Sankashti Chaturthi 2024: तुकोबारायांना गणरायात विठ्ठलरूप दिसले तो क्षण कसा होतो ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:00 AM2024-03-28T07:00:00+5:302024-03-28T07:00:02+5:30

आपल्याकडे शैव आणि वैष्णव हा वाद जुना आहे, पण संतांनी देवामध्ये द्वैत नाही तर ते अद्वैताचे प्रतीक आहे हे अनुभवातून सांगितले, त्यातलाच हा प्रसंग!

Sankashti Chaturthi 2024: Know the moment Tukobaraya sees Ganaraya as Vitthal! | Sankashti Chaturthi 2024: तुकोबारायांना गणरायात विठ्ठलरूप दिसले तो क्षण कसा होतो ते जाणून घ्या!

Sankashti Chaturthi 2024: तुकोबारायांना गणरायात विठ्ठलरूप दिसले तो क्षण कसा होतो ते जाणून घ्या!

देव वेगवेगळे आहेत, असे आपण म्हणतो. परंतु संतांना हे वेगळेपण जाणवत नाही. कारण सगुण-निर्गुण अशा परमेश्वराशी ते एकरूप झालेले असतात. म्हणून तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना विठ्ठलरूपात गणरायाचे दर्शन घडले. कसे ते बघा... 

ओंकार प्रधान, रूप गणेशाचे,
हे तिन्ही देवांचे, जन्मस्थान।।
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू,
मकार महेश, जाणियेला।।
ऐसे तिन्ही देव, जेथोनि उत्पन्न,
तो हा गजानन मायबाप।।
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी,
पहावी पुराणी व्यासाचिया।।

ब्रह्म शब्दाचा उच्चार केला की शेवटी अकार उरतो, विष्णू उच्चारातून उकार उरतो आणि मकारातून महेशाचा उगम होतो, असे त्रिदेव ओंकारस्वरूपात सामावले आहेत, आणि तेच स्वरूप पांडुरंगात, गणपतीतच नव्हे, तर आपल्या प्रत्येक उपास्य देवात सामावले आहे. 

याचाच अर्थ, ईश्वरशक्ती एकच आहे, फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. म्हणून मूलाधार शक्तीत भेदाभेद होत नाहीत. जसे की, अष्टविनायकाची स्वरूपे वेगवेगळी, परंतु मूळ तत्त्व एक. विष्णूंचे अवतार वेगवेगवळे, परंतु शक्ती एक, तसेच भगवंताची रूपे वेगवेगळी, परंतु ईश्वर एक. म्हणून तर साईबाबा म्हणतात, 'सबका मालिक एक है।'

द्वैत असेल, तर ते आपल्या मनात आहे. एकाची पूजा केली, म्हणून दुसऱ्याला वाईट नाही ना वाटणार? आपण भक्तीत कमी तर नाही ना पडणार? देवाची कृपादृष्टी कमी तर नाही ना होणार? मनातील ही द्विधा मनस्थिती दूर व्हावी, म्हणून हा दृष्टांत-

गणपती आणि विष्णू एक:

एकदा पार्वतीमातेकडे विश्वदेव नावाचे अतिथी आले होते. पार्वतीमातेने त्यांचा आदर, सत्कार केला. स्वयंपाक केला. बसायला पाट आणि ताट ठेवायला चौरंग दिला. चौरंगाभोवती सुबक रांगोळी काढली. चांदीचा तांब्या, पेला दिला. ताटात चारीठाव पक्क्वान्नयुक्त भोजन वाढले. सुगंधी धूप लावून अतिथींनी विनम्रतेने जेवायला बसण्याची विनंती केली. विश्वदेव शुचिर्भूत होऊन पाटावर जेवायला बसले. ताटाचा नैवेद्य दाखवून त्यांनी आपोष्णी घेतली. खुद्द अन्नपूर्णेने केलेले भोजन ग्रहण करणार, तोच त्यांना आठवण झाली, की नित्यनेमाने आपण जेवणाआधी भगवान महाविष्णूंचे दर्शन घेतो, त्यांचे चरणतीर्थ प्राशन करतो, मग जेवतो. हे लक्षात येताच, विश्वदेवांनी सुग्रास तोंडाशी नेता नेता परत ताटात ठेवला. पार्वती मातेने नम्रपणे `काय झाले' असे विचारले. विश्वदेवांनी मनोदय सांगितला. त्यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या बालगणेशांनी, विश्वदेवांच्या जेवणात व्यत्यय येऊ नये, म्हणून भगवान महाविष्णूंचे रूप धारण केले आणि विश्वदेवाला दर्शन दिले. विश्वदेव धन्य झाले आणि विष्णूंचे दर्शन झाल्यावर शांततेत जेवले. या कृतीतून बाप्पाने विश्वदेवांना दाखवून दिले. सकल चराचरातील ईश्वर स्वरूप वेगवेगळे असले, तरी ईश्वरी शक्ती एकच आहे. म्हणून तुकाराम महाराजही आपल्या एका अभंगात म्हणतात,

तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती दूजा नाही।

चला तर मग, आपणही मनातले द्वैत बाजूला ठेवून या ओंकारशक्तीत सामावलेल्या अद्वैत शक्तीचा आशीर्वाद घेऊया. मंगलमूर्ती मोरया। 

Web Title: Sankashti Chaturthi 2024: Know the moment Tukobaraya sees Ganaraya as Vitthal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.