'Our soil, our people'; Saint Kabir is explaining the value of soil and people | 'आमची माती, आमची माणसं'; माती आणि माणसांचे मोल समजावत आहेत संत कबीर!

'आमची माती, आमची माणसं'; माती आणि माणसांचे मोल समजावत आहेत संत कबीर!

परदेशात गेलेली मुले, मातृभूमीकडे पाठ फिरवतात, अशी आरोळी आपण ठोकतो. पण, त्यांच्या वर्तनाला कुठेतरी आपणही जबाबदार असतो का? हे लक्षात घेतले पाहिजे. जी मुले बालपणी इथल्या मातीत खेळली, बागडली नाहीत, पडली-झडली नाहीत, त्यांची या मातीशी नाळ जुळणार तरी कशी? आपल्या मातीशी इमान राखायचा, तर मुळात मातीची किंमत कळणे गरजेचे आहे.  संत कबीर आपल्या दोह्यातून मातीचे मोल समजावून देत आहेत.

माटी कहे कुम्हार से तू क्या रुंदे मोहि
इक दिन ऐसा होयगा मैं रुंदूंगी तोहि - संत कबीर

या दोह्याचे निरुपण करताना लेखक प्रभाकर पिंगळे म्हणतात, संत कबीर हे एक जबरदस्त ताकदीचे संतकवी होऊन गेले.दुर्बलांच्या अंगी काय ताकद असते, हे त्यांनी वरील दोह्यात मस्त सांगितले आहे. माती कुम्हाराला म्हणजे कुंभाराला म्हणते की, अरे तू मला पायाखाली तुडवतोस काय? एक दिवस असा उजाडेल की मीच तुला तुडवेन! मातीची ही महती कुसुमाग्रजांच्या आगगाडी आणि जमीन या कवितेतही गायलेली आढळते. नको गं नको गं, आक्रांदे जमीन! पण आगगाडी मात्र त्वेषाने फुत्कार टाकत म्हणते की, अशीच चेंदत धावेन धावेन...! मातीला अन्याय असह्य होतो. जमीन हादरते. पूल कोसळतो आणि गाडीचा चेंदामेंदा होतो.

रुद्रास आवाहन करतानाही भा. रा. तांबे सांगतात, सामान्य लोकांच्या मनात स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग पेटला तर तो हत्तीवरून मत्त नृपाला खाली ओढतो. दुष्ट सिंहासने पालथी घालतो.

शिवाजी महाराजांसारखे नेतृत्व लाभले, तर हेटकरी, मेटकरीदेखील तलवारबहाद्दर होतात, एवढेच काय, तर स्वराज्यात गवतालाही भाले फुटतात. म. गांधींच्या देशात तर चमत्कारच घडतो. मदांध ब्रिटीश सत्ता उलथवून टाकण्यासाटी बायकामुलेही रस्त्यावर उतरतात. तीही नि:शस्त्र! वंदे मातरम सारखा मंत्र तळागाळातल्या लोकांना स्फुरण देऊन जातो.

विनोबांनी मातीसंबंधी सांगितले आहे, माती म्हणजे मोठी माता. मातेचे स्तन्य पिऊन आम्ही मोठे होतो. एरवी मातीबद्दल आपण तुच्छता बाळगतो. माझ्या आयुष्याची माती झाली, हा वाकप्रचार आपण नाश होणे या अर्थी वापरतो. पण हे अनुचित आहे. ज्या मातीपासून कुंभार मडकी घडवतो, तोही मातीला अगोदर पायाखाली तुडवतो. पण मातीचे वैशिष्ट्य तो ध्यानात घेतो का? माती कधीच सडत नाही, नासत नाही. सारे भौतिक जग मातीतून निर्माण होते. माती म्हणजे चैतन्य. ते सुप्त असते. या मातीतच जीवनातील सारा सुगंध, सारी चव भरलेली आहे. मातीवर सूर्यकिरण पडून ती अधिक ताकदवान होते. माती कधीच मरत नाही. ती अमर बनते.

आनंदवनात महारोग्यांची प्रेते जाळण्याऐवजी पुरतात आणि त्याजागी झाड लावतात. ताडोबाचे जंगल असेच फोफावले आहे. सारे सृष्टीसौंदर्य मातीतून निर्माण होते. निर्झर खळाळतात तेही मातीतच. 

पुराणात वर्णन केले आहे, की मातीवर म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा दैत्य माजतात, तेव्हा ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते. मग या गायीचे रक्षण करण्यासाठी ईश्वर अवतार धारण करतो. दैत्यांचा संहार करतो.

राम, कृष्ण, शिवाजी महाराज सारे महान अवतार मातीशी इमान राखत होते म्हणून त्यांनी जनसामान्यांच्या तनमनात प्राण फुंकून स्वत्वाची जाणीव त्यांना करून दिली. 

Web Title: 'Our soil, our people'; Saint Kabir is explaining the value of soil and people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.