गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
By देवेश फडके | Updated: July 2, 2025 15:05 IST2025-07-02T15:04:42+5:302025-07-02T15:05:08+5:30
Guru Purnima 2025 Gurulilamrut Parayan Saptah: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुलीलामृताचे सप्ताह पद्धतीने पारायण करणे अत्यंत शुभ, पुण्य फलदायी ठरू शकते. स्वामींची अबाधित कृपा प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते.

गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
Guru Purnima 2025 Gurulilamrut Parayan Saptah: गुरुपौर्णिमा ही फक्त अध्यात्मिक, धार्मिक गुरूंना वंदना नसून या निमित्ताने शिक्षण, लेखन, चित्रकला, मूर्तिकला, गायन, वादन, अभिनय, विविध क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी सर्व क्षेत्रातील गुरुंबद्दल कृतज्ञता असते. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात साजरा होणारा हा टीचर्स डे आहे. कोट्यवधी भाविक प्रत्यक्ष दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना गुरु मानतात. त्यांच्याच प्रेरणेने जीवनात वाटचाल करत असतात. स्वामींची कृपा कायम असावी, असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी स्वामी सेवा आणि कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुलीलामृत पारायणाचा सप्ताह करता येऊ शकतो. कधीपासून सुरू करायचा सप्ताह? नेमके कोणते नियम पाळणे अतिशय आवश्यक आहे? जाणून घेऊया...
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशिर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून, भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते, अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. स्वामींच्या लीलांचे वर्णन ज्या ग्रंथात आले आहे, तो म्हणजे श्री गुरुलीलामृत.
श्री गुरुलीलामृत पारायण सप्ताहाची सुरुवात कधीपासून करावी?
१० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा आहे. ०९ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ३६ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून, १० जुलै २०२५ रोजी उत्तर रात्रौ ०२ वाजून ०६ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे. गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अनेकपटींनी वाढलेले आहे. गुरुलीलामृताचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमेला पारायणाची सांगता व्हावी, अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. शुक्रवार, ०४ जुलै २०२५ रोजी गुरुलीलामृत पारायणाची सुरुवात करावी लागेल. ०४ जुलै ते १० जुलै या सात दिवसांत गुरुलीलामृत सप्ताह पूर्ण होऊ शकेल.
श्रीगुरुलीलामृत पारायण कसे करावे? काय आणि कशी पद्धत असावी?
श्रीगुरुलीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे. सकाळीच, स्नानादि कार्ये झाल्यावर नित्याची देवपूजा करावी. गुरुलीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी. श्रीगुरुलीलामृत या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी, एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरुलीलामृताचे पारायण करावे.
श्रीगुरुलीलामृत पारायण करताना संकल्प कसा करावा?
उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी किंवा कोणत्या कारणास्तव हे पारायण करीत आहोत, हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. गुरुलीलामृत पारायण सप्ताह करताना कोणतीही समस्या, अडचण येऊ नये, सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी स्वामींना मनापासून प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे.
गुरुलीलामृत पारायण करताना ‘अशी’ तयारी करावी
श्रीगुरुलीलामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर, मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. पोथीला धूप, दीप दाखवावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा.
श्रीगुरुलीलामृत पारायण करताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा
स्नानोपरांत शुचिर्भूत होऊन श्रीगुरुलीलामृत ग्रंथ वाचनास आरंभ करण्यापूर्वी आराध्य देवता-कुलदेवता तसेच वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची व पोथीची पूजा करावी. ग्रंथ पारायण झाल्यावर यथोचित पूजन करावी. सप्ताहासाठी सात दिवस अखंड दीप तेवत ठेवावा. एकभुक्त राहावे. ब्रह्मचर्य व्रत पाळावे. पारायण सांगतेप्रित्यर्थ यथाशक्ति दान करावे. श्रीगुरुलीलामृत पारायण करताना वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. स्वामींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्रकथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता.
श्रीगुरुलीलामृताची फलश्रुती काय? अपार लाभ होतात
श्रीगुरुलीलामृत पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते. सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा, आत्मविश्वास वाढतो. उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.
- श्री स्वामी समर्थ यांच्या गुरुलीलामृत ग्रंथात ज्या पद्धतीने सप्ताह पारायणाची पद्धत सांगितली आहे, त्या पद्धतीने सप्ताह पारायण करावे. सात दिवस शक्य नसेल, तर तीन दिवसीय पद्धतीने पारायण करावे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥