युद्धाची तयारी शांततेत करावी म्हणतात; तुम्ही तशी कधी केली आहे का?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 16, 2021 08:00 AM2021-04-16T08:00:00+5:302021-04-16T08:00:11+5:30

तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागेल म्हणून विहीर खोदून ठेवणे केव्हाही चांगले!

Preparations for war are said to be made in peace; Have you ever done that | युद्धाची तयारी शांततेत करावी म्हणतात; तुम्ही तशी कधी केली आहे का?

युद्धाची तयारी शांततेत करावी म्हणतात; तुम्ही तशी कधी केली आहे का?

googlenewsNext

आपल्या सगळ्या गोष्टी अगदी ऐन वेळेवर सुचतात. एवढेच काय, तर परीक्षेत पेपरचे तीन तास संपत आले की शेवटच्या पाच मिनीटात आपली ज्ञानगंगा दुथडी भरून वाहू लागते. पण तेव्हा फार उशीर झालेला असता़े बरेच काही येऊनसुद्धा, आठवूनसुद्धा पेपर हिसकावून घेतला जातो. परंतु, शालेय परीक्षा परत देता येईलही, मात्र आयुष्यातल्या परीक्षेत नापास झालो, तर वारंवार संधी मिलत नाही. म्हणून युद्ध सुरू झाले, की तयारी करू ही वृत्ती सोडून शांततेच्या काळात युद्ध कधीही झाले तरी आपण शस्त्रसज्ज कसे असू यावर भर दिला पाहिजे. अर्थात संकटांशी लढण्याची सर्वतोपरी तयारी केली पाहिजे. 

एक शेतकरी होता. तो वयोवृद्ध होता. त्याला शेतकामासाठी मजूर हवे होते. तो त्यांना चांगला पगार द्यायलाही कबूल होता. परंतु त्याचे शेत अशा ठिकाणी होते, जिथे सतत वादळसदृश्य परिस्थिती असे. त्यामुळे कितीही मेहनत केली, तरी त्यावर पाणी फिरत असे. ही बाब लक्षात घेऊन अनेक मजूरांनी तिथले काम अर्धवट सोडले होते.

शेतकऱ्याला मात्र जमीन वाऱ्यावर टाकून चालणार नव्हते. त्याने वर्तमानपत्रात बातमी दिली आणि कामासाठी होतकरू तरुण हवा आहे, योग्य मोबदला दिला जाईल असे म्हटले. बातमी वाचून एक गरजू तरुण शेतकऱ्याला येऊन भेटला. शेतकऱ्याने आधीच परिस्थितीचे वर्णन करून सांगितले. यावर तरुण म्हणाला, `हरकत नाही, मी काम करायला तयार आहे. फक्त माझी एक अडचण आहे. वाऱ्याची झुळूक आली, की मला गाढ झोप लागते. एरव्ही मी सतर्क असतो. तुमच्या कामात मी अडचण येऊ देणार नाही, तुम्ही माझ्या झोपेत अडचण येऊ देऊ नका.'

शेतकऱ्याने त्याला संधी द्यायचे ठरवले. तरुण मुलगा मन लावून काम करत होता. एक दिवस वादळ आले. शेतकरी लगबगीने तरुणाला बोलवायला गेला. तर तरुण गाढ झोपला होता. शेतकरी त्याला गदागदा हलवून उठवत होता. तरुण म्हणाला, माझी अट विसरलात का बुवा?'

`याला नंतर बघून घेतो, आधी माझे शेत पाहतो' असे म्हणत शेतकरी रागारागात शेतावर गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, सगळ्या पिकांची व्यवस्थित बांधणी केली होती. कोंबड्यांना नीट झाकून ठेवले होते. कोठाराचे दार घट्ट बंद केले होते. ते पाहून शेतकऱ्याला तरुणाचे बोल आठवले, `वारा आला की झोप लागते' याचा अर्थ त्याला परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने संकटाआधीच बचावाची पूर्वतयारी करून ठेवली होती. शेतकरी त्याच्यावर खुष झाला आणि त्याला दुप्पट पगार बक्षीस म्हणून दिला. 

आपणही आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसाठी, बचावकार्य आधीच करून ठेवले, तर संकटाला तोंड देणे किती सोपे होईल नाही? तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागेल म्हणून विहीर खोदून ठेवणे केव्हाही चांगले!

Web Title: Preparations for war are said to be made in peace; Have you ever done that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.