Astrology Panch Mahapurush Yoga In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीवरून ग्रह, नक्षत्र, रास, स्थाने यांचा अभ्यास केला जातो. त्यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, भविष्यातील घटना, भूतकाळातील गोष्टी यांचा आढावा घेता येऊ शकतो. प्रत्येक कुलुपाची चावी वेगळी, तशी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी, त्याचे परिणाम वेगळे आणि असणारा प्रभाव वेगळा, असे सांगितले जाते. एखाद्या कुंडलीत पंचमहापुरुष योग कसा तयार होतो, याचा प्रभाव कसा असतो? जाणून घेऊया...
ज्योतिषशास्त्रात अनेक राजयोग आणि शुभ योगांचे वर्णन केलेले आहे. पंचमहापुरुष राजयोगामध्ये हंस, मालव्य, रुचक, शश आणि भद्र राजयोग यांचा समावेश असतो. बुधादित्य राजयोग यांसारखे राजयोग अनेक कुंडलींमध्ये सामान्यपणे पाहायला मिळतात. परंतु राजयोगांच्या पंगतीत पंचमहापुरुष राजयोगासारखे अतिशय विशेष राजयोग क्वचितच दिसतात, असे म्हटले जाते. या राजयोगांमुळे एखाद्या व्यक्तीला सर्व भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात. व्यक्ती जीवनात खूप श्रीमंत होऊ शकते. राजकारणाच्या क्षेत्रात अशा व्यक्ती खूप नाव कमावू शकतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हे राजयोग असतात त्यांना मान-सन्मान, आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. अशा व्यक्ती धाडसी आणि शूर बनू शकतात, असे सांगितले जाते.
एखाद्या कुंडलीत पंचमहापुरुष योग कसा तयार होतो?
ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि यापैकी कोणताही ग्रह उच्च, स्वराशीत किंवा मूलात्रिकोण योगात असतो आणि केंद्रात असतो, तेव्हा पंचमहापुरुष राजयोग तयार होतो. हा सर्वोत्तम योग उच्च राशीत, कमी बलवान मूलात्रिकोण राशीत आणि कमी बलवान स्वतःच्या राशीत तयार होतो. रुचक नावाचा पंचमहापुरुष राजयोग नवग्रहांचा सेनापती मंगळ, भद्रा राजयोग नवग्रहांचा राजकुमार बुध, हंस पंच महापुरुष राजयोग नवग्रहांचा देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह, मालव्य योग धनदाता शुक्र आणि शश नावाचा पंचमहापुरुष राजयोग कर्मदाता नवग्रहांचा शनि यांच्या कुंडलीतील स्थानांमुळे तयार होतो.
१. रुचक पंचमहापुरुष योग
- नवग्रहांचा सेनापती मंगळ स्वराशीत, उच्च राशीत किंवा मूलत्रिकोण राशीत, कुंडलीत केंद्रात असतो, तेव्हा रुचक नावाचा पंचमहापुरुष राजयोग तयार होतो. या योगात जन्मलेल्या व्यक्ती धैर्याने आणि कठोर परिश्रमाने पैसे कमावतात. शत्रूंचा पराभव करतात. बलवान असतात. सेनापतींसारखे नेतृत्व गुण आणि राजकारणात विशेष यश मिळवू शकतात. क्रीडा, पोलीस आणि सैन्यात चांगले नाव कमावतात. हे लोक जोखीम घेण्यास पटाईत असतात. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर बनवू शकतात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत रुचक राजयोग तयार होतो, त्यात मंगळ कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थितीत आहे, मंगळ ग्रहावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात.
२. भद्र पंचमहापुरुष योग
- नवग्रहांचा राजकुमार बुध स्वराशीत, उच्च राशीत किंवा मूलत्रिकोण राशीत, कुंडलीत केंद्रात असतो, तेव्हा भद्र नावाचा पंचमहापुरुष राजयोग तयार होतो. या योगात जन्मलेला व्यक्ती शूर असतात. शत्रूंना पराभूत करण्यास सक्षम असतात. सतत पुढे जाण्याच्या इच्छेमुळे असे लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. ज्यांच्या कुंडलीत हा राजयोग असतो ते व्यवसायात चांगले नाव कमावतात. या लोकांना पैशांची चणचण भासत नाही, असे म्हटले जाते.
३. हंस पंचमहापुरुष योग
- नवग्रहांचा गुरू बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह ग्रह स्वराशीत, उच्च राशीत किंवा मूलत्रिकोण राशीत, कुंडलीत केंद्रात असतो, तेव्हा हंस पंचमहापुरुष राजयोग तयार होतो. हंस योगात जन्मलेल्या व्यक्ती सज्जन असतात. त्यांच्या तळहातावर शुभ चिन्हे असण्याची शक्यता अधिक असते. धार्मिक स्वभावाचे असतात. हे लोक देवावर विश्वास ठेवतात. हे लोक ज्योतिषशास्त्रासारख्या सखोल विषयांचे ज्ञानी असतात. या लोकांना जीवनात खूप आदर मिळतो. कुंडलीत हंस राजयोगाची निर्मिती अशा लोकांना धार्मिक क्षेत्रात पुढे घेऊन जाते. असे लोक चांगले योग गुरु, ज्योतिष गुरु असू शकतात. हे लोक पैशाच्या बाबतीत तज्ज्ञ असतात. हे लोक पैसे वाचवण्यात पटाईत असतात. हे लोक व्यावहारिक असतात. कमी काम करून उच्च पदांवर पाहू शकता. अशा लोकांमध्ये अनेक प्रकारच्या प्रतिभा आढळू शकतात. असे लोक चांगले विद्यार्थी तसेच चांगले शिक्षक असतात.
४. मालव्य पंचमहापुरुष योग
- शुक्र ग्रह स्वराशीत, उच्च राशीत किंवा मूलत्रिकोण राशीत, कुंडलीत केंद्रात असतो, तेव्हा मालव्य नामक पंचमहापुरुष राजयोग जुळून येतो. मालव्य योगात जन्मलेला व्यक्ती धैर्यवान, श्रीमंत, विविध सुखांनी युक्त, प्रगतीशील, लोकप्रिय, बुद्धिमान आणि आनंदी व्यक्तिमत्वाचा असतो. अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. हे लोक कलेचे तज्ज्ञ आणि प्रेमी असतात. कुंडलीत मालव्य योग तयार झाल्यामुळे या व्यक्ती महागड्या वाहनांचे शौकीन, उच्च शिक्षित आणि विलासी जीवन जगतात. या लोकांना जीवनात सर्व भौतिक सुखे मिळतात. जर हे लोक चित्रपट, कला, संगीत क्षेत्राशी संबंधित काम-व्यवसाय करत असतील, तर त्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो. हे लोक प्रेरणादायी वक्ते असू शकतात.
५. शश पंचमहापुरुष योग
- नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि स्वराशीत, उच्च राशीत किंवा मूलत्रिकोण राशीत, कुंडलीत केंद्रात असतो, तेव्हा शश नावाचा पंचमहापुरुष राजयोग तयार होतो. या योगात जन्मलेले लोक विविध सुख, सोयी अनुभवतात. अशा व्यक्ती प्रसिद्ध नेते बनू शकतात. युक्त्या लढवण्यात कुशल असतात. असे लोक न्यायी असतात. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. हे लोक मेहनती आणि कर्मठ असतात. अशा लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते. हे लोक श्रीमंत बनू शकतात. या लोकांना त्यांचे काम वेळेवर पूर्ण करायला आवडते. हे लोक गरिबांना मदत करण्यात नेहमीच पुढे असतात, असे मानले जाते.
- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.