तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी, वागीश्वरी!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 5, 2021 16:52 IST2021-01-05T16:52:18+5:302021-01-05T16:52:40+5:30
देवी शारदेने कधीही कोणातही भेदभाव केला नाही. तिच्या ज्ञानगंगेवर जो कोणी आपली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी आला, त्याला शारदेने कधीही विन्मुख होऊ दिले नाही. जगात एवढे ज्ञान आहे, की ते घेत असताना 'घेशिल किती कराने', अशी आपली अवस्था होते.

तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी, वागीश्वरी!
ज्योत्स्ना गाडगीळ
बाळ जन्माला आल्यावर हुंकाराने बोलते, मग एक एक शब्द, एक एक वाक्य असे करत पुढे पुुढे ते एवढे बोलते, की त्याला गप्प बस असे सांगावे लागत़े. एवढेच काय मुके लोकसुद्धा हातवारे करत त्यांच्या समुहात भरपूर बोलतात. हा सर्व संवाद घडतो, तो शब्दांच्या आधारावर. चार शब्दांना व्याकरणाचा सांधा जोडला, की वाक्य बनते. वाक्य नीट तयार झाले, तरच अर्थबोध होतो. शब्दांशिवाय आपण अपूर्ण आहोत. म्हणून दासबोधात समर्थ रामदास स्वामी शब्दस्वामिनीला शरण जाऊन म्हणतात,
जे परमार्थाचे मूळ, नातरी सद्विद्याचि केवळ,
निवांत निर्मळ निश्चळ, स्वरूपस्थिती।
देवी शारदे, तुझ्यामुळे आमचा शब्दांशी परिचय झाला. शब्दांनी आमचे कुतुहल जागे केले. भाषा कळली आणि विविध भाषेमधून उपलब्ध असलेले विपुल साहित्य मिळाले. या ज्ञानगंगेत आम्हाला तुझाच आधार आहे. तुझ्यामुळे आमच्यासाठी ज्ञानाची, विषयांची, विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली. तुझ्यामुळेच आम्हाला ज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, भाषा कळल्या. व्यवहार ज्ञान कळले.
हेही वाचा : जिवंतपणी अन्नदान करा, नाहीतर मृत्यूपश्चात उपाशी राहाल; वाचा रामायणातील ही कथा!
जो तुझा सेवेकरी आहे, तो तुझी सविस्तर ओळख करून घेतो. ग्रंथ वाचतो, चिंतन करतो, आपल्या ज्ञानाचा दुसऱ्यासाठी वापर करतो. याउलट जो ज्ञानाचा आळस करतो त्याच्यासमोर कितीही महत्त्वपूर्ण ग्रंथ ठेवला, तरी तो उघडून बघायचेदेखील कष्ट घेत नाही. आणखी एक वर्ग असतो, पढत मूर्खांचा, जो ज्ञान असूनही त्याचा वापर न करता, दुसऱ्याच्या बुद्धीने चालतो. समर्थ अशा लोकांवर थेट टिका करतात.
परंतु, देवी शारदेने कधीही कोणातही भेदभाव केला नाही. तिच्या ज्ञानगंगेवर जो कोणी आपली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी आला, त्याला शारदेने कधीही विन्मुख होऊ दिले नाही. जगात एवढे ज्ञान आहे, की ते घेत असताना 'घेशिल किती कराने', अशी आपली अवस्था होते. तिच्याकडून आपण शब्द, घेतो, तसाच आशीर्वादही घेतला पाहिजे. तिच्या आशीर्वादाशिवाय शब्दांना तेज येणार नाही.
एखाद्याच्या शब्दाला वजन असते, कोणाचे शब्द प्रभावी असतात, कोणाच्या शब्दांमध्ये सामर्थ्य असते. ही सगळी देवी शारदेची कृपा. याउलट जे लोक आपल्या शब्दांनी समोरच्यावर आघात करतात, अवमान करतात, स्वार्थासाठी शब्द टाकतात, अशा लोकांच्या शब्दाला समाजात किंमत मिळत नाही. त्यांचा शब्द प्रमाण मानला जात नाही.
हे शब्द सामर्थ्य आणि त्यावरील शारदेचे प्रभूत्व लक्षात घेता समर्थ रामदास स्वामी सांगतात, तिला वंदन केल्याशिवाय आणि तिचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून समर्थांनी गणेशापाठोपाठ देवीची उपासना करून तिचे आशीर्वाद मिळवले आहेत. आपणही शारदेला शरण जाऊया आणि आमच्या बुद्धीचे जडत्त्व दूर होऊ दे, अशी प्रार्थना करूया.
हेही वाचा : त्याग वासनेचा, देई ठेवा आनंदाचा!