कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्यात, म्हणून यशोदेनेही केले होते संकष्टी चतुर्थीचे व्रत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 07:20 IST2020-12-03T07:20:00+5:302020-12-03T07:20:01+5:30
आजतागायत घरोघरी होत असलेल्या, ना कृष्णलीला कमी झाल्या, ना यशोदेच्या तक्रारी. या गोड नात्याचा साक्षीदार विनायक मात्र गाली हसून तथास्तू म्हणतो आहे.

Photo curtesy: Ganesha idol made by sculpture Vishal shinde
लहान हूड मुलाचा खोडकरपणा त्याच्या आईला सर्वात अधिक त्रासदायक आणि आनंददायकही वाटतो. बालकृष्ण म्हणजे लहानपणाचे भगवान श्रीकृष्ण हे मुलखाचे खोडकर मूल. त्याने आपल्या लहानपणी माय यशोदेला कसे `त्राहि भगवान' केले असेल, याची कल्पनाच केलेली बरी. या प्रसंगाचे यथार्थ वर्णन ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी केले आहे.
कृष्णाच्या खोड्यांनी यशोदा कमालीची हैराण झाली होती. तेव्हा गौळणींपैकी कोणीतरी म्हणाली, 'बाई गं, संकष्टी चतुर्थीचे व्रत एकदा करून पाहा.' गौळणीचा सल्ला मानून यशोदेने संकष्टीव्रताचे आचरण सुरु केले. संत नामदेव ह्या घटनेचे रसाळ वर्णन शब्दबद्ध करतात,
गोपिका म्हणती, यशोदा सुंदरी। करीतो मुरारी, खोडी बहु।
यशोदेप्रती त्या, गौळणी बोलती, संष्टी चतुर्थी, व्रत घेई।
गणेश देईल, यासी उत्तम गुण, वचन प्रमाण, मानावे हे।
गजवदनासी तेव्हा, म्हणत यशोदा, माझिया मुकुंदा गुण देई।
यशोदेचा हा संकल्प ऐकल्यानंतर बालकृष्णाने एक महिनाभर खोडी केली नाही. गणपती आपल्याला पावला, या भावनेने यशोदा निष्ठेने उपास करू लागली. धन्य धन्य देव गणपती पाहे, यशोदा ती राहे उपवासी!
हेही वाचा : 'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!
संकष्टीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर यशोदेने एकवीस लाडू केले आणि त्याबरोबर बरेच मोदक तयार करून देवासमोर नैवेद्य ठेवला.
शर्करामिश्रित लाडू येकवीस, आणीक बहुवस, मोदक तो।
ऐसा नैवेद्याचा, हारा तो भरूनी, देव्हारी नेऊनि, ठेवी माता।
मातेसी म्हणत, तेव्हा हृषिकेशी, लाडू केव्हा देसी, मजलागी।
यशोदा म्हणते, पूजीन गजवदना, नैवेद्य दाऊन, देईन तुज।
पण बाळकृष्णाला एवढा धीर कुठे? आई बाहेर जाताच, बाळकृष्णाने नैवेद्य फक्त केला आणि तृप्तीचा ढेकर दिला. यशोदा आली आणि पाहते तर नैवेद्याचे ताट रिकामे. तिने कृष्णाला विचारले, तर कृष्ण सांगतो, `मैय्या, हजार उंदिर आले आणि लाडू, मोदक खाऊन गेले. त्यातल्या एका उंदरावर बसून विनायक देखील आले होते. त्या सगळ्यांनी मिळून नैवेद्य संपवला. आता मी काय खाऊ? मला काहीतरी खायला दे!
कृष्णाची खोडी ओळखून यशोदा माता म्हणाली, `कृष्णा तोंड उघड पाहू.' कृष्णाने तोंड उघडले, तर काय आश्चर्य...
कृष्णनाथे तेव्हा, मुख पसरिले,
ब्रह्मांड देखिली मुखामाजी।
असंख्य गणपती, दिसती वदनी,
पहातसे नयनी, यशोदा ते।
कृष्णाच्या मुखात ब्रह्मांड दिसले आणि त्याच्या मुखातून स्वत: गणपतीच बोलू लागले, `यशोदे, तू तुझ्या कृष्णाचे लाड पुरव. तो नैवेद्य मला आपोआप मिळेल.'
यशोदेचा राग निवळला आणि तिने कृष्णाचे मुके घेतले. नंतर कृष्णासाठी आणि बाप्पासाठी पुन्हा लाडू मोदक केले. तेव्हापासून आजतागायत घरोघरी होत असलेल्या, ना कृष्णलीला कमी झाल्या, ना यशोदेच्या तक्रारी. या गोड नात्याचा साक्षीदार विनायक मात्र गाली हसून तथास्तू म्हणतो आहे.
हेही वाचा : बाप्पाला कोणत्या प्रकारे केलेली पंचारती आवडते? वाचा