No matter how big the ego, small looks before humility; Read the quarrel between the mango tree and the grass | अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण

अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण

आम्रवृक्ष मोठ्या डौलदारपणे उभा होता. वाऱ्याची एक लहानशी झुळूक येताच बाजूचे गवताचे पाते हलले. त्याबरोबर आम्रवृक्षाला हसू फुटले.  ते हसू छद्मीपणाचे होते. त्याला अहंकाराचा वास तर भरपूर होता. आपल्याला कोण हसले म्हणून गवताने मान उंचावून पाहिले. आम्रवृक्ष त्याला म्हणाला, 'किती नाजूक रे तू? मी मात्र लहानपणापासून कणखर बरं का! नमणं, वाकणं, घाबरणं मला ठाऊक नाही!' 

त्यावर गवताचे पाते हळू आवाजात म्हणाले, 'भीती वाटत नाही, हे ठीक आहे. परंतु विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.'
 
यावर तो आम्रवृक्ष खदाखदा हसून म्हणाला, `कसला देव आणि कसले काय? काही खरं नसतं. सगळं काही मीच. आता हेच बघ ना! माझी इच्छा नव्हती म्हणून नाही हललो मी, आता मी तुला हलून दाखवतो बघ!' असे म्हणून तो गदागदा हलू लागला.

परंतु गवताच्या पात्याच्या लक्षात आले, केवळ अचानक सुटलेल्या वादळामुळेच तो हलत होता. परंतु अहंभावामुळे त्याला त्याची जाणीव नव्हती. पाहता पाहता वादळवारा वाढला. सगळ्या वातावरणाला घाबरवणारा, थरकाप उडवणारा विचित्र वेग आला. पाहता पाहता आंब्याचे झाड उन्मळून पडले आणि परमेश्वरावर विसंबून असलेले नाजूक, छोटे गवताचे पाते मात्र नम्रतेने तसेच तग धरून उभे होते. तेही वंदनीय होऊन.

म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे, 'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.' तसेच,समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, 

जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेधी,
तया भोजनाची रुचि प्राप्त कैची,
अहंभाव ज्या मानसीचा विरेना,
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना।। श्रीराम।।

 

Web Title: No matter how big the ego, small looks before humility; Read the quarrel between the mango tree and the grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.