Angarak Vinayak Chaturthi Paush December 2025: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ अवघ्या काही दिवसांनी २०२६ या इंग्रजी नववर्षाची सुरुवात होत आहे. तत्पूर्वी २०२५ मधील शेवटच्या विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक किंवा संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे विशेष मानले जाते. मराठी वर्षातील पौष महिना सुरू असून, विनायक चतुर्थीला जुळून आलेल्या अंगारक योगावर गणपती पूजन कसे करावे? गणेश पूजनात कोणत्या गोष्टी आवश्यक मानल्या गेल्या आहेत? व्रत पूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया...
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात, नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने, स्मरणाने केला जातो. मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी पौष विनायक चतुर्थी अंगारक योग आहे.
गणेश व्रतांमध्ये विनायक चतुर्थीला गणपती पूजन करणे शुभ फलदायी
प्रत्येक मराठी महिन्यातील दोन्ही चतुर्थीला गणपती पूजन, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आहे. मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर वद्य पक्षातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. गणेश व्रतांमध्ये या दोन्ही चतुर्थींना गणपती पूजन करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे.
अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही
विनायक चतुर्थी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते.
अंगारक योग पुराणात आढळते कथा
अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
‘असे’ करा व्रत, गणपती पूजन
विनायक चतुर्थी अंगारक योगावर सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे.
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही, तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. जास्वंदाचे फूल अवश्य अर्पण करावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक नसतील, तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
‘अशी’ करा गणेश उपासना
संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. उपास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून 'ॐ सिद्धिविनायकाय नम:' या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी. गणेश पूजनात आवर्जून अथर्वशीर्ष म्हणावे. गणपतीला आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : In 2025, the last Vinayak Chaturthi aligns with Angarak Yog. Auspicious for devotees, the day involves Ganpati puja with specific rituals. Fasting and offering prayers can remove obstacles and bring prosperity.
Web Summary : २०२५ में, अंतिम विनायक चतुर्थी अंगारक योग के साथ है। भक्तों के लिए शुभ, इस दिन में विशिष्ट अनुष्ठानों के साथ गणपति पूजा शामिल है। उपवास और प्रार्थना करने से बाधाएं दूर होती हैं और समृद्धि आती है।