दत्तदर्शनानंतर एकनाथ महाराजांची झालेली भावावस्था!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 5, 2020 17:44 IST2020-11-05T17:42:45+5:302020-11-05T17:44:08+5:30
ज्योत्स्ना गाडगीळ भगवंत पहावा, असे आपल्यालाही वाटते. परंतु, त्याला ओळखताही आले पाहिजे आणि ज्यांना तो दिसला, त्यांना ते विश्वरूप ...

दत्तदर्शनानंतर एकनाथ महाराजांची झालेली भावावस्था!
ज्योत्स्ना गाडगीळ
भगवंत पहावा, असे आपल्यालाही वाटते. परंतु, त्याला ओळखताही आले पाहिजे आणि ज्यांना तो दिसला, त्यांना ते विश्वरूप सहन झाले नाही. कृष्णावतारातले तीन प्रसंग या गोष्टीची जाणीव करून देतात. देवकी मातेला भगवान श्रीकृष्णांनी जन्मत:च विराट रूपात दर्शन दिले, ते पाहून देवकी माता म्हणाली, `हे रूप नको, मला बाल्यरूपात दर्शन दे!' कृष्णाच्या बाललिला वाढल्यावर यशोदा मातेने एकदा खोडकर कृष्णाला तोंड उघड सांगितले, तेव्हा झालेले विश्वदर्शन पाहून तीदेखील स्तिमित झाली. आणि महाभारताच्या प्रसंगी युद्धभूमीवर अर्जुनाला गीता सांगून झाल्यावर त्याने कृष्णाच्या विश्वरूपाची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सहस्र डोळे, सहस्र हात, सहस्र मुख असे रूप पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्याला पुन्हा मित्ररूपातला श्रीकृष्ण होऊन परत ये, असे म्हटले.
हेही वाचा : मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!
एकनाथ महारांच्या बाबतीतही तसेच घडले. जनार्दन स्वामींच्या मागे लागून त्यांनी दत्तदर्शनाची आस व्यक्त केली, तेव्हा दत्तगुरुंनी फकीराच्या रूपात दर्शन दिले. मात्र, नाथ महाराजांनी दत्तगुरुंना मूळरूपात दर्शन देण्याची विनंती केली, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांना नाथांनी पाहिले आणि त्यांना अद्भुत अनुभव आला. त्याचे वर्णन नाथांनी केले आहे.
स्वानंदे आवडी दत्त पाहु गेलो डोळा,
तव चराचर अवघे श्रीदत्तची लीला।
विस्मयो दाटला, आता पाहु मी कैसे?
देखता देखणे अवघे दत्तचि दिसे।
असे आणि नसे हा तव विकल्प जनात,
जनी जनार्दन निजरूप दत्त।
एका जनार्दनी तेथे अद्वय नित्य,
सबाह्य अभ्यंतरी दत्त नांदत।
स्वानंदाच्या आवडीने दत्ताला डोळ्याने पाहू गेलो, तेव्हा चराचर दत्ताचीच लीला आहे, हे उमगले. आश्चर्य वाटले. आता मी कसे पाहू? पाहणारा मी आणि ज्याला पाहायचे तो, दोघेही दत्त झालो. दत्त जनार्दनात नांदत आहे, दत्त चराचरात दिसत आहे. अद्वय नित्य असलेला जनार्दन जो दत्त तो आतबाहेर नांदत आहे, असे नाथ महाराज म्हणतात.
दत्तप्रभूंच्या चरणी नाथांनी साष्टांग दंडवत घातला. गुरु दत्तात्रेयाने नाथांना उठवून आलिंगन दिले. तेव्हा नाथांची स्थिती कशी झाली पहा-
दत्त देता आलिंगन, कैसे होता हे अभिन्न।
स्वलीला स्वरूपता, तिन्ही दावी अभिन्नता।
लाघवी श्रीदत्त, देवभक्त आपणची होत।
मीचि जनार्दन मीचि एका, दत्त स्वरूपी मीच मी देखा।
एका जनार्दनी दत्त पुढे मागे, सगुण निर्गुण रूपे लागला संगे।
दत्ताला आलिंगन दिले असता, भिन्न कसे होता येईल? दत्ताचे लाघव असे आहे, की तोच देवही होतो व भक्तही तोच होतो. मीच जनार्दन असून मीच एकनाथ असून दत्त स्वरूपाचे ठिकाणी एकरूप आहे. सगुण आणि निर्गुण रूपात तोच असून तोच मागे,पुढे आणि माझ्यातही सामावला आहे. कृष्णाला पाहिल्यावर गोरस विकणाऱ्या गोपी जशा `गोविंद घ्या, गोपाळ घ्या' म्हणू लागल्या, तसे दत्त दर्शन झालेले नाथ म्हणतात,
दत्त घ्यावा, दत्त गावा, दत्त आमुचा विसावा।
दत्त अंतर्बाह्य आहे, दत्तविण काही नोहे।
दत्त जनी, दत्त वनी, दत्तरूप हे अवनी।
दत्तरूपी लीन वृत्ती, एका जनार्दनी विश्रांती।
आम्ही दत्ताचेच ध्यान करावे, दत्ताचेच वर्णन करावे, कारण दत्त आमचे विश्रांती स्थान आहे. दत्तावाचून आम्हाला दुसरे काहीच नाही. तो सर्वत्र आहे. जनात, वनात, पृथ्वीवर तोच व्यापून राहिला आहे. जनार्दन दत्त स्वरूपी माझी वृत्ती लीन होऊन विश्रांती लाभली, असे नाथ महाराज म्हणतात.
हेही वाचा : प्रत्येक काम भगवंताचे समजून करा; पांडुरंगशास्त्री आठवलेंचा 'स्वाध्याय'