संत रोहिदासांनी घेतली चर्मव्यवसायात ईश्वराची अनुभूती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 04:05 PM2021-03-05T16:05:07+5:302021-03-05T16:05:27+5:30

शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे. 

Saint Rohidas took experience of God in leather business! | संत रोहिदासांनी घेतली चर्मव्यवसायात ईश्वराची अनुभूती!

संत रोहिदासांनी घेतली चर्मव्यवसायात ईश्वराची अनुभूती!

googlenewsNext

पंधराव्या सोेळाव्या शतकातील रोहिदास हे एक मोठे संत म्हणून ओळखले जातात. हे चर्मकार असून रवीदास, रैदास या नावानेही प्रसिद्ध होते. राजघराण्यातील स्त्री मीराबाई, ही यांची शिष्या असल्यामुळे रोहिदासांची महती वाढली. रोहिदासांनी अनेक पदे लिहिली आहेत. शिखांच्या 'ग्रंथसाहेबा'तही यांची सुमारे चाळीस पदे आहेत. वर्णबाह्य असल्याकारणाने त्यांना लौकिक शिक्षण मिळाले नव्हते, पण साधुसंतांच्या संगतीत ते आत्मज्ञानी झाले. आपल्या व्यवसायास अनुसरून ते एका पद्यात म्हणतात,

ज्यांहा देखो वांहा चामही चाम,
चामके मंदिर बोलत राम।
चामकी गऊ चामका बचडा,
चामही धुने चामही ठाडा।
चामका हाती चामका राजा,
चामके उंटपर चामका बाजा।
कहत रोहिदास सुनो कबीर भाई,
चाम बिना देह किनकी बनाई।।

रोहिदास म्हणतात की, मी चर्मकार असूनही ईश्वराची भक्ती करतो. मला तर जेथे पहावे तेथे चामडे दिसून येते. चामड्याच्याच  शरीररूपी मंदिरात राम विराजमान झाला आह़े चामड्याची गाय व वासरूही चामड्याचेच. सर्वत्र चामडेच पसरले आहे. राजा चामड्याचा आणि हत्तीही चामड्याचाच. उंटसुद्धा चामड्याचाच आणि त्याच्यावर ठेवलेले वाद्यही चामड्यानेच मढवले आहे. त्या चर्माशिवाय देह कसा बनणार? 

या एका पदात रोहिदास महत्त्वाचा सिद्धान्त सांगत आहेत. मानवी शरीर कोणत्याही जातीचे असले तरी, त्यात अस्थी, मांस, चरबी सर्वत्र सारखीच असते. रक्ताचे प्रकार वेगळे असले तरी, सर्व जातीत ते आढळतात. शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? जा प्रश्न चोखोबांनी विचारला होता. परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे. 

Web Title: Saint Rohidas took experience of God in leather business!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.