प्रयत्नाला सातत्याची जोड असेल, तर काम झालंच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:44 PM2021-06-14T15:44:45+5:302021-06-14T15:45:21+5:30

स्वप्नांच्या दिशेने टाकलेली पावले मागे घेऊ नका. प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस प्रयत्नांना यश नक्की मिळेल. 

If there is continuity to the effort, then think of it as work done! | प्रयत्नाला सातत्याची जोड असेल, तर काम झालंच म्हणून समजा!

प्रयत्नाला सातत्याची जोड असेल, तर काम झालंच म्हणून समजा!

googlenewsNext

आपल्यापैकी अनेक जण आरंभशूर असतात. म्हणजे सुरुवातीला जोश, कामाचा उत्साह दाखवणारे. पण हा उत्साह टिकवता आला, तर ठीक अन्यथा टप्प्याटप्प्यात केलेली मेहनत वाया जाऊ शकते. म्हणून यशाचे सूत्र हेच आहे, की यश मिळवण्यासाठी प्रयत्न योग्य दिशेने करा आणि सातत्याने करा. पुढील गोष्ट वाचल्यावर प्रयत्नाला सातत्याची जोड का हवी, हे आपल्यालाही पटेल!

एका गावात पुढील बारा वर्षे दुष्काळ पडणार, असे ज्योतिषांनी भाकीत केले. शेतीकामावर अवलंबून असलेले गावकरी नुसते भाकीत ऐकून गाव सोडून जाऊ लागले. मात्र एका शेतकऱ्याने गाव न सोडण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी आणि त्याच्या घरच्यांनीदेखील त्याला वेड्यात काढले. मात्र तो आपल्या निर्णयापासून ढळला नाही. उलट त्याने दरदिवशी शेतावर जाऊन काम करण्यास सुरुवात केली. 

महिना-दोन महिने त्याचे काम सातत्याने सुरू होते. ते पाहून वर आकाशात एक छोटासा ढग आला. त्याने त्या शेतकऱ्याला हटकले आणि विचारले, 'काय रे, ज्योतिषांनी भाकीत वर्तवूनही तू इथे मेहेनत करत बसला आहेस? यावर शेतकरी म्हणाला, 'दुसरीकडे जाऊन बेरोजगार बसण्यापेक्षा आपण आपल्या शेतात राबत राहावं. उद्या देवाच्या कृपेने पाऊस आला, तर माझी जमीन किमान नांगरलेली असेल. पण तेव्हा जर मी काहीच केलेले नसेल, तर पाऊस पडूनही ते पाणी वाहून जाईल. शिवाय माझ्या कामात खंड पडल्याने मी माझे काम विसरेन किंवा कामाची गुणवत्ता घसरेल. म्हणून मी माझे काम सुरू ठेवले आहे.'

हे ऐकून छोटासा ढग विचारात पडला. तो म्हणाला, 'शेतकऱ्याच्या बोलण्यात तथ्य आहे. त्याच्याप्रमाणे मी बरसण्याचे थांबलो तर मी सुद्धा माझे काम विसरणार तर नाही ना? असे म्हणत त्याने आपल्या मित्रांना गोळा केले आणि पाऊस पाडायला सुरुवात केली. वर ढग आणि खाली शेतकरी खुश झाला. 

मात्र ज्यांनी भविष्याच्या काळजीने आज मेहनत घेणे सोडून दिले होते, त्यांचे नुकसान झाले आणि त्यांना आपले काम सोडल्याचा पश्चात्ताप झाला. 

असा पश्चात्ताप आपल्याला होऊ नये असे वाटत असेल, तर स्वप्नांच्या दिशेने टाकलेली पावले मागे घेऊ नका. प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस प्रयत्नांना यश नक्की मिळेल. 

Web Title: If there is continuity to the effort, then think of it as work done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.