यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला(Ganesh Chaturthi 2025) बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. घराची आवराआवर, साफसफाई, मूर्तीची निवड आणि कामांची आखणी झाली असेलच. मात्र शेवटच्या क्षणी महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात, त्याही पूजेच्या बाबतीत! मग गुरुजींसमोर धावाधाव, वेळेचा अपव्यय आणि कामाचा खोळंबा! हे सगळं टाळण्यासाठी डोंबिवलीचे प्रदीप जोशी गुरुजी यांनी पूजासाहित्याची सविस्तर यादी दिली आहे. ती एकदा डोळ्याखालून घाला.
पार्थिव गणेश पूजा साहित्य :
हळद,कुंकू, गुलाल सेंदूर, अष्टगंध, अक्षता, फुले, हार, पत्री, दूर्वा, पंचामृत , फळे, नारळ२/३, विड्याची पाने१५, आंब्याच्या डहाळ्या, सुटी नाणी, प्रसादासाठी मिठाई, पेढे , किंवा साखरफुटाणे, गुळखोबरे, खडीसाखर, सुकामेवा इच्छा असेल तेच ठेवावे. कलश, ताम्हण, तांब्या, पेला, पळी, समई, निरांजन, कापूर, धूप, उदबत्ती, कापसाची वस्त्र, जानवीजोड, सुपारी१० बसण्यासाठी / उभे राहण्यासाठी आसन, जवळ योग्य व्यक्ती हाताशी देण्याघेण्या साठी ठेवावी.
पूजेची पूर्वतयारी :
१) पार्थिव गणेशाची मूर्ती मखरात मधोमध असावी व आपल्याकडे पद्धत असल्यास मूर्तीच्या पाटा खाली थोडे तांदूळ व त्यावर मूर्ती ठेवावी. तसेचआपल्याकडे "कलश" ठेवण्याची प्रथा असल्यास कलशात पाणी ,पैसा, सुपारी, दूर्वा, किंचितहळद,आंब्याची डहाळी किंवा पाने किंवा विड्याची पाच पाने घालून वर नारळ ठेवावा, गंध,हळद,कुंकू पांच ठिकाणी लावावे गहू किंवा तांदूळ कलशाखाली घालून, कलश गणेश मूर्तीच्या उजव्या बाजूस मांडावा.
२)समई,निरांजनात तेल,तूप,वाती घालून दिवे, धूप उदबत्ती प्रज्वलित करुन ठेवणे.
३) हळद,कुंकू,शेंदूर,अष्टगंध,,अक्षत, कापूर, अत्तर,जानवी जोड वेगवेगळ्या द्रोणात किंवा वाटीत ठेवणे.
४) फुले,तुळशी,दुर्वा,बेल, एका ताटात वेगवेगळी थोडी थोडी काढून ठेवणे.
५)मूर्ती समोर ५विडे मांडावेत,२पानांचा विडा त्यावर प्रत्येकी एक नाणे व सुपारी ठेवणे,विडा ठेवताना देठ देवाकडे असावे, विड्यावर फळे व असल्यास खारिक, बदाम, पंचखाद्य, ठेवावीत, दोन नारळ देवाच्या बाजूला ठेवावे.
६)नैवेद्याला पेढे मोदक,गुळ खोबरे ठेवणे,पेढे,मोदक वाटी किंवा वाडग्या मध्ये काढून ठेवणे. पंचामृत शक्यतो वेगवेगळ्या वाटीत असावे किंवा एकत्र केलेले सुद्धा चालेल,त्या मध्ये १चमचा असावा.
७)आपल्या समोर तांब्या पाण्याने भरून व पळी,पंचपात्री,२ताम्हने ठेवावीत आणि १ रिकामे पातेलं.
८)शक्यतो दुर्वा २१ च्या जुड्यात निवडून ठेवणे थोड्या सुट्या ठेवणे . मिळाल्यास पत्री पण नेटकी व निवडून ठेवावी.
९)आरतीची तयारी करून ठेवणे त्या मध्ये निरांजन व कापूर आरती ठेवणे.
१०)गणपतीसाठी हार कंठी आणावी. दागिने घालणे व इतर सजावट पूजा संपल्यावर सावकाश करावी
११) पूजेला बसताना देवाला विडा नारळ ठेऊन देवा पुढील शंख घंटा मूर्ती समोर ठेऊन घरातील मोठ्यांना नमस्कार करून बसावे. घरातील पूजेतील गणेशमूर्ती घेत असाल तर घेऊन मखरातील मूर्तीच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला अक्षतांवर पूजेसाठी ठेवावी किंवा सुपारीची गणेशमूर्ती म्हणून पूजा करावी.
१२) मूर्तीच्या गळ्यात जानवे घालताना प्रथम हार घालतो तसे घालणे व नंतर गणेशाच्या उजव्या हाताखाली येईल असे ठेवणे.
१३) पूजा सुरु असताना मिळणाऱ्या सूचना नीट समजून घेणे .
१४) आरती झाल्यावर नैवद्य दाखवावा.
१५) पूजेसंबंधित शंका असल्यास आदले दिवशी किंवा त्याच दिवशी सायंकाळी५नंतर 9820872294 या नंबरवर फोन करून थोडक्यात विचारावे.
१६) ज्यांना ऑनलाईन पूजेत सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी माहिती : २७ ऑगस्ट २०२५रोजी सकाळी १०.३०वाजता पूजा सुरू होईल. आपण १०.२५ जॉईन व्हावे. युट्यूब आणि फेसबुक दोन्ही कडे एकाच वेळी लाईव्ह पूजा सांगितली जाईल . खाली लिंक आहे.
यूट्यूब लिंक किंवा चॅनेल धर्मपक्ष : https://www.youtube.com/channel/UC9ZybFxLpYE7mbbNQZ61bmQ
फेसबुक ची लिंक : https://www.facebook.com/pradip.joshi.391
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!