स्वप्ने असतील मोठी, तर रोडपतीसुद्धा होऊ शकतो करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 08:05 PM2021-05-07T20:05:49+5:302021-05-07T20:06:31+5:30

मोठी स्वप्ने पाहावीत आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास बाळगावा. तसे केले, तर एक ना एक दिवस आपल्यालाही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवता येईल. 

If dreams are big, then even a roadie can become a millionaire! | स्वप्ने असतील मोठी, तर रोडपतीसुद्धा होऊ शकतो करोडपती!

स्वप्ने असतील मोठी, तर रोडपतीसुद्धा होऊ शकतो करोडपती!

googlenewsNext

एक भिकारी होता. तो दिवसभरात जेवढे मिळेल त्यावर गुजराण करत असे. कोणीतरी त्याला सांगितले, रस्त्याच्या कडेला बसून भीक मागण्यापेक्षा ट्रेनमध्ये जात जा, तिथे जास्त भीक मिळते. भिकारी ट्रेनने प्रवास करू लागला. ट्रेनच्या गर्दीतून वाट काढत प्रत्येकासमोर कटोरा पुढे करत गयावया करू लागला. कोणी त्याला भीक देत असे, तर कोणी त्याला हाकलून लावत असे. भिकाऱ्याने आपले काम सुरू ठेवले. 

एक दिवस ट्रेनने एक व्यावसायिक जात होता. भिकाऱ्याने त्याच्याकडे भीक मागितली. व्यावसायिक म्हणाला, `मी तुला भीक देईन, त्या मोबदल्यात तू मला काय देशील?'
भिकाऱ्यासाठी हा प्रश्न अनपेक्षित होता. तो म्हणाला, `साहेब, मी भिकारी तुम्हाला काय देणार?'
त्यावर तो व्यावसायिक म्हणाला, 'आमच्या व्यवसायाचा नियम आहे. फुकट काही घेऊ नये आणि फुकट काही देऊ नये. तुझ्याकडे काही देण्यासारखे असेल, तेव्हा माझ्याकडे भीक मागायला ये, मी मोबदल्यात भीक देईन!'

भिकारी ट्रेनमधून उतरला. त्याला व्यावसायिकाचा विचार पटला. परंतु, आपली ऐपत नसताना आपण कोणाला काय देणार, असा विचार करत असताना, त्याला ट्रेनच्या आवारात असलेली बाग दिसली. त्या बागेत अनेक फुले फुलली होती. भिकाऱ्याने ठरवले. यापुढे कोणी मला भीक दिली, तर मोबदल्यात त्याला फुल द्यायचे.

तो तसे वागू लागला. लोकांसाठीसुद्धा ही अनोखी भेट होती. त्याची सहृदयता लोकांना भावली. त्याच ट्रेनमध्ये भिकाऱ्याची पुन्हा व्यावसायिकाशी गाठ पडली. व्यावसायिक म्हणाला, `काही आहे का देण्यासारखे?' भिकाऱ्याने पिशवीतून फुल काढले आणि व्यावसायिकाला दिले. व्यावसायिक खुष झाला. तो म्हणाला, 'आता तू सुद्धा माझ्यासारखा व्यावसायिक झालास. असेच परिवर्तन करत राहा, भविष्यात मोठा व्यावसायिक होशील.'

भिकारी चक्रावला. आपण व्यावसायिक बनू शकतो, हा विचारसुद्धा त्याच्या मनाला कधी शिवला नव्हता. त्याने व्यावसायिकाचे शब्द मनावर घेतले. मोठा व्यावसायिक बनण्याचे ध्येय मनाशी ठरवले. ध्येय निश्चित झाल्यावर त्याला पुढचा मार्ग दिसू लागला आणि तो ध्येयपूर्तीसाठी सर्वतोपरी मेहनत घेऊ लागला. 
एक दिवस त्याची आणि व्यावसायिकाची ट्रेनमध्ये पुन्हा गाठ पडली. त्याने व्यावसायिकाला विचारले, `मला ओळखले का? आज आपली ही तिसरी भेट आहे.' 

व्यावसायिकाने निरखून पाहिले. त्याने नकारार्थी मान डोलावली.   शेवटी तो म्हणाला, `मीच तो भिकारी आहे, ज्याला तुम्ही व्यावसायिक होण्याचे स्वप्न दाखववले. मी ते स्वप्न जगलो. भीकेच्या मोबदल्यात फुले देता देता फुलांचा व्यवसाय करत मोठा व्यापारी बनलो. आज भिकारी म्हणून नाही तर व्यावसायिक म्हणून तुमच्यासमोर उभा आहे!'

तात्पर्य हे, की आपणही स्वप्न पाहताना छोटी स्वप्ने पाहू नयेत. तर मोठी स्वप्ने पाहावीत आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास बाळगावा. तसे केले, तर एक ना एक दिवस आपल्यालाही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवता येईल. 

Web Title: If dreams are big, then even a roadie can become a millionaire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.