God is in us; He is not aware of it just because of the mental disorder | देव तर आपल्यातच आहे; फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव नाही

देव तर आपल्यातच आहे; फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव नाही

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

अध्यात्मशास्त्रांत विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्व आहे. खरं तर माणसाचे मन हे एक कुरुक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार अधिक प्रमाणात उचल खातात आणि माणसाचा पशू होतो. ज्ञानराज माऊली म्हणतात -

रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा ।
सांडि तूं अवगुणूं रे भ्रमरा ॥

कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा काही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत.

लोखंडाची वस्तू जर खूप गंजलेली असेल तर लोहचुंबक तिला आकर्षित करुं शकत नाही. वरचा गंज जर खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते.

ही विकारविवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विकारविवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे.

एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे, पेरणीचा विसर पडावा, शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापारी तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज आपणांस जितकी प्रगती दिसत आहे तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही कां..? याचे कारण माणसांत बळावलेली विकारविवशता हेच आहे.

गोकुळातील एक गोपिका भगवंताला आतुरतेने हाक मारीत असे. देवा..! एकदा माझ्या ह्रदयमंदिरांत ये ना..! तुला पाहण्यास मी खूप आतुर आहे रे..! देव रोज तिला येण्याचे आश्वासन देत होते पण येत काही नव्हते. एकदिवस ती गोपबाला देवाला म्हणाली, देवा..! तुझ्या न येण्यामागे कारण तरी मला सांग..? तेव्हा देव म्हणाले, प्रथम तूं तुझे ह्रदयाच्या स्वच्छ कर आणि मगच मी येईन..! ती गोपिका आपला स्वानुभव कथन करते -

हरि या हो चला मंदिर । कुणी नाही दुसरे घरी ।
काम दादला गेला बाहेरी । क्रोध सासू ती नाही घरी ॥

देव हा माणसांपासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत असं वाटत असेल तर हे विकारनिर्मूलन झालंच पाहिजे.

फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणांत परिमळ ठेवून जातात तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

ही विकारविवशता कमी करण्यासाठीच संतांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला. देव तर आपल्यातच आहे, फक्त विकारविवशतेमुळे त्याची जाणीव होत नाही..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Web Title: God is in us; He is not aware of it just because of the mental disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.