शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘गण गण गणात बोते’चा सिद्धमंत्र देणारे; ब्रह्मज्ञानी, शेगावीचे संत गजानन महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 07:07 IST

Gajanan Maharaj Punyatithi 2024: ऋषिपंचमीला गजानन महाराज यांनी अवतार समाप्ती केली. गण गण गण गणात बोते मंत्रांचा जप करत महाराजांचे स्मरण करुया...

Gajanan Maharaj Punyatithi 2024: महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची ०८ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यतिथी आहे. विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा गजानन महाराजांचे लाखो भक्त आहेत. या दिवशी महाराजांचे आवडते पदार्थ चून (पिठले), भाकरी, अंबाडीची भाजी, झुणका, कांदा, हिरव्या मिरच्या असा नैवेद्य भक्तजन मोठ्या भक्तिभावाने अर्पण करतात. गजानन महाराजांचे स्मरण करून त्यांच्या चरित्राचा घेतलेला थोडक्यात धावता आढावा...

"अन्नं ब्रहोति" या उपनिषदातील उक्तीचा बोध करण्याकरीताच जणू महाराजांनी लीला केली. "गण गण गणात बोते" हे भजन महाराज निरंतर करीत असत. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांतच खऱ्या अर्थाने महाराजांच्या या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. "जो स्वयंमेव ब्रहा झाला। नांवरुप कोठून त्याला? । नामरुपांचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ।।. अशा या साक्षात परब्रम्ह स्वरूप गजानन महाराजांचा प्रभाव हा मानवाप्रमाणेच पशू, पक्षी आणि पंचमहाभूतांवर सुद्धा होता. 

भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरणारे परमहंस संन्यासी गजानन महाराज

माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. 'गण गण गणात बोते', हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना 'गिणगिणेबुवा', 'गजानन महाराज' अशी नावे पडली.

स्वामी समर्थांचे गजानन महाराजांना मार्गदर्शन

अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. 

गजानन महाराजांचे ३२ वर्षे शेगावांत वास्तव्य अन् हजारोंचा उद्धार

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. तरीही आवश्यकतेप्रमाणे ते अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या लहानमोठ्या गावातही जात. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. महाराज हे अद्वैतसिध्दांतवादी होते. त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिली नाही. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले. अवतारकार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते. 

महान योगी, भक्तवत्सल गजानन महाराज अन् लोकमान्य टिळकांची भेट

गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. मात्र, दांभिकतेची त्यांना चीड येत असे. विठोबा घाटोळ नावाच्या सेवेकऱ्याने महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविण्याचे प्रकार सुरू केले, तेव्हा महाराजांनी त्याला काठीने चांगलेच बदडून काढले. लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. गजानन महाराज  कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. 

गण गण गणात बोते सिद्धमंत्रांचा नेमका अर्थ काय?

‘गण गण गणात बोते’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे, असे सांगितले जाते. या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही. 

ऋषिपंचमीला अवतार समाप्ती

गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. गजानन महाराजांचे समाधीस्थान असलेले शेगाव संस्थान जगाच्या नकाशावर दिमाखात उभे आहे. सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे.

॥ श्री गजानन, जय गजानन ॥

॥ गण गण गणात बोते॥ 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरShegaonशेगावganpatiगणपती 2024Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास