त्याग वासनेचा, देई ठेवा आनंदाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:00 IST2020-12-03T16:00:00+5:302020-12-03T16:00:01+5:30
माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात.

त्याग वासनेचा, देई ठेवा आनंदाचा!
माणसाच्या आयुष्यातले दु:ख नाहीसे होण्यासाठी नवी व निर्दोष समाजरचना हवी, त्यासाठी नवा माणूस तयार केला पाहिजे. असे साम्यवादाप्रमाणे संतही मानतात. पण नवीन माणूस तयार होण्यासाठी त्याच्यात आतून बदल घडायला पाहिजे. त्यासाठी आधी माणसाची वासना बदलायला हवी. असे संत सागतात.
हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट
माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात. देहसुखाभोवती घोटाळणारी वासना माणसाला स्वार्थी बनवते व आसुरी आचारविचार शिकवते. तीच वासना जर ज्ञान, भक्ती, प्रेम, क्षमा, परोपकार अशा गुणांभोवती घोटाळू लागली, तर ती माणसाला नि:स्वार्थी बनवते व दैवी आचारविचार शिकवते. अर्थात जुन्या माणसातून नवा चांगला माणूस करायचा असेल, तर त्याच्या अंतरात वावरणारी स्वार्थी वासना अध्यात्मसाधनेच्या भट्टीत घालून नि:स्वार्थी बनवली पाहिजे.
आता हे कसे साधावे? त्यासाठी मार्ग आहे. देहबुद्धी दूर करावी आणि आत्मबुद्धी जवळ करावी. देहबुद्धी म्हणजे शरीराच्या तंत्राने वागण्याची सवय, आत्मबुद्धी म्हणजे अंत:रणाचा कौल मानून भगवंतावर भरवसा ठेवण्याची वृत्ती.
आपण अनेकदा देहबुद्धीचे दास बनतो. ती बुद्धी सुचवील तसे वागत गेल्यावर विफलता व असमाधान तेवढे पदरी येते. या बुद्धीचा `मी' सर्व बाजूंनी अपंग असतो, कसा ते पहा. देहबुद्धीचा `मी' धड भोक्ता नाही. नको असलेले दु:ख मला टाळता येत नाही. हवे असलेले सुख मला मिळवता येत नाही. दु:ख भोगावे लागते. सुखाची खात्री नसते.
देहबुद्धीचा `मी' धड कर्ता नाही. मी अमुक करीन व तमुक करणार नाही, हे निश्चय पार पाडण्याची खात्री नसते. हवे असलेले कर्म माझ्या हातून घडतेच असे नाही. नको असलेले कर्म टळतेच असे नाही. माझे कर्तेपण मुळात लंगडे आहे.
देहबुद्धीचा `मी' ज्ञाताही नाही. मी कुठून आलो, का आलो, कुठे जाणार, केव्हा जाणार हे मला माहित नाही. उद्या काय होणार, हे कळत नाही. कुणीतरी मला जगवतो, म्हणून मी जगतो. कुणीतरी माझ्याकडून कर्म करवतो, म्हणून मी कर्म करतो. कुणीतरी मला कर्माचे फळ देतो, ते मी माझे म्हणून भोगतो. कुणी तरी समजावून देतो म्हणून मी जाणतो. असा मला जगवणारा व जाणणारा जो करा कर्ता आहे, तोच संतांचा भगवंत होय. प्रत्येकाच्या हृदयात तो आनंदरूपाने राहता.
हेही वाचा : वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!