एखाद्या गोष्टीचा त्याग करणे हे वाटते तेवढे सोपे नाही; धर्मशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 04:46 PM2021-07-23T16:46:37+5:302021-07-23T16:47:20+5:30

त्याग संतांनी केला. तो आपल्याला शक्य नाही. म्हणून आपण त्याग शब्दासाठी पात्र नाही. आपण करू शकतो, ती मदत.

Giving up something is not as easy as it may seem; Theology says ... | एखाद्या गोष्टीचा त्याग करणे हे वाटते तेवढे सोपे नाही; धर्मशास्त्र सांगते...

एखाद्या गोष्टीचा त्याग करणे हे वाटते तेवढे सोपे नाही; धर्मशास्त्र सांगते...

googlenewsNext

जीवाला त्यागाची भावना येणे हे चांगले आहे. निरिच्छा हे त्याचे मुख्य लक्षण आहे. सर्वसामान्य माणसे त्याग करीत नाहीत फक्त त्यागाच्या कल्पना करतात. त्यागाचा विचार मनात आला तर फाटे फोडतात व फक्त बडबड करतात. त्यांच्या त्यागाच्या कल्पना परिस्थितीप्रमाणे असतात, हे योग्य नाही. त्याग हा अनुभवावा लागतो. त्याग शास्त्राप्रमाणे असावा लागतो. त्यागाच्या कल्पनेने वर जाण्याचा सर्व सामान्यांचा प्रयत्न असतो, परंतु त्यागाची कल्पना व अनुभव यात फरक आहे. सामान्यांच्या त्यागाच्या कल्पना इतक्या शुल्लक असतात की त्याग कधीच अस्तित्त्वात येत नाही. म्हणूनच सर्वसामान्य माणसे खरा त्याग करू शकत नाहीत.

आपण केलेला त्याग बरोबर आहे की नाही हे तपासणारे दुसरे जाणकार असावे लागतात. ते दुसऱ्याने पाहून सांगावे लागते. जसा स्वत: लिहिलेला पेपर स्वत:ला तपासता येत नाही, तसेच त्यागाचे आहे. त्यासाठी दुसरे श्रेष्ठ पुरुष असावे लागतात.

काहीजणांची एक वेळचे जेवण सोडले म्हणजे त्याग झाला अशी त्यागाची कल्पना असते. परंतु हा त्याग नाही. काहीजण पायात बूट किंवा चप्पल न घालता अनवाणी फिरतात हा त्याग नव्हे. जर त्यागाची कल्पना खरोखर मनात आली असेल तर वृत्तीत फरक पडला पाहिजे. तुमचा त्याग लोकांना दिसून तो त्यांनी मान्य केला पाहिजे. जर तुमची वृत्ती पूर्वीसारखीच राहिली तर या कल्पनेला अर्थ नाही. 

त्याग हा शब्द अतिशय मोठा आहे. काहीही नसताना घरदार सोडणे आणि परमार्थाला लागणे हा काही संसाराचा त्याग नाही, तर ही पळवाट आहे. याउलट सर्वकाही असताना परमार्थाची लागलेली ओढ आणि संसाराचा केलेला त्याग हा खरा त्याग आहे. असा त्याग संतांनी केला. तो आपल्याला शक्य नाही. म्हणून आपण त्याग शब्दासाठी पात्र नाही. आपण करू शकतो, ती मदत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ...या उक्तीप्रमाणे आपले पोट भरलेले आहे म्हणून उरलेले अन्न दान करण्याऐवजी आपल्याला जसे पोटभर अन्न मिळत आहे तसे एखाद्या गरजूलाही मिळावे, म्हणून दिलेले अन्न ही खरी मदत. अशात स्वत:कडे दोन वेळच्या जेवणाची सोय नसताना आपल्या हातचा घास दुसऱ्या गरजू व्यक्तीच्या मुखी घालणे, याला मात्र त्याग म्हणता येईल.

म्हणून आजवर आपण खरा त्याग किती केला आणि किती मदत केली, याचा हिशोब मांडायला हवा. जर आपल्या हातून दोन्ही गोष्टी घडल्या नसतील, तर या सत्कार्यासाठी प्रेरित होऊन कार्य करूया.

Web Title: Giving up something is not as easy as it may seem; Theology says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.