प्रिय व्यक्ती मग ती कोणीही असो, आपले आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, आजी, आजोबा, गुरुजन...ही न संपणारी यादी आहे. आपल्याला ऊर्जा देणाऱ्या, जगायला बळ देणाऱ्या लोकांचा गराडा आपल्या भोवती असावा असे आपल्याला कायम वाटते. काही काळासाठी झालेला विरहसुद्धा आपल्याला सहन होत नाही आणि ती व्यक्ती हे जग सोडून जाईल या नुसत्या कल्पनेनेही त्रास होतो, अस्वस्थ वाटते. यावर गौर गोपाल दास यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे.
'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ' गदिमा यांनी लिहिलेल्या या सुंदर ओळी मनुष्य जीवनाचे सार आहे. जे जे आपण आपलं म्हणत जीवापाड जपतो, एकतर त्या गोष्टी, माणसं कालपरत्वे आपल्यापासून दुरावतात किंवा आपणच जग सोडून जाताना त्यांच्यापासून दुरावतो. म्हणजे असा नाहीतर तसा विरह होणार हे ठरलेले आहे. हेच सूत्र धरून गौर गोपाल दास म्हणतात, 'भेटी होतात तेव्हा विरह होणार हे ठरलेलेच असते. हे गृहीत धरूनच मनाशी चंग बांधून ठेवायचा, की हा विरह पचवावा लागणारच आहे. खुद्द आईलाही नऊ मास आपल्या पोटात वाढणारे बाळ आपल्यापासून विलग व्हावे असे वाटत नाही, पण ते तो धागा तुटल्याशिवाय पुढची गाठही पडणार नाही हे तिला माहीत असते म्हणून ती प्रसूती वेदना सहन करून, बाळाला स्वतंत्र अस्तित्त्व देते.'
'व्यक्तीचा विरह होऊ नये, हे जग सोडून जाऊ नये, आपल्यापासून दूर होऊ नये हा कितीही विचार केला तरी तसे होणे शक्य नाही. आपल्या सगळ्यांच्या शेवटच्या प्रवासाचे तिकीट आधीच काढून तयार आहे. बोलावणे आले की त्या प्रवासात आवडत्या वस्तू घेऊन जायलाही उसंत मिळणार नाही. जे काही आहे ते इथेच सोडून नेसल्या वस्त्रानिशी जावे लागणार आहे. हेच आपल्या प्रिय व्यक्तींचाही बाबतीत घडणार आहे. हे लक्षात घेऊन ती व्यक्ती दूर गेली किंवा कायमची सोडून गेली तर माझे कसे होणार? या विचारात वेळ वाया घावण्यापेक्षा ती व्यक्ती जवळ असताना, समोर असताना तिच्या सान्निध्यात चांगल्या आठवणी तयार करा. ते क्षण भरभरून जगा. खेळा, हसा, बोला, आनंद, दुःख यांची देवाण घेवाण करा. त्यामुळे ती व्यक्ती समोर नसली तरी तिच्या संबंधित याच आठवणी भविष्यात तुम्हाला जगण्याचे बळ देतील. त्यामुळे विरहाची चिंता सोडा, आत्ताचा क्षण आनंदाने जगा, हेच जीवनाचे गुपित आहे.'
गौर गोपाल दास यांनी केलेले मार्गदर्शन पाहता गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या गाण्याचे शब्द आठवतात,
आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तूजो भी है बस यही एक पल है
अनजाने सायों का राहों में डेरा हैअनदेखी बाहों ने हम सब को घेरा हैये पल उजाला है, बाकी अँधेरा हैये पल गँवाना ना, ये पल ही तेरा हैजीने वाले सोच लेयही वक़्त है कर ले पूरी आरज़ू