Angarak Yoga On Vinayak And Sankashti Chaturthi in 2026 Date List: नमस्ते गणनाथाय गणानां पतये नमः । भक्तिप्रियाय देवेश भक्तेभ्यः सुखदायक ॥ इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू होत आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती पूजनाने केली जाते. प्रथमेश गणपतीचे शुभाशिर्वाद लाभले की, सर्व विघ्न दूर होऊन यश, प्रगती, सुख, समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. गणपती बाप्पाचे केवळ नाव ऐकले मात्र तरी मनात चैतन्य संचारते. सकारात्मकता लाभते. गणपतीचे महात्म्य, महती वर्णावी तेवढी कमीच आहे. अशा या अबालवृद्धांच्या लाडक्या बाप्पाच्या उपासनेत चतुर्थीचे व्रत अतिशय शुभ फलदायी मानले गेले आहे. चतुर्थी तिथीला अंगारक योग जुळून येणे विशेष मानले गेले आहे. सन २०२६ मध्ये कोणत्या चतुर्थी तिथींना अंगारक योग जुळून येणार आहे, ते जाणून घेऊया...
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपती पूजन केले जाते.
विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी व्रतांचे महात्म्य
प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्य दर्शनाला महत्त्व असते. तर प्रत्येक मराठी मासातील वद्य चतुर्थीला ‘संकष्ट चतुर्थी’ म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्र दर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. प्रत्येक मराठी मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. यंदा, २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे. त्यामुळे दोन चतुर्थी तिथी वाढणार आहेत. विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे पुण्याचे मानले गेले आहे.
विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी अंगारक योग जुळून येणे म्हणजे नेमके काय?
विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. अशी चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक योगाच्या चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. संपूर्ण वर्षात केवळ काहीच चतुर्थी तिथीला अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की, माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारक चतुर्थीचे व्रत केले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
२०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार?
- मंगळवार, ०६ जानेवारी २०२६ रोजी पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. पौष वद्य संकष्ट चतुर्थीला रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटांनी चंद्रोदय आहे.
- मंगळवार, ०५ मे २०२६ रोजी वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. वैशाख वद्य संकष्ट चतुर्थीला रात्रौ १० वाजून १९ मिनिटांनी चंद्रोदय आहे.
- मंगळवार, १९ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थी अंगारक योग आहे.
- मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थीला रात्रौ ०८ वाजून १४ मिनिटांनी चंद्रोदय आहे.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : 2026 brings four auspicious Angarak Yoga days on Ganesh Chaturthi. These dates on January 6th, May 5th & 19th, and September 29th are especially sacred for devotees seeking blessings and wish fulfillment from Lord Ganesha. Worshipping on these days brings prosperity.
Web Summary : 2026 में गणेश चतुर्थी पर चार शुभ अंगारक योग। 6 जनवरी, 5 और 19 मई और 29 सितंबर की तिथियां भगवान गणेश से आशीर्वाद चाहने वाले भक्तों के लिए विशेष रूप से पवित्र हैं। इन दिनों पूजा करने से समृद्धि आती है।