Pitru Paksha 2025 Swami Datta Guru Seva: सोमवार, ०८ सप्टेंबर २०२५ पासून मराठी वर्षातील तसेच चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेला पितृपक्ष सुरू होत आहे. रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावास्येला पितृ पंधरवड्याची सांगता होत आहे. भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. काही मान्यतांनुसार, या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा, दत्तगुरुंची केलेली उपासना लाभदायक तसेच पितृदोषावर उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार, चार ऋण सांगितली गेली आहेत. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितरांची कृपा लाभावी, यासाठी पितृपक्षात विविध गोष्टी केल्या जातात. या काळात पितरांचे स्मरण करून श्राद्ध विधी आणि तर्पण केले जाते. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे शास्त्र सांगते. देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असे उपनिषदे सांगतात. देवतांप्रमाणे पितरांमध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते, असे सांगितले जाते.
पितृपक्षात श्राद्ध, तर्पण विधीचे महत्त्व
माता-पिता, निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच 'श्राद्ध'. 'श्रद्धा' या शब्दापासून 'श्राद्ध' हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने 'केले जाते, ते 'श्राद्ध' होय. पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे, आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त इच्छांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून, त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे यासाठी श्राद्ध महत्त्वाचे आहे.
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
पितृपक्षात दत्त उपासना करावी, जास्तीत जास्त नामजप करावा
एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त राहतात. श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. गुरुजी मिळाले नाहीत, तर श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या, पुस्तके मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. मुलगी, पत्नी, आई आणि सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. या पितृपक्षाच्या काळात दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने, पितृपक्षात प्रति दिन दत्ताचा जास्तीत जास्त नामजप करावा, असे सांगितले जाते. तसेच स्वामी मंत्रांचा नामाचा जप करणे शुभ ठरू शकते, असे म्हटले जाते.
अखंड नामस्मरणाचा संकल्प करून जप केल्यास उत्तम
दत्तगुरुंच्या नामस्मरणाने निर्माण होणारी शक्ती सर्व बाजूंनी संरक्षण कवच तयार करते. ते आपल्या नामजपाचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते तसेच इतर घटकांबरोबरच आपल्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून असते. दत्तगुरुंच्या नामजपामुळे पितरांना गती मिळते. पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात. यामुळे साहजिकच त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते. परंतु, आपल्याला जितका शक्य आहे, तितका जप अवश्य करावा. अखंड नामस्मरणाचा संकल्प करून जप केल्यास उत्तम.
१ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
पूर्वीप्रमाणे सध्याच्या काळात आग्रहपूर्वक श्राद्ध-पक्ष वगैरे केले जात नाही, असेच पाहायला मिळते. अनेकांना पितरांच्या अतृप्तीमुळे किंवा पितृदोषामुळे विविध प्रकारचे त्रास होताना दिसतात. पुढे पितृदोष येण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून यथाशक्ती दत्तगुरुंची उपासना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा शक्य तितका जप करावा, असे म्हटले जाते. ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्रासोबत कुलदेवतेचे नामस्मरण करावे. गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्यात. दत्त मंदिरात बसून एक ते दोन माळा जप करावा, असे म्हटले जाते. तसेच स्वामींच्या मठात जाऊनही स्वामींचा तारक मंत्र तसेच अन्य मंत्रांचे जप करू शकता.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥