Magh Vijaya Ekadashi 2026 Vrat Puja: माघ महिना सांगतेकडे आला आहे. अवघ्या काही दिवसांनी माघ महिना समाप्त होऊन फाल्गुन महिना सुरू होईल. तत्पूर्वी, माघ महिन्यातील वद्य एकादशीला विजया एकादशी संबोधले जाते. अनेकार्थाने ही एकादशी महत्त्वाची मानली जाते. विजया एकादशीचे व्रतपूजन, पूजाविधी आणि सांगता याबाबत जाणून घेऊया...
शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी विजया एकादशी आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. माघ वद्य एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते.
विजया एकादशीचे महत्त्व अन् महात्म्य
काही मान्यतांनुसार, रामायणात सीता मातेच्या अपहरणानंतर लंकेवर विजय मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी विजया एकादशीचे व्रत केले होते. ब्रह्माजींनी नारदजींना सांगितले होते की, जो साधक या व्रताचे माहात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पद्म पुराणानुसार, भगवान शंकरांनी स्वतः नारदजींना उपदेश करताना सांगितले होते की, एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो, त्याला पुण्यफलप्राप्ती होते. तसेच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळण्याची संधी वाढते, अशी श्रद्धा आहे.
विजया एकादशीचा व्रतपूजा विधी
विजया एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.
विजया एकादशी व्रताची सांगता कशी कराल?
विजया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
Web Summary : Vijaya Ekadashi, observed on February 13, 2026, is dedicated to Lord Vishnu. Observing this fast brings success. The puja involves establishing Vishnu, offering Panchamrit, flowers, and reciting Vishnu Sahasranama. Avoid negative thoughts and offer gratitude at the fast's conclusion. Seek forgiveness for unintentional errors.
Web Summary : विजया एकादशी, १३ फरवरी २०२६ को, भगवान विष्णु को समर्पित है। यह व्रत सफलता लाता है। पूजा में विष्णु स्थापना, पंचामृत, फूल अर्पण और विष्णु सहस्रनाम का पाठ शामिल है। नकारात्मक विचारों से बचें और व्रत के अंत में आभार व्यक्त करें। अनजाने में हुई गलतियों के लिए क्षमा मांगें।