लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 26, 2021 10:00 AM2021-02-26T10:00:00+5:302021-02-26T10:00:02+5:30

आपणही कर्माचा मोबदला मिळेल या आशेने नाही, तर कर्तव्य भावनेने सत्कर्माची सवय लावून घेऊया. 

This parable of the buttermilk worth of lakhs rupees; Read on! | लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा!

लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा!

Next

हिंदीत एक वाकप्रचार आहे, 'नेकी कर और दर्या में डाल' अर्थात सत्कर्म कर आणि त्याचा हिशोब ठेवणं विसरून जा. तुमचे कर्म चांगले असेल, तर आज ना उद्या त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल आणि तुमचे कर्म वाईट असेल, तर त्याची शिक्षा आज ना उद्या तुम्हाला निश्चित मिळेल. आपल्या कर्मापासून आपण पळवाट शोधू शकत नाही. कारण आपण कितीही पळालो, तरी कर्म आपल्याला शोधत येते आणि चिकटते. असे असेल तर मग सत्कर्मच का करू नये? 

एक गरीब मुलगा दारोदारी सामान विकून आपले आणि कुटुंबाचे पालन पोषण करत होता. गरीब असूनही त्याच्या ठायी शिक्षणाची ओढ होती. रात्रशाळेत  शिकून तो आपली ज्ञानलालसा भागवत होता. सकाळी काम, रात्री अभ्यास हा त्याचा नित्याचा क्रम होता. 

एक दिवस उन्हाचा दारोदार सामान विकत भटकत असताना त्याने एक दार ठोठावले आणि सामानाची खरेदी विक्री सोडून भांडभर पाणी प्यायला मागितले. दार उघडणाऱ्या मुलीने आत जाऊन भांडभर पाण्याऐवजी थंडगार ताक दिले. उन्हामुळे मुलाला तहान आणि भूक लागली असेल, या विचाराने मुलीने त्याची तहान ताकावर भागवली. लोणकढं ताक गटागटा पिऊन मुलगा तृप्त झाला. त्याने त्या मुलीचे मनापासून आभार मानले आणि त्या उपकाराची परतफेड कशी करू असे विचारले. 

यावर ती मुलगी म्हणाली, माझ्या आईने शिकवले आहे, की कोणालाही मदत केली, तर त्याचा मोबदला कधीच घेऊ नये. तुझी तहान भागली, याचा मला आनंद आहे. 

त्या मुलीचे बोल मुलाच्या मनात घर करून गेले. त्याने ठरवले, आयुष्यात आपणही एवढे सक्षम बनायचे, की आपल्यालाही कोणा गरजवंताला मदत करता येऊ शकेल. मुलगा आनंदाने परतला. तो दिवस रात्र मेहनत घेऊन शिष्यवृत्तीच्या जोरावर मोठा डॉक्टर बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. 

एक दिवस त्याच्याकडे शत्रक्रियेसाठी एक जटिल केस आली. त्याने रुग्णाची सविस्तर माहिती वाचली आणि केसस्टडी केली. रुग्णाच्या माहितीनुसार ती व्यक्ती डॉक्टरांच्या गावातली होती. आपल्या गावाचे नाव वाचून डॉक्टर मोहरले. त्यांनी अभ्यासपूर्ण उपचाराचा विचार केला आणि ठरलेल्या दिवशी शस्त्रक्रिया पार पाडली.

त्या व्यक्तीला शुद्ध आली. आणि काही दिवसात ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन डिसचार्ज घेऊ लागली. तेव्हा हॉस्पिटलचे बिल तिच्यासमोर आले. उपचाराचा खर्च आपल्याला परवडणार नाही, याची तिला खात्री होती. त्या व्यक्तीने भीत भीत लिफाफा उघडला. तर त्यात उपचाराचा लाखोवारी खर्च मांडला होता. परंतु त्यात सर्वात शेवटी बिल भरले गेले असल्याची नोंद होती. 

त्या व्यक्तीने चौकशी केल्यावर कळले, की डॉक्टर साहेबांनी ती रक्कम भरली होती. त्या व्यक्तीने डॉक्टरांची भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले. यावर डॉक्टर म्हणाले, 'तुम्ही काही वर्षांपूर्वी एका गरजू मुलाला भांडभर ताक पाजून उपचाराची किंमत कधीच फेडली आहे. तो गरजू मुलगा मीच होतो. आज मला मदतीची संधी मिळाली, याचा आनंद आहे. पण या मदतीची नोंद मी लगेचच मनातून पुसून टाकणार आहे. कारण मला शक्य तेवढे सत्कर्म करायचे आहे.' 

भांडभर ताकाची किंमत भविष्यात लाखो रुपये असेल, हे त्या मुलीला सेवाभावे मदत करतानाही जाणवले नसेल. परंतु तिचे सत्कर्म तिला शोधत आले आणि त्याचे फळही तिला मिळाले.  आपणही कर्माचा मोबदला मिळेल या आशेने नाही, तर कर्तव्य भावनेने सत्कर्माची सवय लावून घेऊया. 

Web Title: This parable of the buttermilk worth of lakhs rupees; Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.