मन अस्थिर करणाऱ्या अनेक घटना आपल्या सभोवती घडत असतात. पण या अशांततेचे कारण काय? तर प्रेमानंद महाराज सांगतात, ज्या लोकांचा देवावर विश्वास नसतो, ते लोक स्वतःच्याच व्यापात गुंतून असतात आणि आपले भले कसे होईल, कधी होईल याचा विचार करत राहतात. याउलट जे लोक कर्म करून मोकळे होतात आणि देवावर सगळा भार सोपवतात ते निश्चिन्त राहतात, कारण भक्ताच्या चिंता निवारण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतःच्या खांद्यावर घेतो. यासाठी महाभारतातली गोष्ट लक्षात ठेवा आणि जेव्हा जेव्हा हतबल झाल्यासारखे वाटेल तेव्हा या कथेची उजळणी करा.
कौरवांचे सेनापती भीष्म पितामह, युद्ध सुरु झाल्यापासून रोज पांडवांकडचे दहा हजार सैन्य मृत्युमुखी पाडत होते. पण काही केल्या एकाही पांडवांचा वध त्यांच्याकडून घडत नव्हता. दुर्योधनाने त्यांना खिजवले. त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भीष्म चवताळून उठले आणि त्यांनी पाच बाण घेतले आणि दुसऱ्या दिवशी युद्धात या बाणांनी पांडवांचा वध करणार अशी प्रतिज्ञा केली.
ती साधी सुधी प्रतिज्ञा नव्हती, तर भीष्म प्रतिज्ञा होती. पण घेतला म्हणजे ते पूर्ण करणारच. त्यांच्या प्रतिज्ञेची वार्ता द्रौपदीपर्यंत पोहोचली. पांडव झोपी गेले होते. अस्वस्थ होऊन द्रौपदी कृष्णाजवळ आली आणि आपल्या पतीच्या जीवाची काळजी व्यक्त करू लागली. कृष्ण म्हणाले, मी सांगतो तसे कर. दासीचे वस्त्र परिधान कर आणि भीष्मांच्या राहुटीत जा. ते नामःस्मरणात दंग असतील. कृष्णावर विश्वास ठेवून द्रौपदी कृष्णाने सांगितल्यानुसार दासी वस्त्र परिधान करून भीष्मांचार्यांच्या भेटीला गेली. ते नामःस्मरण घेत होते. द्रौपदीने वाकून नमस्कार केला, तेव्हा हातातील बांगड्यांची किणकिण झाली. कोणी विवाहिता आली आहे हे लक्षात घेऊन भीष्मांनी बंद डोळ्यांनीच तिला आशीर्वाद देत 'अखंड सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. तिने आभार व्यक्त करताच भीष्मांनी डोळे उघडून पाहिले तर समोर द्रौपदी!
ती म्हणाली, 'पितामह एकीकडे आपण माझ्या नवऱ्यांना उद्या जीवे मारण्याचा पण करता आणि दुसरीकडे मला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देता, नक्की काय समजू?'
पितामह म्हणाले, 'तू माझ्याकडे प्रश्नांची उत्तर मागत असलीस तरी तू इतक्या रात्री इथे कशी आणि का आलीस हे मी ओळखले आहे. तू स्वतःहून इथे आली नसून योजनापूर्वक तुला इथे पाठवण्यात आले आहे. भीष्मांनी कृष्णाला मनोमनं वंदन केले आणि म्हणाले,' ज्यांच्या पाठीशी देवा तू आहेस, त्यांना कसलीच भीती नाही. द्रौपदी तू निश्चिन्त होऊन जा, तुझ्या पतीला मी मारू शकणार नाही. भगवंत पाठीशी असताना तुम्हा कुटुंबियांना काळजी.
याचप्रमाणे आपणही आपले प्रयत्न करून बाकी भार देवावर टाकला तरच सुखी होऊ.