Kuber Dev Favourite Zodiac Signs: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेकविध देवी-देवतांचे पूजन केले जाते. प्राचीन काळापासून ही परंपरा आजपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळते. आपापल्या श्रद्धा, मान्यतांनुसार भारतात आपापल्या आराध्यांचे पूजन केले जाते. आपापले कुळाचार कुळधर्म यांप्रमाणे देवी-देवता, कुलदेवता-कुलदेवी यांचे पूजन केले जाते. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांमध्ये कुबेर देवाचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. कुबेर हा यक्षांचा अधिपति समजला जातो. माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचे महत्त्व आहे. देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा अधिपती म्हणजे कुबेर देव. धनाची देवता म्हणूनही कुबेर देवाचे पूजन केले जाते.
कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असे म्हणतात. लक्ष्मी- कुबेर पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देवी लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून, कुबेर हा देवतांच्या संपत्तीचा रक्षक मानला जातो. लक्ष्मी देवी संपत्तीची देवी आहे पण संपत्तीचा हिशेब कुबेर ठेवतो. तिरुपती बालाजींनी विवाहासाठी त्याच्याकडूनच कर्ज घेतल्याची आख्यायिका आहे. कुबेराचे स्वतंत्र मंदिर देशात काही ठिकाणी आढळतात. धनत्रयोदशी आणि दिवाळीला देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशासोबत कुबेर देवाचीही पूजा केली जाते, त्यामुळे घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, अशा ५ राशी आहेत, ज्यांच्यावर कुबेर देवाचा आशीर्वाद असतो. त्यांना पैशाशी संबंधित समस्यांचा जास्त प्रमाणात सामना करावा लागत नाही, अशी मान्यता आहे. जीवनात समृद्धता, ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. या राशींना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कुबेर देवाची कृपा कायम राहते, अशा कोणत्या राशी आहेत? जाणून घेऊया...
५ राशींवर कुबेराचे कायम वरदान, धनलक्ष्मी प्रसन्न
वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र सुख, वैभव, कीर्ती, आदर, ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. या राशींच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते लोकांना लवकर प्रभावित करतात. वृषभ राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद कायम राहतो, अशी मान्यता आहे. जीवनात काही आव्हानांना तोंड दिल्यावर त्यांना अपार यश प्राप्त करता येते. ज्या क्षेत्रात काम करतात, त्या क्षेत्रात नाव कमावतात. संपत्ती, समृद्धता मिळते. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. नेहमी चांगल्या गोष्टी आवडतात. भौतिक सुखांनी अशा व्यक्ती वेढलेल्या असतात, असे म्हटले जाते.
कर्क: या राशीचा स्वामी चंद्र देव आहे. कर्क राशीच्या व्यक्ती मनमिळावू असतात. त्या लवकर लोकांमध्ये मिसळतात. कर्क राशीचे लोक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. लवकर पराभव स्वीकारत नाही. एखाद्या गोष्टीत यश मिळाले नाही, तर ते त्या गोष्टीच्या मागे लागतात आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो, असे मानले जाते. जीवनात चांगले स्थान प्राप्त करतात. आयुष्यात येणारी प्रत्येक लहान-मोठी संधी सोडत नाहीत, ज्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळते, असे म्हटले जाते.
तूळ: या राशीचा स्वामी शुक्र ग्रह कीर्ती आणि संपत्तीचा कारक आहे. प्रत्येक वाद आपल्या कौशल्याने सोडवण्यात या राशीच्या व्यक्ती पटाईत आहे. तूळ राशीचे लोक खूप मेहनती आणि लढाऊ बाण्याचे असतात. यश मिळविण्यासाठी आपली पूर्ण क्षमता लावतात. तूळ राशीच्या लोकांवर कुबेर देवाची अपार कृपा राहते, असे मानले जाते. या राशीचे लोक घरातील सदस्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कुबेराच्या कृपेने या राशीच्या लोकांना पैशांशी संबंधित समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत नाही, असे सांगितले जाते.
वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीचे लोक यश मिळेपर्यंत मेहनत करत राहतात. या गुणामुळे कुबेर देवांचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहतो, असे मानले जाते. या व्यक्ती आजूबाजूच्या लोकांची साथ कधीही सोडत नाहीत. प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेतात. आपल्या प्रयत्नांनी परिस्थिती अनुकूल करण्यात ते यशस्वी होतात. त्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग येतात. कुबेर देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही, असे म्हटले जाते.
धनु: या राशीचा स्वामी देवतांचा गुरु बृहस्पति आहे. या राशीच्या व्यक्ती धार्मिक आणि भविष्याकडे नेहमीच आशावादी दृष्टीकोन ठेवतात. प्रसन्न स्वभाव आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमुळे कुबेर देवाची कृपा त्यांच्यावर सदैव असते, अशी मान्यता आहे. या व्यक्ती प्रेरणादायी आणि महत्त्वाकांक्षी असतात. प्रत्येक कामात खूप उत्साही असतात. जीवनात नवीन स्थान निर्माण करतात. पैशाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात येत नाहीत. नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. कठोर परिश्रम करण्यास मागे हटत नाहीत. यांचा मित्र परिवार मोठा असतो, असे म्हटले जाते.
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.