Ganpati Visarjan 2025 Dates: आज २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2025) श्रींचे आगमन झाले आहे आणि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत (Anant Chaturdashi 2025) गणेशोत्सव असणार आहे! हे दहा दिवस उत्सवाचे असले, तरी कोणाच्या घरी दीड, कोणाकडे पाच, कोणाकडे सात, तर कोणाकडे दहा दिवस गणपती असतात. दीड दिवसांचे गणपती ज्यांच्याकडे येतात त्या घरी लेकरं तर अगदीच काकुळतीला येऊन विचारतात, एवढ्या लवकर बाप्पा का जातो? त्यांना यथायोग्य उत्तर देण्यासाठी धर्मशास्त्रात दिलेली शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊ.
पार्थिव मूर्तीच्या विसर्जनाबाबतीत महत्त्वाचा शास्त्रसंकेत म्हणजे पार्थिव मूर्तीमधील प्राणप्रतिष्ठोत्तर आलेले देवत्व हे त्या दिवसापुरतेच असते. म्हणूनच कोणत्याही देवाची पार्थिवपूजा केल्यावर त्या मूर्तीचे विसर्जन त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होणे इष्ट असते. तथापि गणेशचतुर्थीच्या बाबतीत विविध कारणास्तव मूर्तीविसर्जन लांबणीवर टाकले जाते. त्यामध्ये एकतर सहाव्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीविसर्जन असल्यामुळे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन केले जाते. अशीच प्रथा बहुतेक ठिकाणी असून ज्यांच्या घरी गौरीव्रत आहे त्यांच्याबाबतीत ही प्रथा समर्थनीय ठरते.
प्रत्येक दिवशी माध्यान्हीला असलेली तिथी, उदयकालची तिथी, चंद्रोदयाची तिथी, तिथीची वेळ, नक्षत्र इत्यादीच्या हजारो वर्षे केलेल्या अभ्यासावरून निश्चित निर्णय घेतला जातो. सांवत्सरिक श्राद्ध, संकष्टी अशा बाबतीतही असाच निर्णय घेतला जातो. पूर्वी या सर्व गोष्टी इतक्या व्यापक प्रमाणात सर्वांना समजत नसत. त्यामुळे गावातील जाणकार व्यक्तीने, भटजी - ज्योतिषी - पुरोहित - पुजारी यांनी सांगितलेले सर्वजण ऐकत असत.
भाद्रपदातील गणेश चतुर्थी हे पार्थिव गणेशपूजनाचे व्रत आहे. पार्थिव मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती ! त्यामुळे चॉकलेट, भाज्या, फुले, नारळ, भांडी, वाद्ये, फळे, कागदाचा लगदा इत्यादींच्या केलेल्या मूर्ती पुजणे हे धर्माला धरून नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे हे व्रतच मुळी चतुर्थीच्या एका दिवसाच्या ४ व रात्रीचा १ असे ५ प्रहरांचे व्रत आहे. या बरोबरच आणखी एक अशीही मान्यता आहे की मातीच्या मूर्तीत केलेली प्राणप्रतिष्ठा, जीवत्व हे एकच दिवस राहते. त्यामुळे ही पूजा, व्रत हे फक्त एकच दिवसासाठी करण्याचे आहे. आता चतुर्थी कधी, किती वाजता लागते, कधी संपते ही माहिती, पूर्वी खेडोपाडी पसरलेल्या गणेश भक्तांपर्यंत कशी पोचणार ? यावर दीड दिवस हा सोपा व अचूक पर्याय आहे. गणपती बसवून दीड दिवस संपला म्हणजे चतुर्थी नक्की संपली. म्हणजेच विसर्जन करायला हरकत नाही. म्हणून हे दीड दिवस मुदतीचे गणेश व्रत सुरू झाले.
दुसरे म्हणजे दहाव्या दिवशी अनंतचतुर्दशी असल्यामुळे त्यादिवशीदेखील काही ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशमूर्तीचे विसर्जन (Ganesh Visarjan 2025) केले जाते. गणेश चतुर्थी व अनंतचतुर्दशी ही पूर्णतया भिन्न देवतांची व्रते असल्यामुळे त्यांची एकमेकांशी सांगड घालता येत नाही. घरगुती गणेशव्रताच्या निमित्ताने दहा दिवस विविध धार्मिक कार्याचे मन:पूर्वक आयोजन केलेले असल्यास दहाव्या दिवशी विसर्जन करणे समर्थनीय ठरेल.
पण एवढे दिवस गणपती ठेवणे काही कारणास्तव प्रशस्त ठरत नसेल, तर केवळ रूढीपोटी गणेशविसर्जन लांबणीवर टाकणे योग्य नाही. परंपरेने घरात गणेशोत्सव पाच, सहा किंवा दहा दिवसांचा करण्यास शास्त्राची कोणतीही हरकत नाही. याबाबत मनात संदेह बाळगू नये. मात्र गणपती विसर्जनाचे (Ganpati Visarjan 2025) नियम शास्त्रोक्त पद्धतीने पाळण्याबाबत प्रत्येकाने आग्रही असलेच पाहिजे.
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
शास्त्रानुसार विसर्जन हे वाहत्या पाण्यात होणे आवश्यक असल्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन जलाशयात म्हणजे तलाव, विहिरीत करू नये. अन्यथा त्या जलाशयातील तो जलाशय प्रदुषित तर होतेच पण त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जातात व कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाहण्यात करणे शक्य नसल्यास नागपंचमी, पोळा, हरितालिका, पार्थिवशिवपूजा, जन्माष्टमी इ. व्रतांमधील मृत्तिकेच्या मूर्तीप्रमाणेच शेतात, घरातील बागेत किंवा तुळशीवृंदावनात विसर्जन करणे इष्ट ठरते.
गणपती विसर्जनाच्या तारखा (Ganesh Visarjan 2025 Dates):
दीड दिवसांचे गणपती विसर्जन : २८ ऑगस्ट २०२५
पाच दिवसांचे गणपती विसर्जन : ३१ ऑगस्ट २०२५
गौरी आवाहन : ३१ ऑगस्ट २०२५
गौरी पूजन : १ सप्टेंबर २०२५
गौरी-गणपती (सात दिवसांचे) विसर्जन : २ सप्टेंबर २०२५
दहा दिवसांचे गणपती विसर्जन : ६ सप्टेंबर २०२५ (अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025))