शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

चित्रकला शिक्षक, हटयोगी ते अध्यात्मिक गुरु, प.पू.गुळवणी महाराजांचा चैतन्यमयी प्रवास!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 03, 2021 3:48 PM

सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, सत्संग धरावा, संसारातील आपत्ती व अरिष्टांनी खचून न जाता श्रद्धेने व विश्वासाने परमेश्वराची करुणा भाकावी, समर्पण वृत्तीने शरणागत होऊन साधना करावी. असा सद्गुरु गुळवणी महाराजांचा उपदेश आहे. 

सामान्य घरात जन्माला आलेले बालक आपल्या कलेने, गुणांनी, गुरुकृपेनी आणि सदाचरणाने गुरुपदाला कसे पोहोचते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुळवणी महाराजांचे चरित्र. त्यांना लाभलेला संत सहवास, दत्त गुरुंचे दर्शन, आत्मज्ञानाचा लागलेला शोध आणि अधिकारी पुरुषांचा सहवास हे सारेच विलक्षण आहे. गुळवणी महाराज यांच्याकडे दीक्षा घेण्यासाठी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी येत असत. पंचांगकर्ते पं. धुंडिराजशास्त्री दाते हे गुळवणी महाराजांना खूप मानत अत. सर चुनीलाल मेहता हे प्रांताचे अर्थमंत्री होते. ते मुंबईहून पुण्याला गुळवणी महाराजांच्या दर्शनासाठी आपल्या पत्नीसह आले. पुढे ते दोघे गुळवणी महाराजांचे शिष्य होऊन त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. ४ जानेवारी रोजी तिथीने त्यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांच्या समग्र आयुष्याचा थोडक्यात आढावा. 

वामनराव गुळवणी यांचा जन्म कोल्हापूरजवळ कुडुत्री या गावी मार्गशीर्ष वद्य १३ रोजी गुरुवारी, शके १८०८, दिनांक १३ डिसेंबर १८८९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प.पू. दत्तात्रय व मातेचे नाव उमादेवी होते. दत्तात्रय यांचे दोन विवाह झाले होते. वामनरव हे द्वितीय मातेचे चिरंजीव.

गुळवणी हे एक सदाचारसंपन्न, वैराग्यशील कुटुंब होते. वामनरावांना उपनयन संस्कारानंतर त्यांच्या वडिलबंधूंकडून धार्मिक आचाराचे शिक्षण मिळाले. त्यांनी संस्कृत ग्रंथाचे अध्ययन केले. बालपणापासून त्यांचा देवधर्माकडे ओढा होता. चित्रकलेचे त्यांनी शिक्षण घेतले होते. ते उत्तम चित्रकार होते. कोल्हापुरात त्यांनी फोटोग्राफीचे दुकान काढले होते. 

१९०७ साली श्री. टेंबे स्वामी महाराज गुरुदर्शनाला वाडीला आले. वामनरावांचे वडील बंधू त्या वेळी वाडीला होते. त्यांनी वामनरावांना टेंबे स्वामी महाराजांचा फोटो त्यात एक श्लोक गुंफून आणण्यास सांगितला. त्याप्रमाणे वामनराव तयारीने आले. वामनराव, टेंबे स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी वामनरावांना एक पेटी दिली. ती शेवटपर्यंत वामनरावांच्या हातात होती. त्या प्रसाद पेटीच्या प्रभावाने आपण श्री वासुदेव निवास बांधला. तेथे अमाप अन्नदान, द्रव्यदान करू शकलो अशी वामनरावांची श्रद्धा होती. 

१९०९ साली वामनराव मुंबईला येऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण कोठेच जमले नाही. नंतर ते गाणगापुरीला आले. त्यांनी गुरुचरित्राची सहा पारायणे केली. पुडे कुरुगुडी या गावी टेंबे स्वामी महाराज व वामनराव यांची भेट झाली. प्रथम दर्शनातच वामनरावांना गुरुप्रसाद मिळाला. ते सदासर्वकाळ गुरुसेवा करू लागले. गीता, विष्णू सहस्रनामाची संथा व आसन प्राणायाम व अजाण जपाची स्वामी महाराजांनी दीक्षा दिली. 

औदुंबर मुक्कामी त्यांनी श्रीमाला मंत्राचे पुनश्चरण केले. श्री क्षेत्र गरुडेश्वरी स्वामी महाराजांकडून ते ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे शिकले. श्री दत्तात्रेयाचे एकमुखी चित्र त्यांनी स्वामी महाराजांसाठी काढण्यास सुरुवात करताच वामनरावांना साक्षात दत्तात्रेयाचे दर्शन झाले. त्यांच्या चित्रकलेचे सार्थक झाले. 

वामनरावांनी १९१७ ते १९२६ पर्यंत बार्शी म्युनिसिपल शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी केली. १९२६ ते १९४२ पर्यंत नूतन मराठी विद्यालय पुणे येथे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या योगे चित्रकला शिक्षकाची नोकरी केली. आसेतू हिमाचल तीर्थयात्रा केल्या. 

नंतर बंगालमधील एक संन्यासी प.पू. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज व वामनराव यांचा हुशंगाबादला असताना परिचय झाला. त्याच स्वामी महाराजांनी वामनराव यांना योगदीक्षा देऊन शक्तिपात करण्याचे तंत्र शिकवले. वामनरावांनी स्वामी महाराजांच्या समवेत हटयोगातील श्रेष्ठ दर्जाच्या क्रिया, प्राणायाम व इतर कष्टसाध्य क्रिया आत्मसात करून घेतल्या. त्यामुळे वामनरावांचा अधिकार फार मोठा झाला. स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी अनेक शिष्योत्तमांना शक्तिपात करून सन्मार्गाला लावले. लोक वामनरावांना सद्गुरु गुळवणी महाराज म्हणून लागले. 

गुळवणी महाराजांना प्राप्त झालेल्या या अलौकिक विद्येने लोकांचीही कुंडलिनी जागृत करण्याची साधना प्राप्त झाली. श्री गुळवणी महाराजांनी १९२४ पासून ही दीक्षा देण्यास प्रारंभ केला. अखेरपर्यंत हा कार्यक्रम सुरू ठेवला. 

१९६५ साली गुळवणी महाराजांनी वासुदेव निवासाची स्थापना केली व आपले जीवन लोककल्याणासाठी आणि लोकांवर परोपकार करण्यासाठी घालवले.  सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, सत्संग धरावा, संसारातील आपत्ती व अरिष्टांनी खचून न जाता श्रद्धेने व विश्वासाने परमेश्वराची करुणा भाकावी, समर्पण वृत्तीने शरणागत होऊन साधना करावी. असा सद्गुरु गुळवणी महाराजांचा उपदेश आहे. 

भक्तीतून योग आणि योगातून परमज्ञान प्राप्त होते. हे सारे शिक्षण देणारे गुळवणी महाराज १५ जानेवारी १९७४ रोजी उत्तरायण लागल्यानंतर भीष्माचार्यांप्रमाणे थांबून भौतिक देह सोडून ब्रह्मलीन झाले. तिथीनुसार ४ फेब्रुवारी रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि कार्याला त्रिवार वंदन!!!