्गाने आयुष्य व्यतीत करणे ज्याला जमते तो शनी महाराजांच्या कृपेचा धनी ठरतो. आपण ह्या प्रलोभनांना फसतो का ह्याचे निरीक्षण दूर उभे राहून शनी महाराज करत असतात आणि आपल्या प्रत्येक कर्माचा हिशीब ते ठेवत असतात .जाणते आणि अजाणतेपणी केलेल्या कर्माचा हिशोब न चुकता करणारा असा हा शनी आहे. आपल्या हातातील मधले बोट हे शनीचे आहे आणि ते सर्वात उंच आहे. म्हणजे आपली कर्मे कशी असायला हवीत हे आपल्या हातानीही आपल्याला सूचित केले आहे. म्हणजेच कर्म हे सगळ्यात महत्वाचे आहे हेच तर सूचित करायचे असते ह्याला .
पत्रिकेत ६, ८, १० आणि १२ ह्या स्थानाचे कारकत्व शनीकडे आहे. षष्ठ हे दशमाचे भाग्य आहे .म्हणजेच कर्माचे भाग्य म्हणून षष्ठ स्थानाकडे पहिले जाते . कर्माची सुरवात इथेच आहे. शत्रू इथेच निर्माण होतात पण इथेच आपल्या संयमाची कसोटी लागते . कामगारांवर आपली प्रगती असते, घरातील बाई एक दिवस आली नाही तर ढीगभर कामाचा डोंगर आपल्यावर पडतो आणि तिचे महत्व समजते.
आपल्या हाताखालच्या लोकांना खुश ठेवाल तर शनी खुश राहणार आहे, कारण चतुर्थ श्रेणी शनीच्या खाली येते. षष्ठ स्थान हे रोगाचे स्थान आहे . मनुष्याला आजार होतो याचाच अर्थ त्याचे चुकीचे कर्म त्याच्यासमोर आजाराच्या रुपात उभे राहते. आजार झाला तर त्या यातना ज्याच्या त्यालाच भोगाव्या लागतात . त्यात कुणीही वाटेकरी होऊ शकत नाही. अष्टम स्थानाचा कारक शनी आहे आणि मृत्यूचा कारकही शनीच आहे. अध्यात्माचा कारकही शनीच आहे. मोक्ष त्रिकोणातील मध्य म्हणजे अष्टम स्थान आहे. आसक्तीचा नाश शिकवणारे हे स्थान आहे. सहज मिळालेला , चुकीच्या मार्गाने घेतलेला , भ्रष्टाचार करून घेतलेला पैसा ,वाम मार्गाने मिळवलेला पैसा , लाच लुचपत इथे येते . कमी श्रमात कष्टात मिळालेल्या पैशाचे धिंडवडे काढून त्याचा व्यय करण्याचे काम शनीच करतो .
दुसऱ्याला त्रास देऊन दुखी करून योग्य मोबद्ल्यापेक्षा जास्त मिळालेला पैसा हा आरोग्य बिघडवून दवाखान्यात जिरवण्याचे काम शनीच करतो . दशम स्थान हे लग्नाच्या खालोखाल असलेले स्थान . आपले कर्तुत्व आणि कर्तव्य जपायला सांगणारे हे स्थान आहे. प्रत्येक माणसाची कार्य करण्याची धमक इथूनच आपल्याला समजते.
आयुष्यातील यशापयश, अधिकार योग , पितृसौख्य हे आपल्या कर्मावर अवलंबून असते आणि ते अवलंबून ठेवणारा शनी ह्या दशम स्थानाचा कारक आहे आणि म्हणूनच दश्माच्या समोर सुखस्थान येते . झोपेसह सर्व सुख मनुष्याला द्यायची कि नाही हे ठरवणारा शनीच आहे कारण हे सर्व तुमच्या दशमातील कर्मावर अवलंबून असते.
शनी हा वैराग्याचा कारक आहे आणि वैराग्याशिवाय मोक्ष नाही. परलौकिक आणि परदेशी नेण्याचा कारक शनीच आहे. मृत्यूपासून मोक्षापर्यंत नेण्याचे कार्य अष्टमस्थानातून आणि व्ययातून होते . व्ययस्थान तसेच गुंतवणुकीचे स्थान आहे. गुंतवणूक पैशाची असो अथवा पुण्याची ती करावीच लागते .
पैशाची योग्य गुंतवणूक आयुष्य सुरक्षित करते .तसेच योग्य ठिकाणी केलेले दान आपले पुढील जन्माचे संचित सुरक्षित करत असतो आणि हे शनीच करत असतो . जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मिळवण्यासाठी ह्या स्थानांकडे डोळसपणे बघावे लागते . शनीच्याच डोळ्याने पहिले तर आपण मोक्षापर्यंत नक्कीच पोहोचू आणि म्हणूनच शनीच्या दोन्ही राशी ह्या उदित गोलार्धात आहेत . कर्माच्या शेजारीच लाभ आहेत . जसे कर्म करणार तसे फळ मिळणार हे सांगणारे म्हणून दशमाच्या शेजारी लाभस्थान ठेवलेले आहे. हा संदेश देणारा शनीच आहे. शनी हे कालपुरुषाचे दुक्ख आहे. सृष्टीतील कुठलीही गोष्ट त्याच्या इच्छेशिवाय नाश पावत नाही . जे जे अटळ आहे त्याच्याशी शनीचा संबंध आहे. स्वकर्म आपल्याला शनीमहाराज शिकवतात . स्वकर्म केले नाही तर साखळदंडानी बांधलेल्या हत्तीसारखी स्थिती होते .
सिंह मेंढरासोबत राहिला तर त्यांच्यासारखाच वागायला लागत. त्याच्यातील क्षमता त्याला समजत नाहीत किबहुना त्यांचा विकासच होत नाही .हत्तीला साखळ्यांनी बांधले तर त्याची क्षमता विकसित होणारच नाही . त्याला आपले शौर्य काय आहे हे समजत नाही . कर्म योग हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला . कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. कर्ममार्ग हा राजमार्ग आहे . कुणीही ह्या मार्गावरून चालून मोक्षापर्यंत नक्कीच जाऊ शकतो. शनीला भावना नाहीत असे अजिबात नाही. शनी कठोर आहे ,मृत्यूचा कारक आहे, वाईट आहे , दिसायलाही चांगला नाही ,मोक्षाचा कारक आहे हे सर्व ठीक पण त्याला भावना नाहीत असे नाही . काम त्रिकोणातील पूर्णत्वाला पोहोचलेली कुंभ रास ही शनीचीच आहे . सेवा करणे ,जबाबदारी स्वीकारणे तसेच कर्तव्य निभावणे ह्यासाठी माणसाच्या गुढघ्यात शक्ती लागते ती शनी देतो . ज्यांचे गुडघे दुखतात ज्यांना पावलागणिक चालता येत नाही त्यांना यातना होतात . गुडघा म्हणजे मकर रास आणि गुडघे दुखतात तिथे शनी असतो . म्हणूनच शनीचा कर्मयोग समजून घेतला पाहिजे .
आपण जे जे बोलतो ते कृतीत आले पाहिजे . नुसते बोलून उपयोग नाही तर व्यवस्थित कर्म केले पाहिजे हा शनीचा संदेश आहे. क्रीयेविणा वाचाळता व्यर्थ आहे. कर्तव्यातून आपले कर्मही फुलायला पाहिजे आणि ह्या सर्वाची सुरवात म्हातारपणी नाही तर समज आल्यापासून झाली पाहिजे. उत्तम कर्मयोगाचे बाळकडू मुलांना लहानपणीच पाजले पाहिजे .
पत्रिकेमधल्या शनीच्या चांगल्या वाईट स्थितीवरून जातकाच्या अंतकरणाचे दालन समजते . शनी पत्रिकेचा समतोलपणा बिघडवतो .जितका शनी शुभ तितके दुःख कमी आणि जितका शनी अनिष्ट तितके दुःख अधिक हे समीकरण आहे. जेव्हा जन्म शनी स्तंभी असतो तेव्हा तो व्यक्तीला स्थिरत्व देतो. जातक कुठलाही बदल करण्यास तयार होत नाही.
ज्यावेळी गोचर भ्रमण करताना शनी आपल्या जन्म अंशावरून जातो तो काळ अनिश्चिततेचा असतो हे नक्की. शनीवरून शनी जाणे, चंद्रावरून रविवरून शनीचे भ्रमण तसेच चंद्राच्या समोरून शनी जाणे हे त्रासदायक असते. शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा तो त्याच्या कारक गोष्टीना चालना देत नाही त्यामुळे जातकाला असुरक्षित वाटते.
बाह्य स्थितीविषयी जातकाच्या मनात संशय निर्माण होतो आणि जातक चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो ज्याचे परिणाम त्याला दीर्घकाळ भोगायला लागतात . वर्षातून ४ महिने शनी वक्री असतो . म्हणून नशिबावर अंमल करणारा आणि perfection कडे नेणारा आणि दिरंगाई केली तरी त्यातून संधी देणाराही शनीच आहे.
शनी हा नारदाचा अवतार आहे , अध्यात्म विद्येचा कारक आहे. आपल्या सामर्थ्याने मानवाला काळाची सुस्पष्ट ओळख करून देणे हे शनीचे कारकत्व आहे . स्तुतीला किंवा खोट्या आराधनेला शनी कधीही भुलत नाही आणि भीतीपोटी केलेल्या नमस्कार त्याला रुचत नाही. कुठल्याही गोष्टीचे मर्म जाणून ,त्या गोष्टीचे गांभीर्य जाणून काम करावे हे त्याचे सूत्र आहे . कालभैरव हे शनीच्या मंत्रालयातील सचिव आहेत . अहंकारयुक्त कर्म करणार्यांच्या फाईली पहिल्यांदा शनीच्या मंत्रालयात जातात आणि त्याचा एक PAN Number तयार होतो. काही फाईली गुरूच्या मंत्रालयाकडे जातात कारण त्यांना गुरुकृपेचा स्पर्श असतो . शनीचा जन्म हा अमावास्येला झाला हे लक्षात घेतले तर तिन्हीसांजेला किंवा प्रदोष समयी केलेली शिवाची आराधना ही नक्कीच प्रभावी ठरते .
गोचरीचा शनी हा त्याच्या ६ व्या भावाला नेहमी त्रास देत असतो . सेवा करणे, जबाबदारी स्वीकारणे आणि कर्तव्य निभावणे ह्यासाठी शनीमहाराज सारखे काहीतरी सांगत असतात, कर्म करा .शनीमहाराज निर्णय घ्यावा अशी स्थिती निर्माण करतात . कित्येक पिढ्यांना पुरेल इतकी पुंजी देण्याच सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. सर्व अडचणींवर मात करणे, सहनशीलतेचा कळस गाठणे आणि मोठ्या समुदयाचे नेतृत्व करणे हे शनीकडे आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे यजमानत्व हे शनीकडे आहे . एकत्र कुटुंब पद्धतीत जो घरातील मोठा माणूस असतो तो आपल्याला कठोर भासतो ,त्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात त्याच्याकडे एक शिस्त असते आणि तो मनुष्य कुणाला आवडत नाही हे कारकत्व शनीचे आहे.
शनीचे वय ३५ हे आहे पण वय वर्षे ५२ नंतर शनीचा अंमल आपल्याला दिसतो. ३५ ते ४२ ही शनीची वर्षे आहेत. ४,८,१२ ह्या राशीमध्ये शनीची स्वतःची नक्षत्रे आहेत .शनी आपल्या स्वतःच्या राशीत जितके फळ देत नाही तितके फळ शनी त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात देतो . ४, ८, १२ मध्ये शनी त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात उत्तम फळ देतो . तरुण पिढीने शनीच्या संदर्भात काही विचार घेतले पाहिजे. जास्त विचार जीवनात त्रासदायक असतात . जीवनाचा पूर्ण स्वीकार हा ईश्वरी साक्षात्काराकडे आपल्याला नेत असतो.
खरतर आपले आयुष्य साधे सोपे असते पण आपणच ते गुंतागुंतीचे करत असतो. आपण कुणावर प्रेम करतो आई मुलांवर पती पत्नीवर प्रेम करतो . हे प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही तर समोरच्याचा पूर्णत्वाने केलेला स्वीकार आहे हे आपल्याला समजावून सांगणारा शनीच आहे. जीवनाला चांगली दिशा द्या हे सांगणारा शनी आहे. जीवनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जीवन जगायला पाहिजे.
दुसऱ्याच्या अनुभवाने माणूस शिकतो पण स्वतःच्या अनुभवाने तो शहाणा होतो. जीवन म्हणजे अद्भुत वर्तमान आहे हे सांगणारा शनी आहे. आपल्या उदरात पोटामध्ये शनी आहे आणि आपल्या नाभीत रवी आहे. त्यामुळे उदाराचा संकोच म्हणजे शनीचा संकोच आहे. जेव्हा मनुष्य लयबद्ध कपालभाती करतो तेव्हा शनीचा संकोच होतो आणि रविचे नाभितील तत्व हे ऊर्ध्वमुख होते आणि मनाचा चंद्रमा आहे तो अंतर्मुख होतो . त्यामुळे कपालभाती हा साडेसातीवरील एक उत्तम उपाय आहे. आपल्या शरीरातील रावितत्व चेतवणे हे काम कपालभाती करते. शनीचा संबंध जीर्णोद्धाराशी आहे. वाताहातीतून निर्माण झालेले साम्राज्य हे शनीचे साम्राज्य आहे.
शनी हा माणसाला कधीही आत्महत्या करायला लावत नाही . मात्र तत्कालीन स्वार्थाला , सुखाला चटावलेले इतर ग्रह जेव्हा शनीच्या तात्त्विक विचारांना झुगारून देतात तेव्हा मनुष्य निराशेतून आत्महत्येला प्रवृत्त होतो. जीवन एक जबाबदारी आहे आणि हि जबाबदारी स्वीकारायला माणसे तयार नसतात .सद्य स्थितीत लोकांना लग्न करायचे आहे पण मुलांची जबाबदारी नको फक्त मजा करायची . अशा माणसांना कृतघ्न म्हणतात . तरुणींना विवाह करायचा आहे पण त्यांना घरच्यांची जबाबदारी नकोय . थाटात सप्तपदी करायची आहे , फॅशन म्हणून कुंकू लावायचे आहे पण जीवनात समर्पण भाव आणायचा नाही . संसारात सतत तुझे माझे करायचे आहे त्याला जीवन म्हणत नाहीत . साडेसाती आली म्हणून ओरडणाऱ्या मंडळीना जीवनातील जबाबदारी स्वीकारून पुढे चालत राहणे हेच शनीचे तत्व आहे. पृथ्वीच्या ७०६ पट शनी मोठा आहे. सूर्याभोवती २९ वर्षे आणि ६ महिन्यात तो प्रदक्षिणा करतो आणि एका महिन्यात तो एक अंश जातो . वर्षातून १४० दिवस तो वक्री असतो आणि वक्री अवस्थेतून मार्गी होताना ५-६ दिवस तो स्तंभी असतो . तो भित्रा ,लाजाळू आहे .समाजापासून दूर राहणारा आहे. विचारवंत आहे तितकाच हट्टी आणि दुराग्रही आहे, निराशावादी आणि खिन्न प्रकृतीचा पण धूर्त आहे. फसवेगिरी करणारा , स्वार्थाला जपणारा आहे. धनु राशीमधील शनीला कोदंड शनी म्हणतात .तो तत्वज्ञानी आणि सहनशील ,काटकसरी आहे.
ज्या क्षणी जीवन नकोसे वाटते त्या क्षणी ते संपवता येत नाही आणि ज्या क्षणी जीवनाचा खरा अर्थ समजतो तेव्हा जगायचं क्षण सुद्धा संपलेला असतो म्हणून आपला जन्म नक्की कशासाठी झाला आहे ह्याचा विचार माणसाने केला पाहिजे . निसर्ग हा शिस्तबद्ध आहे ,ऋतुमागून ऋतू येतात .सगळे वेळेत असते. निसर्ग शिस्तीचा आहे इथे शनी महाराज आपल्याला सांगतात कि निसर्गाकडे बघा .म्हणूनच निसर्गात सकाळी फिरायला जा. आपल्या आचरणाला आनंद दायी चौकट जर आखून घेतली तर आपले जीवन आनंद दायी होणार आहे.
कर्मयोग हा संतानी आणि त्यांच्या सहचारिणीनी सुद्धा आचरणात आणला होता . गोरा कुंभार आणि त्यांची पत्नी कामासाठी गेले होते. गोरा कुंभार पुढे चालत होते आणि त्यांच्या पत्नी त्यांच्यामागून चालत येत होत्या . चालताना गोरा कुंभारांना मातीत एक सोन्याचे कडे दिसले .त्यांच्या मनात आले की माझ्या मागून येणाऱ्या बायकोला हे कडे दिसले तर ती नक्की उचलून घेईल आणि असे व्हायला नकोय म्हणून त्यांनी त्या कड्यावर पायाने माती लोटली .आपल्या पुढे इतक्या झपाझप चालणारा आपला नवरा क्षणभर थांबला आणि त्याने मातीत काहीतरी केले हे त्यांच्या पत्नीच्या नजरेतून सुटले नाही. तिने पुढे जाऊन ती माती काढली आणि तिला ते कडे दिसले .घरी आल्यवर तिने त्यांना म्हंटले की हे काय, आपण 'मातीवर माती' टाकली. हा अध्यात्माचा विचार पत्रिकेत शनी चांगला असल्याशिवाय मनात येणारच नाही. तिच्या मनातील ह्या विचाराला खरच सलाम आहे.
कर्म उत्तम पाहिजे हे शिकवणारा शनी आहे. अशा ह्या कर्मयोग शिकवणाऱ्या शनी महाराजांना साष्टांग दंडवत . शनीची ताकद वेळीच ओळखून , त्याला आपल्या चांगल्या वागणुकीने आपलेसे करा आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हा हेच सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच .
संपर्क : 8104639230