ॐ नमो सद्‍गुरु वसंतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 PM2021-03-16T16:30:54+5:302021-03-16T16:31:16+5:30

  वसंत ॠतु येण्यात आहे. वसंत आला की, कवि मन विभोर होऊन गाऊ लागते.

Om Namo Sadhguru Vasantu | ॐ नमो सद्‍गुरु वसंतू

ॐ नमो सद्‍गुरु वसंतू

googlenewsNext

सदगुरु वसंंत

  वसंत ॠतु येण्यात आहे. वसंत आला की, कवि मन विभोर होऊन गाऊ लागते.          
               आला वसंत ऋतु आला 
                वसुंधरेला हसवायाला 
              सजवित नटवित लावण्याला 
               आला वसंत ऋतु आला 
              रसरंगाची करीत उधळण 
              मधुगंधाची करीत शिंपण 
                चैतन्याच्या गुंफित माला 
                    रसिकराज पातला 
                  आला वसंत ऋतु आला 
                    वृक्षलतांचे देह बहरले 
                 फुलाफुलांतून अमृत भरले 
       वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला
                      आला वसंत ऋतु आला 

मार्गशीर्ष पौष संपला की शिशीराची गोठवणारी थंडी वृक्ष तरुंना पर्णविरहित विरळ करुन जाते. अवघी प्रकृती जणु गारठून स्वतःच स्वतःला कवेत घेवून उब घेऊ पाहते.
मग वसंताची चाहूल सुरु होते. आम्रवृक्ष मोहरुन येतो.  निंंब सळसळू लागतो. अश्वस्थ वटाला तजेला येतो. कोकीळेला कंठ फुटतो. सृष्टी जणु चारी बाजुने आल्हादित होते. असा हा ॠतुराज वसंत येतो आणि दोन महिने का होईना, या काळात सृष्टीचे सौंदर्य जीवनात किती आनंददायी व उल्हासित करणारे असते ते कळते. परंतु
जीवनातील असे क्षण हे काही दिवसांचे असतात.  वसंत येतो व तसाच जातो.  परंतु एक वसंत आहे जो आला की मग कधीही जात नाही. हा वसंत आहे सदगुरुनाथ. या वसंतबद्दल श्री संत एकनाथ महाराज म्हणतात,
       ॐ नमो सद्‍गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू ।
         तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥
         तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें ।
           नवपल्लवीं विराजमानें । विरक्तपणें आरक्त ॥

भाग्यवान तो मनुष्य ज्याचे जीवनात सदगुरु वसंत येतो.
त्याची जन्मोजन्मीची तृष्णा, जन्मोजन्मीची प्रार्थना, जन्मोजन्मीची आर्तता  की सदगुरु वसंताचे त्याचे जीवनात आगमन होते.  असा सदगुरु वसंत ज्याचे जीवनात येतो तेव्हा त्या भाग्यवंत शिष्याचे जीवन आनंद गंधाने कसे मोहरुन जाते हे तोच जाणतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, 
               ओंकार स्वरुपा सदगुरुनाथा तुम्हाला नमन आहे. तुम्हीच खर्‍या अर्थाने सदा सर्वकाळचे वसंत ॠतु आहात. जीवा शिवाचे ऐक्याचे काळीच तो शिष्याचे अनुभवास येतो.  तुमच्या वसंतकाळीचा आनंद गंधीत वायु जेव्हां ज्ञान वनातून वाहू लागतो, तेव्हां अज्ञानाची जीर्ण पाने तत्क्षण गळून पडतात व ज्ञानाचे नवपल्लव उदयाला येतात जे विरक्तीचे रंगाने आरक्त होऊन प्रकाशतात.
              ज्यांनीही आपले जीवनात हा ज्ञानरुपी वसंत अनुभवला, त्यांचे जीवनात पुन्हा शिशीर नाही आला. वसंत ॠतुनंतर ग्रिष्म येतो. पण या वसंतॠतु पुढे ग्रिष्मही नाही. मागचा शिशीर गेला व पुढचा ग्रिष्म संपला. आपल्या अस्तित्वाला गोठवणारा भयाचा शिशीर गेला तर काम क्रोधाची तप्तता देणारा ग्रिष्मही संपला.  जसा वसंत ॠतु आला की वृक्ष वेलींवर फुले उमलतात,  तशी सदगुरु वसंतामुळे आनंदाची फुले उमलतात व त्याचा गंध इतरांना मिळू लागतो. पळस जसा भगव्या वैराग्य रंगाने तळपतो तसा वैराग्याचे रंगाने भक्तावरची चैतन्याची आभा खुलते. मनरुपी भ्रमर आता सदगुरुचे नावांचे गुंजन करु लागतेा. 
असा वसंतरुपी सदगुरु जगी सर्वांना लाभो.             
          सदगुरु श्री गजानन महाराज  सर्व भक्तजनाचें मनवनी ज्ञानरुपी वसंतरुपाने अखंड राहो. 
    अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज
            परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सदगुरू 
               श्री गजानन महाराज की जय
सदगुरु श्री संत एकनाथ महाराज चरणी श्रध्दा नमन !

 

- शं.ना.बेंडे पाटील अकोला.

Web Title: Om Namo Sadhguru Vasantu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.