Margashirsha Vinayak Chaturthi 2025: २१ नोव्हेंबरपासून मराठी वर्षात अनन्य साधारण महत्त्व असलेला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. मार्गशीर्ष महिन्यात जवळपास ९० प्रकारची व्रते केली जातात, असे मानले जाते. पैकी अनेक व्रते कालौघात मागे पडल्याचे दिसून येते. परंतु, प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत आवर्जून केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, कसे व्रत पूजन करावे? जाणून घेऊया...
गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी सोमवारी येत असल्यामुळे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. महादेव शिवशंकरांसह गणपतीची पूजा करणे पुण्याचे मानले गेले आहे.
विनायक चतुर्थी गणपती पूजन कसे करावे?
विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून नित्यकर्मे करावीत. दिवसभर उपवास करावा. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करावी. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. षोडशोपचार पद्धतीने पूजा शक्य नसेल, तर पंचोपचाराने गणपती पूजन करावे. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा.
विनायक चतुर्थीला उपवास कसा करावा?
संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत.
विनायक चतुर्थीला ‘या’ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा
अनेकदा मनात इच्छा असूनही व्रत पूजन करता येतेच असे नाही. अशावेळेस गणपती बाप्पाला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात. सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात, असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला मनोभावे नमस्कार करावा. प्रार्थना करावी. गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : Vinayak Chaturthi in Margashirsha month is auspicious. Observe fast, worship Lord Ganesha with devotion. Offer Durva grass, sweets, and red hibiscus flowers. Seek blessings for prosperity and wisdom. Follow traditions and visit temple if possible.
Web Summary : मार्गशीर्ष महीने में विनायक चतुर्थी शुभ है। उपवास रखें, भगवान गणेश की भक्ति से पूजा करें। दूर्वा घास, मिठाई और लाल गुड़हल के फूल अर्पित करें। समृद्धि और ज्ञान के लिए आशीर्वाद लें। परंपराओं का पालन करें और यदि संभव हो तो मंदिर जाएं।