झोपण्याआधी 'हा' श्लोक म्हणा आणि देवावर सगळा भार टाकून निश्चिन्त व्हा!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 20, 2021 19:54 IST2021-02-20T19:54:16+5:302021-02-20T19:54:31+5:30
जो भक्त अनन्य भावाने मला शरण येतो, त्याचा रोजचा योगक्षेम मी वाहून नेतो. हे आश्वासन खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केवळ अर्जुनाला नाही, तर समस्त मानव जातीला दिले आहे.

झोपण्याआधी 'हा' श्लोक म्हणा आणि देवावर सगळा भार टाकून निश्चिन्त व्हा!
आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर सबंध दिवस अवलंबून असतो. त्याचप्रमाणे दिवसाचा शेवट कसा होतो, यावर पुढचा दिवस अवलंबून असतो. दुर्दैवाने आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट मोबाईलने होतो. त्यामुळे मोबाईलमधून आपण जे विचार पाहतो, ऐकतो, तेच आपल्या मनात रुजत असतात. मात्र, अध्यात्मिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या ते योग्य नाही. मग, त्यावर उपाय काय? तर हा भग्वद्गीतेतील श्लोक -
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
श्लोकाचा अर्थ : जो भक्त अनन्य भावाने मला शरण येतो, त्याचा रोजचा योगक्षेम मी वाहून नेतो. हे आश्वासन खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केवळ अर्जुनाला नाही, तर समस्त मानव जातीला दिले आहे.
म्हणून रोज चिंतेचे ओझे मानेवर आणि मनावर वाहत राहण्यापेक्षा आपण आपल्याकडून शंभर टक्के प्रयत्न करावे आणि बाकीचा भार भगवंतावर सोपवून निश्चिन्त राहावे. आपली काळजी घेणारे कोणी आहे, ही भावना अत्यंत दिलासादायक असते. म्हणून आज रात्रीपासूनच हा प्रयोग करून पहा. तना मनावरचा भार एकाएक हलका झाल्यासारखा वाटेल आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट मंगलमयी होऊन नवीन दिवसाची आव्हाने स्वीकारण्यासाठी मन सज्ज होईल.