Ayodhya Ram Mandir News: सन २०२४ च्या जानेवारी महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करून रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याची जगभर चर्चा झाली. अयोध्येत येऊन राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. आतापर्यंत कोट्यवधी रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. केवळ भारतातून नाही, तर जगाच्या अनेक देशांतून भाविका, पर्यटक भव्य राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येत पोहोचले. भाविकांनी दिलेल्या दानाचे प्रमाणही प्रचंड असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता अयोध्येतील राम मंदिराबाहेर परिसरात रामललाचे फोटो, लॉकेट्स, प्रसाद तसेच पूजा साहित्य विकणारे, चंदनाचा टिळा लावणारे यांच्या कमाईत गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. याची प्रातिनिधिक स्वरुपातील आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या वर्षभरात राम मंदिर परिसरात मोठे फेरबदल पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिर परिसरातील अन्य बांधकामांना वेग आला आहे. पर्यटकांची वाढतच जात असलेली संख्या, राम मंदिराची भव्यता पाहण्याची उत्सुकता आणि रामलला दर्शनाची भाविकांची आतुरता यांमुळे अयोध्येचा चेहरामोहरा बदलल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राम मंदिर परिसरात तसेच लगतच्या भागात धार्मिक साहित्याची विक्री करणाऱ्यांच्या कमाईत कैक पटीने वाढ झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
राम मंदिरात लॉकेट, प्रसाद, फोटोतून दिवसाला किती कमाई होते?
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अयोध्येतील राम मंदिराबाहेर परिसरात रामललाचे फोटो, लॉकेट्स, प्रसाद तसेच पूजा साहित्य विकणारे, चंदनाचा टिळा लावणारे यांच्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. रामललाचे फोटो विकून एका विक्रेत्याने गेल्या वर्षभरात तब्बल ५ लाख रुपयांची कमाई केली आहे. तर, पूजा साहित्याची विक्री करणाऱ्यांची कमाई दिवसाला ३०० ते ४०० रुपयांवरून थेट अडीच हजार रुपयांपेक्षाही जास्त होत असल्याचे सांगितले जाते. राम मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांच्या भाळी चंदनाचा टिळा लावणारे दिवसाला किमान ५०० ते कमाल हजारो रुपये कमावतात. तसेच ज्या भाविकांना चालायला त्रास होतो, अशांसाठी दिल्या जाणाऱ्या व्हीलचेअरची सेवा प्रदान करणारे दिवसाला किमान १५०० रुपयांची कमाई सहज करतात. याशिवाय राम मंदिर परिसरात प्रसाद म्हणून विविध गोष्टींची विक्री करणारे किमान १५०० ते कमाल ४ हजार रुपयांपर्यंतची कमाई करतात, असा दावा करणारी काही आकडेवारी समोर येत आहे. राम मंदिर परिसरात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची दुकाने, चणे-दाणे, मक्याचे प्रकार, पोहे, तंदुरी चहा असे पारंपरिक आणि ट्रेंडिंग खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांची कमाईही दिवसाला काही हजार रुपये होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, सन २०२५ मध्ये राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होणार आहे. ११ जानेवारी २०२५ रोजी नव्या भव्य राम मंदिराची वर्षपूर्ती असणार आहे. या निमित्ताने लाखो भाविक अयोध्येत राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्यासाठी तयारी करत आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि राम मंदिर प्रशासनही या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण राम मंदिर परिसर लवकरच पूर्ण केला जाणार आहे. राम मंदिर, हनुमानगढी, लता चौक, गुप्तर घाट, सुरजकुंड आणि इतर लोकप्रिय ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.