भाद्रपद गणेश चतुर्थीची (Ganesh Chaturthi 2025) अर्थात बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ आली. यंदा बुधवारी २७ ऑगस्ट रोजी बाप्पा आपल्या घरी पाहुणचार घ्यायला येणार आहेत. बाप्पाच्या येण्याची आणि घाईघाईने जाण्याची लगबग पाहिली की आपलेही चित्त विचलित होते. ते येण्याचा आनंद आहेच, पण दीड दिवसात, पाच दिवसात तर कोणाकडे दहा दिवसात पाहुणचार संपवून ते जातात. मात्र ते कायम स्वरूपी मुक्कामी असतात तेही आपल्या देहात. पण नक्की कुठे ते जाणून घेऊ समर्थ रामदास स्वामी यांच्या श्लोकातून.
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशस्मरण आणि नंतर शारदावंदन केले जाते. श्रीसमर्थांनी दासबोधात अनेक ठिकाणी गणेश आणि शारदा यांना अग्रक्रमाने आणि अनुक्रमानेही वंदन केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीसुद्धा ज्ञानोबारायांनी वाड्मयरूप ओंकारस्वरूप गणेशाला वंदन केल्यानंतर शारदेचे स्तवन केलेले आहे. तरीही ह्या श्लोकातील पहिल्या ओळीचा अर्थ लावतांना गणाधीश म्हणजे शिवगणाचा अधिपती किंवा सर्व इंद्रिये म्हणजे इंद्रिय गण ताब्यात ठेवणारा असा लावून या पहिल्या दोन ओळींतून काही गूढ अर्थ शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या लेखणीतून या श्लोकाचे गूढ जाणून घेऊ.
गणाधीश म्हणजे गणपती. हा गुणाधीशसुद्धा आहे आणि सर्व गुण अंगी असूनही तो साक्षात् निर्गुणाचा आरंभ आहे. आरंभही साधासुधा नाही तर मुळारंभ. योगशास्त्रात कुंडलिनीच्या प्रारंभी असलेले मूलाधार चक्र हे श्रीगजाननाचे वसतिस्थान आहे. 'त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं' असे अथर्वशीर्षात म्हटले आहेच. म्हणून समर्थांनी गणपतीला 'मुळारंभ' असे म्हटले आणि हा मुळारंभही कसा? तर तेथेच निर्गुणालाही प्रारंभ होत आहे. निर्गुण म्हणजे गुणरहित म्हणजेच परमात्मा !
'नमू शारदा मूळ चत्वार वाचा।' ह्यात 'परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी' ह्या चारही वाणी शारदेचे मूलस्वरूप मानल्या पाहिजेत. निर्गुण अशा गणेशाचे पहिल्या दोन ओळीत स्मरण केल्यानंतर पुढल्या ओळीत सर्व प्रकारच्या विविध प्रकट आणि अप्रकट उच्चारशक्तीचे अधिष्ठान असलेल्या शारदेला नमन करून श्रीसमर्थ गमूं पंथ आनंत या राघवाचा ।। असे म्हणतात. राघवाचा म्हणजे रामाचा म्हणजे रामभक्तीचा पंथ हा अनंत आहे, असे समर्थ सांगतात. रामायणात 'जोवरती ही पृथ्वी आहे, जोवरती सूर्य-चंद्र आहेत, तोवर म्हणजे अनंत काळपर्यंत श्रीरामकथा या भूतलावर दुमदुमत राहाणार आहे,' असे म्हटले आहे. 'गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥' इथे संदर्भ ह्या कथेचा आहे. शब्दांचा खेळ करण्याची फारशी आवड समर्थांना नाही. पण तरीही काही ठिकाणी ते मोठे समर्षक आणि मार्मिक शब्द वापरतात, त्याचेच एक उदाहरण म्हणून या पहिल्या श्लोकाकडे पाहिले पाहिजे.
त्यामुळे बाप्पाचे अस्तित्व कायम आपल्या बरोबर असते हे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रत्येक कृतीकडे बाप्पा लक्ष ठेवून आहे हेही लक्षात ठेवा!