गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
By देवेश फडके | Updated: October 17, 2025 12:11 IST2025-10-17T12:04:21+5:302025-10-17T12:11:03+5:30
Guru Dwadashi 2025: दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आपल्या अद्भूत अवतारकार्याची सांगता केली, तो दिवस गुरुद्वादशी म्हणून ओळखला जातो.

गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
Guru Dwadashi 2025: कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन:। द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ:॥ ब्रह्मांडनायक दत्तगुरुंच्या पहिल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन म्हणजे गुरुद्वादशी. अश्विन वद्य द्वादशीला दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले. या अवताराचे स्मरण म्हणून गुरुद्वादशी हा दिवस विशेष मानला जातो. तसेच याच दिवशी दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी नरसोबाची वाडी येथे मनोहर पादुकांची स्थापना करून गाणगापूर येथे प्रस्थान केल्याचे उल्लेखही आढळून येतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अद्भूत चरित्राचा थोडक्यात आढावा...
यंदा, शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरुद्वादशी आहे. भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ या अवताराचे कार्य केवळ ३० वर्षांचे आहे. परंतु, या काळात केलेल्या लीला, लोकोद्धार आणि समाजभान टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य झालेले पाहायला मिळते. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी अश्विन वद्य द्वादशी तिथीला आपला देह कुरवपूर येथे अदृश्य केला, पण त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे लक्षात घ्यावे. कारण हा श्रीदत्तप्रभूंचा नित्य अवतार आहे. अजूनही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य त्याच रूपातून चालू असून अनंत कालपर्यंत सुरूच राहणार आहे.
गुरुचरित्रात येते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरित्राचे वर्णन
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला श्रीगुरुचरित्रात वर्णिलेल्या असून श्रीपादचरित्रामृतम् ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केलेले आहे. नृसिंहवाडी स्थानावर त्यांचेही वास्तव्य झालेले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य झाले होते. आता त्याजागी श्रीपाद सेवा मंडळाने त्यांचे भव्य मंदिर उभारलेले आहे. त्या जागृत स्थानी भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची बालरूपातील श्रीमूर्ती असून, तेथूनही त्यांच्या अद्भुत लीला आजही सतत सुरू असतात. अश्विन वद्य द्वादशी। नक्षत्र मृगराज परियेसी॥ श्रीगुरु बैसले निजानंदेसी। अदृश्य झाले गंगेत॥ लौकिकी दिसती अदृश्य। आपण कुरवपुरी असती जण॥ श्रीपाद राव निर्धारी जाण। त्रिमूर्तींचा अवतार॥, असा उल्लेख श्रीगुरुचरित्रात आढळून येतो. श्रीक्षेत्र गाणगापूर, श्रीक्षेत्र कुरवपूर, श्रीक्षेत्र पिठापूर व अनेक दत्त क्षेत्री हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
कलियुगात अवधूत होतील
भगवान श्रीदत्तप्रभू अपळराजांच्या घरी श्राद्धाच्या दिवशी भिक्षा मागायला आले. अखंड सौभाग्यवती सुमतीमातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले. तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन, "जननी, काय हवे ते माग !" असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले. सुमतीमातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने, "स्वामी, हेच बोल सत्य करा !" असेच मागितले. भगवान श्रीदत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थी या पावनदिनी सूर्योदय समयी पीठापूरमध्ये अपळराज व सुमतीमातेच्या पोटी अवतरित झाले. भविष्यपुराणात, "कलियुगात अवधूत होतील", असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच आहे. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायातील नमनात "कलौ श्रीपादवल्लभ: ।" असे प्रेमाने म्हटले जाते.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप नित्य अवतार
भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार आहे. त्यांचे वय कायमच सोळा वर्षांच्या किशोराएवढे असते. भगवान दत्तात्रेयांची कलियुगातील गुरुपरंपरा भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते. भगवान श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते. भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षड्भुज अशा मूळरूपात दर्शन झालेले आहे. सोळाव्या वर्षी पीठापूरहून प्रयाण करून बदरिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले. तिथून भ्रमण करीत ते श्रीनृसिंहवाडी, गोकर्ण महाबळेश्वर, तिरुपती करून कृष्णा काठावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री आले. तेथे त्यांनी चौदा वर्षे राहून अनेक दिव्य लीला केल्या.
कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथे दरबार
भगवान श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथील आपल्या दरबारात एके दिवशी, भक्तांवर परमकृपा करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।" हा श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्र स्वमुखाने उपदेशिला. हा संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत प्रभावी आहे. साजुक तुपातला शिरा, माठाची/राजगि-याची पालेभाजी व वांग्याची भाजी या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत. मनापासून आणि विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते. वस्तुत: आवड - नावड यांचा या श्रीपादरूप परमशुद्ध ब्रह्मचैतन्याशी काहीही संबंधच नसतो. भक्ताचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांच्या प्राप्तीचे एकमात्र साधन आहे.
॥ श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥