Maghi Ganeshotsav 2024: लुसलुशीत, पांढरे शुभ्र, उकडीचे मोदक बनवणार असाल तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:45 AM2024-02-12T11:45:54+5:302024-02-12T11:47:49+5:30

Maghi Ganeshotsav 2024: यंदा १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सव आहे, त्यानिमित्त तुम्हीसुद्धा उकडीचे मोदक बनवणार असाल तर दिलेल्या टिप्स नक्की वापरून बघा!

Maghi Ganeshotsav 2024: Make sure to follow these tips to make luscious, white, tasty Ukdi Modak! | Maghi Ganeshotsav 2024: लुसलुशीत, पांढरे शुभ्र, उकडीचे मोदक बनवणार असाल तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा!

Maghi Ganeshotsav 2024: लुसलुशीत, पांढरे शुभ्र, उकडीचे मोदक बनवणार असाल तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा!

उकडीचे मोदक हा बाप्पाचा आवडता खाऊ आणि आपल्या सगळ्यांचाही वीक पॉईंट! मात्र तो जोवर छान तयार होऊन उकडून सुखरूप बाहेर येत नाही तोवर सगळ्याच सुग्रणींच्या जीवाला घोर लागून राहतो. यासाठी चांगली उकड, त्यासाठी चांगला तांदूळ आणि योग्य प्रमाणात गोड सारण कसे तयार करायचे, हे जाणून घेण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा, जेणेकरून तुम्हीसुद्धा लुसलुशीत, पांढरे शुभ्र, चविष्ट उकडीचे मोदक बनवू शकाल!

१ उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा. नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान बनते. 

२. मोदकाच्या पिठासाठी आंबेमोहोर, इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावे. एकट्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात. किंवा नुसत्या आंबेमोहोर तांदळात घरचा भाताचा तांदूळ एकत्र करावा. 

३. तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या. खूप चोळून धुवू नये अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो. 

४. १५ ते २० मिनिटं तांदूळ निथळत ठेवावा नंतर घरात सावलीत सुती कापडावर तो वाळवून घ्यावा, पण उन्हात नाही!

५. तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो बारीक दळून आणावा. मिक्सरला दळू नये. दळून आणल्यावर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरावे. 

६. मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा. नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे अन्यथा सारण बिघडू शकते. 

७. खवलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्धा गूळ घ्यावा. 

८. गूळ-खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि पंधरा मिनिटं एकजीव होऊ द्यावे. 

९. सारण करायला लोखंडी कढई वापरा. त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग चव येईल. 

१०. सारण साजूक तुपावर करावे. आवडत असल्यास त्यात खसखस घालावी. 

११. सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे. कढईत ओलावा दिसेनासा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे. 

१२. सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात दोन चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर दोन चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे. 

१३. सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही, मोदक उकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते. 

१४. सारण नीट शिजले गेले पाहिजे नाहीतर सारण वाफवताना पाणी बाहेर येते. 

१५. सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची, जायफळ पावडर घालावी. गरम असताना घातली असता तिचा सुवास लागत नाही. 

१६. तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा नारळाच्या किशीचा केस येता कामा नये, अन्यथा मोदक वळताना त्या सारणामुळे मोदक फुटू शकतो. 

१७. उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाड बुडाचे भांडे वापरावे. 

१८. उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यायचे. पिठाचा चिकटपणा किती असेल याचा अंदाज सुरुवातीला येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातून अर्धा वाटी पाणी बाजूला काढून ठेवा. पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धा वाटी पाणी वापरावे. 

१९. नव्या तांदळाला चिकटपणा जास्त असल्याने पाणी मोजून मापून घ्यावे लागते, तर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते. 

२०. उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात आणि उकड मऊ राहते. 

२१. उकड काढताना तूप टाकावे. त्यामुळे मोदकांना छान लकाकी येते आणि मोदक वळताना पिठी हाताला चिकटत नाही. मात्र तूपही प्रमाणात टाकावे. नाहीतर तूप जास्त झाल्याने मोदक वाफवताना फुटतात आणि तूप कमी झाले तर वाफवून झाल्यावर चिवट होतात. उदा. एक वाटी पीठाला अर्धा चमचा तूप उकड करताना घालावे. 

२२. उकड काढताना चिमूटभर मीठ आणि चिमूटभर पिठीसाखर घालावी. यामुळे देखील छान चव आणि लकाकी येते. 

२३. दूध पाणी उकळल्यावर त्यात तांदळाची पिठी घालावी. मोदकासाठी उकड मऊ होणे गरजेचे असते. उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा हबका मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर २-३ मिनिटं झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी. 

२४. वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी. नंतर एका वाटीच्या सहाय्याने पिठाच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यावी. 

२५. गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्यात हात लावून पीठ मळावे. जेणेकरून चटका लागणार नाही आणि उकड मऊ लुसलुशीत मळता येईल. 

२६. उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे. त्या गोळ्याला भेग पडत नसेल तर उकड व्यवस्थित तयार झाली असे समजावे. 

२७. मोदक लगेच वळणार नसाल, तर उकड ओल्या कापडाने किंवा भांड्याने झाकून ठेवावे. 

२८. मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढीच उकड घ्यावी, बाकीची पुन्हा झाकून ठेवावी. घेतलेले पीठही पुन्हा मळून घ्यावे. 

२९. उकडीचा छोटा गोळा करावा. तो तांदुळाच्या पिठीत बुडवून घ्यावा. पीठीच्या सहाय्याने पारी तयार करावी. पारी करताना काठापासून सुरुवात करावी आणि तसे करत मधल्या भागी जावे आणि खोलगट वाटी करून घ्यावी. तांदळाच्या पिठीमुळे पारी करणे सोपे जाते. 

३०. पारी मध्ये थोडी जाडसर आणि बाजूला पातळ असावी म्हणजे मोदक फुटत नाही आणि कळ्या सुबक येतात. 

३१. पारीत सारण भरताना प्रमाणात भरावे. कमी नाही व जास्तही नाही, तर बेताने भरावे. 

३२. पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा. चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा. नंतर त्या पाकळ्या जवळ करून मोदकाचे टोक काढावे.  

३३. जर हाताने खोलगट पारी करता आली नाही तर पारी लाटूनही करता येईल. ती बाजूने पातळ व मध्यभागी जाडसर ठेवावी. 

३४. मोदक करताना अध्ये मध्ये हात धुवून घ्यावेत. नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते. 

३५. मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकावे. त्यामुळे मोदक कोरडे पडणार नाहीत. 

३६. मोदक वाफवण्यासाठी चाळणी किंवा इडली पात्र वापरावे. मात्र मोठे छिद्र असलेली चाळणी वापरू नये. 

३७. मोदक वाफवताना हळद किंवा केळीचे पान वापरावे. त्यामुळे मोदकाला छान वास आणि चव येते. मोदक वाफवायला ठेवण्या आधी पानाला तुपाचा हात लावून घ्यावा. म्हणजे मोदक चिकटणार नाहीत. 

३८. मोदक वाफवायला ठेवताना परस्परांना चिकटणार नाहीत अशा बेताने ठेवावेत. मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवावेत म्हणजे मोदकाला तडा जाणार नाही. 

३९. मोदक पात्रातील पाणी उकळल्यावरच मोदकाची चाळणी वाफायला ठेवावी. 

४०. केसर आवडत असल्यास केसर दूध मोदकाला लावून घ्यावे. केशराची चव मोदकात छान उतरते. 

४१. दहा मिनिटात मोदक छान शिजतात. ते तयार झालेत की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून बघावा. मोदक हाताला चिकट लागला नाही तर तो तयार झाला असे समजावे. यावेळी मोदकास विशिष्ट लकाकी येते. हीदेखील मोदक तयार झाल्याची खूण समजावी. 

४२. मोदक व्यवस्थित वाफवून घ्यावेत नाहीतर ते कच्चे राहू शकतात. मोदक तयार झाल्यावर चाळणी बाहेर काढावी. नंतर हाताला पाणी लावून एक एक मोदक बाहेर काढावा. गरम मोदक झाकून ठेवू नयेत, तर वाफ मोडल्यावर ते झाकून ठेवावेत. नाहीतर मोदकातील गूळ वितळून त्याचा पाक बाहेर येतो. 

Web Title: Maghi Ganeshotsav 2024: Make sure to follow these tips to make luscious, white, tasty Ukdi Modak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.