Govinda Dwadashi 2025: मराठी वर्षात विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रतवैकल्ये साजरी केली जातात. प्रत्येकाचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच असते. काही व्रते कालौघात मागे पडल्यासारखे वाटत असले, तरी अनेक ठिकाणी छोट्या प्रमाणात का होईना, त्याचे आचरण होताना दिसते. काही दिवसांनी मराठी वर्षाची सांगता होणार आहे. मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन महिना सुरू आहे. फाल्गुन शुद्ध द्वितीया तिथीला गोविंद द्वादशी व्रत करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया...
जो कोणी खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने गोविंद द्वादशीचे हे व्रत करतो, त्याला सर्व प्रकारच्या दुःखांपासून, वेदनांपासून आणि आजारांपासून मुक्तता मिळते. दिलासा मिळू शकतो. सर्व इच्छा निश्चितच पूर्ण होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गोविंद द्वादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. खुद्द श्रीकृष्णांनी पितामह भीष्म यांना या व्रताचे महत्त्व आणि महात्म्य सांगितले होते, असे म्हटले जाते.
कसे करतात व्रत? काय आहेत मान्यता?
श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. यथाशक्ती दान करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. तसेच पंचामृत अवश्य अर्पण करावे. तसेच लक्ष्मी नारायण कथेचे पठण करावे. तसेच कथेचे श्रवणही करावे, असे सांगितले जाते.
गोविंद द्वादशी व्रतानंतर मंत्रांचा जप अवश्य करा
गोविंद द्वादशी व्रत पूजनाचा विधी झाल्यानंतर ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:, ॐ नमो नारायणाय नम:, श्रीकृष्णाय नम:, सर्वात्मने नम: अशा मंत्रांचा आवर्जून जप करावा. किमान १०८ वेळा जप करावा. १०८ वेळा शक्य नसेल, तर यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. तसेच या दिवशी श्रीकृष्णांचे स्मरण, मंत्र जप, पूजन करावे, असे सांगितले जाते.