हिंदू धर्मानुसार मासिक पाळीचे चार दिवस झाले की केसावरुन आंघोळ केली जाते. त्याला शरीरशुद्धी देखील म्हटले जाते. मात्र प्रत्येक स्त्रीचा शरीरधर्म जसा वेगळा तसा मासिककाळ देखील वेगळा असतो. सगळ्यांच स्त्रियांचे चार दिवसात आटोपत नाही. सगळ्यांनाच नियमित पाळी येते असे नाही. मग या बदलानुसार केस धुण्याच्या प्रक्रियेतही बदल करणे योग्य ठरते का? याबाबत शास्त्र आणि विज्ञान काय सांगते ते जाणून घेऊ.
कोणत्याही मुलीला मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. असे म्हणता येईल की मासिक पाळी ही दर महिन्याला येणारी एक चक्र आहे. हे केवळ मुलीच्या शरीराचे एक आवश्यक चक्र मानले जात नाही तर त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी ऐकायला मिळतात.
अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे मासिक पाळीच्या काळात मंदिरात प्रवेश करू नये, या काळात लोणच्याला हात लावू नये, स्वयंपाकघरात जाऊ नये, चौथ्या दिवशी केस धुवावेत. या नियमांमागे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही आहे. तूर्तास आपण केस कोणत्या दिवशी धुणे योग्य आणि पाळीदरम्यान धुतल्यास शरीरावर काय परिणाम होतात त्याबद्दल जाणून घेऊ.
पूर्वी रविवारी केसावरुन अंघोळ करण्याची पद्धत होती. शॅम्पूचा वापर अलीकडच्या काळात सुरु झाला. अन्यथा शिकेकाई आणायची, दळायची, उकळायची, लावायची या सगळ्यासाठी हाताशी निवांत वेळ हवा, तो सुट्टीच्या दिवशी असतो, म्हणून न्हाणे हा साग्रसंगीत कार्यक्रम रविवारी केला जाई. आता तसे नाही, शॅम्पू लावला, केस धुतले, विंचरले, निघाले. इतके सोयीचे झाले आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा केसावरुन अंघोळ करण्याची पद्धत रूढ झाली. मात्र मासिक काळातील बंधने पाळली जावी याबाबत ज्येष्ठ महिलांचा आग्रह असतो.
शास्त्रानुसार पाळीनंतर कोणत्या दिवशी केस धुवावे? (Why you shouldn't wash your hair during menstruation?)
शास्त्रानुसार, जर तुमची मासिक पाळी ३ दिवस चालली तर तुम्ही चौथ्या दिवशी तुमचे केस धुवावेत. जर तुमच्या मासिक पाळीचा कालावधी ७ दिवस असेल तर तुम्हाला आठव्या दिवशी तुमचे केस धुण्याचा सल्ला दिला जातो. रक्तस्त्राव थांबल्यानंतर केस धुणे हा नियम आहे. जेणेकरून तुमचे शरीर पूर्णपणे शुद्ध होते. तथापि, मासिक पाळी संपल्यानंतर, तुम्ही पाचव्या किंवा आठव्या दिवशी तुमचे केस धुवू शकता, मग तो दिवस कोणताही असो. तथापि, पाचव्या दिवशी केस धुणे हे सर्वात शुद्ध मानले जाते. जरी मासिक पाळी एक किंवा दोन दिवस चालली तरी, पाचव्या दिवशी केस धुतल्यानंतरच तुम्ही मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी प्रवेश करावा असे शास्त्र सांगते. शुद्धता मनात असली, तरी केसावरुन आंघोळ केल्यावर जो फ्रेशनेस जाणवतो, त्यालाच शास्त्रात शुद्धतेचे नाव दिले आहे.
विज्ञानाची पुष्टी :
विज्ञानानुसार मासिक पाळीच्या काळात केस न धुण्याचा सल्ला दिला जातो, कारण या काळात शरीराचे तापमान खूप वाढते आणि केस धुण्यामुळे शरीराचे तापमान व्यस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराच्या आतील भागांवर परिणाम होण्याचा संभव असतो. म्हणून पाळीनंतर केस धुणे आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य ठरते.
पर्यायी व्यवस्था :
ज्यांना चार दिवस स्त्राव होतो आणि केस धुणे गरजेचे वाटते त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून तिसऱ्या दिवशी केस धुवावेत, कारण पहिल्या दोन दिवसात स्त्राव होऊन गेलेला असतो. तिसऱ्या दिवशी शरीर पूर्ववत होऊ लागते. गरज असेल तर तिसऱ्या दिवशी अन्यथा चौथ्या, पाचव्या किंवा पाच दिवसांची पाळी असेल तर आठव्या दिवशी नाहणे उत्तम ठरते.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.