>> योगेश काटे, नांदेड
आमच्या मराठवाड्यात विशेष करून लातुर ,धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील परिसरात शेतकरी वर्गातील महत्त्वाचा सण म्हणून येळ अमावस्या साजरी करतात. मुख्यत्वे हा सण कर्नाटक प्रांतात साजरा केला जातो.मराठी महिन्यातील मार्गशीर्ष महिन्याच्या आमावस्येला वेळ अमावस्या म्हणतात. तसेच नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे खंडोबाच्या जत्रेस सुरुवात ही जत्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. तर मुळात येळ्ळा शब्द हा कानडी आहे. येळ्ळ अमावस्या असा आहे. म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या.
महालक्ष्मीचा सण घरोघरी भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा केला जातो, त्याच धर्तीवर शेतकरी शेतात हा सण साजरा करतात. गावोगावी कोणीही घरात न थांबता सगळे गाव शेतात जाते. या काळात गावांची अवस्था संचारबंदी लागू केल्यासारखी असते. मोठय़ा उत्साहाने आपापल्या कुवतीप्रमाणे इष्टमित्रांसह हा सण साजरा केला जातो. बाजरी व ज्वारीचे उंडे, सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली भाजी (भज्जी), गव्हाची खीर, दही, धपाटे, अंबील या पदार्थाना प्राधान्य दिले जाते. वनभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर डहाळे, ऊस, बोरे व मधाचा आस्वाद घेतला जातो. सायंकाळी उत्तर पूजेनंतर गोवरीच्या खांडावर मातीच्या भांड्यात दूध तापवले जाते. दूध उतू जाईल त्या दिशेला पुढच्या वर्षी चांगले पीक येणार असे गृहीत धरले जाते.येळ अमावस्येनंतर थंडी कमी होते. अमावस्येच्या दिवशी पेटवलेल्या पलित्याने (हेंडगा) थंडीला चटका बसतो, असा समज आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणात बदल झाल्यामुळे येळ अमावस्येनंतरच खऱ्या थंडीला प्रारंभ होत आहे. मात्र, पूर्वापार सुरू असलेली ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. काळ्या आईवर श्रद्धापूर्वक प्रेम केले पाहिजे, तिच्या भरणपोषणाची काळजी घेतली पाहिजे व मातेप्रमाणेच तिच्याशी नाते जोडले पाहिजे हा संस्कार देणारा सण म्हणजे येळ अमावस्या. त्यामुळेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पौष महिन्यातील मुख्य सण : भोगी , मकर संक्रांत , पुसातील ऐतवार , पौष शु. एकादशी संत कवि श्री दासगणू महाराज यांची जयंती
आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!
भोगी : भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण आहे.पौष महिन्यात 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच भोगी सण होय!भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे..आनंद घेणारा वा उपभोगणारा! घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रीत पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली व महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशाप्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. मराठवाड्यात ब्राह्मण समाजात विड्याच्य पानात पुजेची सुपारी टाकून ती पाने सुतवतात आणि हळद कुंकू करुन सवाष्णीस देत असत. भोगी ची भाजी तर सर्व प्रसिद्ध आहे. गाजर, जांब,बोर, वाल्याची शिंग ,वांगे मिश्रीत असो.
पौष महिन्यातील सुर्योपासना : धर्नुमासात भगवंतास रोज हुग्गी चा नैवद्य दाखवण्यात येतो व येळ अमावस्या येताच पौषाची चाहुल लागते. पौष महिना विशेष म्हणजे अतिशय महत्वाचा महिना या महिन्यात सुर्योपासना करणे अत्यंत फलदाय व लाभदायक आहे मग या उपासनेत सौरसुक्त , आदित्य ह्दय स्तोत्र पठण महत्वाचे आहे मराठवाड्यात विशेषातः ब्राह्मण कुटुंबात पौषातल्या प्रत्येक येणार्या रविवारी स्त्रिया व पुरुष ही सुर्योपासना करतात.विशेषतः रविवारी सुर्येदयाच्या पुर्वी स्नान व सुर्याची पुजा करणे आवश्यक आहे. हि पुजा खास असते. एका पाटावर सुर्यानारायणाची रांगोळी काढायची त्याची विधवत पुजा करायची व त्याला नैवेद्यासाठी गाजर बोर टाहाळाचे धाटे जांब यापैकी काही उपलब्ध असेल ते ठेवायचे. मग भाजलेल्या तांदूळ व मुगाच्या दाळीची खिचडी अथवा धपाटे वा दशम्या करायची प्रथा आहे. .पुसातील शेवटच्या रविवार ला भानुरविवार असे म्हणतात व रथसतप्तीच्या दिवशी पायसाचा नैवद्य दाखवायचा. या दिवशी रथारुढ आदित्य राणोबाई सहीत सुर्यनारायणाची रांगोळी काढुन पायसाचा नैवैद्य दाखवायचा.
मकरसंक्रमण : सध्या फक्त खगोलीय दृष्ट्या माहिती पाहुयात नंतर धार्मिक व लोकरुढीप्रमाणे पाहु. संक्रमण याचा अर्थ क्रमण करून जाणे असा आहे. अर्थात मकर नावाच्या नक्षत्रराशीत सूर्याचा प्रवेश होणे यालाच मकरसंक्रमण म्हणतात. एका वर्षात सूर्य बारा राशींतून जातोसा दिसतो म्हणजे त्या मुदतीत बारा संक्रमणे होतात. त्यांपैकी मकर व कर्क ही महत्त्वाची मानली आहेत. पौषातील मकरसंक्रमण हे उत्तरायणाचा व आषाढातील कर्कसंक्रमण दक्षिणायानाचा आरंभ सूचित करतात. उत्तरायणास प्रारंभ झाल्यापासून सूर्याची गती उत्तरेकडे वळल्याप्रमाणे दिसत असून दिवसाचा काल क्रमाने वाढत जातो, तसतशी रात्र कमी होत जाते.
दक्षिणायनात याच्या उलट होते.कित्येक विद्वानाचे मत आहे की, उत्तरायणाचा आरंभ हाच पूर्वकाली दिवस असावा पंचांगणिताप्रमाणे कार्यक्र (जानेवारीच्या १३-१४ तारखेच्या सुमारास होत असते. पृथ्वीवर उत्तरेकडील प्रदेशात २२ डिसेबर रोजी रात्र सर्वांत मोठी असते जाऊन दिवसाचा काल वाढत जातो , असे होता होता २१ मार्च रोजी दिवस रात्र ही सारखी असतात. पुढे दिवस मोठा होत जाऊन ता. २१ जून रोजी तो मोठा होत असतो. नंतर दिवस कमी होत जाऊन ता. २३ सप्टेंबर रोजी दिवस व रात्र ही पुनः सारखी होतात. मकर राशीवर सूर्य आल्याचा निर्देशक मकरसंक्रांत हा सण प्रचारात आला. काही ठिकाणी कर्कसंक्रांतीही साजरी करतात.