Nishchayacha mahameru, bahut janansi aadharu ... | निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू...

निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू...

- मोहनबुवा रामदासी

निश्चयेवीण सर्वकाही। अनुमान ते प्रमाण नाही।
व्यर्थची पडिले प्रवाही। संदेहाचे।।
जगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन यश व अपयशाने भरलेले असते. माणसाला जीवनात यशाची शिखरे सतत साद घालत असतात, पण माणूस भूतकाळातील अपयशाने होरपळून निघालेला असतो. त्यामुळे त्याच्या मनात निश्चय घेण्याचे धाडस डळमळीत असते. प्रत्येक व्यक्तीच्या अशा अपेक्षा भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात. कुणाला ईश्वराचा भक्त व्हायचे असते. कुणाला झटपट श्रीमंत व्हायचे असते. कुणाला समाजात मानसन्मानाची हाव सुटलेली असते. एक ध्येय निश्चित नसल्याने त्यांची स्थिती भांबावलेली दिसते. त्यामुळे अनेकजण अस्वस्थ दिसतात. ध्येयाची निश्चिती झाली तरी त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा हेच त्याला समजत नाही. कोणता मार्ग स्वीकारावा व कोणता मार्ग स्वीकारू नये याबाबतीत त्याच्या मनात सारखा संशयकल्लोळ माजलेला दिसतो. म्हणून समर्थ म्हणतात:
व्यर्थ संशयाचे जिणे। व्यर्थ संशयाचे धरणे।
व्यर्थ संशयाचे करणे। सर्व काही।।
मनातील संशयाचा विवेकाने त्याग करून उच्चतम ध्येयाच्या प्राप्तीचा दृढनिश्चय होत नाही तोवर सर्वच व्यर्थ आहे. जोपर्यंत मनाचा पक्का निश्चय होत नाही तोपर्यंत बोलाचा भात व बोलाची कडी अशीच अवस्था होते. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ज्या श्री समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना म्हटले होते....
निश्चयाचा महामेरू।बहूत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू।श्रीमंत योगी।।
त्या छत्रपतींचे आम्ही आज्ञाधारक मावळे आहोत, तर छत्रपतींचा हा निश्चयात्मक स्वरूपाचा बाणा प्रत्येक मावळ््याच्या अंत:करणात असलाच पाहिजे. आपला भारत देश अशा दृढनिश्चयी, करारी आणि वीर पुरुषांची ओळख असणारा देश आहे. आपल्या देव, देश व धर्माची निश्चयात्मक अशी अस्मिता जपूया.

Web Title: Nishchayacha mahameru, bahut janansi aadharu ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.