लोकांना दाखवण्यासाठी आनंदी राहू नका, स्वतःसाठी आनंदी राहायला शिका!- गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:13 PM2021-05-04T16:13:25+5:302021-05-04T16:14:08+5:30

भावनांचा निचरा होणे अतिशय गरजेचे असते, अन्यथा चुकीच्या ठिकाणी भावनांचा बांध फुटू शकतो.

Don't be happy to show people, learn to be happy for yourself! - Gaur Gopal Das | लोकांना दाखवण्यासाठी आनंदी राहू नका, स्वतःसाठी आनंदी राहायला शिका!- गौर गोपाल दास

लोकांना दाखवण्यासाठी आनंदी राहू नका, स्वतःसाठी आनंदी राहायला शिका!- गौर गोपाल दास

Next

प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहायला शिका, असे सांगितले जाते. परंतु दर वेळी सकारात्मकता ओढून ताणून आणता येत नाही. जेव्हा आयुष्यात काही अवघड प्रसंग येतात, जसे की घटस्फोट होणे, जवळच्या व्यक्तीचे निधन होणे, प्रेम भंग होणे, फसवणूक होणे अशा प्रसंगाला आपण सकारात्मक वळण कसे देणार? त्यातूनही सकारात्मकता शोधणे हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध वर्तन ठरेल. हे वर्तन फार काळ टिकणार नाही. त्याला आपण अवसान आणणे असे म्हणतो.  मनाला मोकळे व्हावेसे वाटते, रडावेसे वाटते, कोणालातरी आपले दुःख सांगावेसे वाटते. या गोष्टी खूप नैसर्गिक आहेत. या नकारात्मक अजिबात नाहीत. भावनांचा निचरा होणे अतिशय गरजेचे असते, अन्यथा चुकीच्या ठिकाणी भावनांचा बांध फुटू शकतो.

जीवनातील नकारात्मक घटना पचवण्याची ताकद म्हणजे सकारात्मकता. ती लोकांना दाखवण्याची गरज नसते. ती आतून मनाला उभारी देते. नकारात्मक प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद देते. अशा सकारात्मकतेची आपल्याला गरज आहे. 

दुर्दैवाने लोक सकारात्मकतेचा चुकीचा अर्थ काढतात. विशेषतः समाज माध्यमांवर सगळेच जण आमचे आयुष्य किती गुण्यागोविंदाने सुरू आहे असे दाखवतात. ते पाहून इतरांच्या मनात असूया निर्माण होते आणि नकारात्मकतेत भर पडते. परंतु, आपल्या आयुष्याची नकारात्मक बाजू कोणी जाहीरपणे मांडत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात सगळे काही छान सुरु आहे, या संभ्रमात आपण जगत राहतो आणि आपल्या नियतीला दोष देत राहतो. परंतु, बरे वाईट प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. कोणी त्यावर मात करून पुढे जातात तर कोणी तिथेच अडकून राहतात. 

सकारात्मकता आपल्या विचारांचा आणि जगण्याचा भाग झाली पाहिजे. परंतु, सकारात्मकतेचे मनाला ओझे वाटता कामा नये. ओढून ताणून आणलेला आनंद, उसने अवसान फार काळ टिकत नाही. खोटे मुखवटे गळून पडतात. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. विश्वासू व्यक्तीशी सुख दुःखाची देवाण घेवाण करा. अशी व्यक्ती आयुष्यात नसेल, तर मनातल्या गोष्टी कागदावर उतरवून मन मोकळे करा. मन मोकळे झाले तरच सकारात्मकतेचा शिरकाव होईल आणि तुम्ही जगासाठी नाही तर स्वतःसाठी आनंदी राहायला शिकाल!

Web Title: Don't be happy to show people, learn to be happy for yourself! - Gaur Gopal Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.