तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? ५ कामे करा, चमत्कार बघा; अशक्य शक्य होईल!

By देवेश फडके | Updated: May 28, 2025 10:14 IST2025-05-28T10:05:17+5:302025-05-28T10:14:11+5:30

Shree Swami Samarth Maharaj: लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही?

do you wish your seva puja will reach the shree swami samarth maharaj should do 5 things and see miracles swami makes the impossible will become possible | तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? ५ कामे करा, चमत्कार बघा; अशक्य शक्य होईल!

तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? ५ कामे करा, चमत्कार बघा; अशक्य शक्य होईल!

Shree Swami Samarth Maharaj: अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा, सेवा असंख्य भाविक करत असतात. नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे, दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो. अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्रांचे जप, तारक मंत्राचे पारायण करत असतात. आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा, असे वाटत असते. परंतु, हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते. या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात. या गोष्टींचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी, असे सांगितले जाते. 

मुळात स्वामींची सेवा करावी, हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते. आपले पूर्वसुकृत बळकट असावे लागते. तरच संत चरण लाभते. सेवा करायची आहे, एकदा का हा विचार मनात रुजला की, समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. स्वामी सेवा करताना सर्व प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत, मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे ही तर खरच कसोटी आहे. हम गया नही जिंदा हैं... याची प्रचिती क्षणोक्षणी आहे. कुणाचीही ओंजळ रिती राहणार नाही, इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेतच. परंतु, त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे. सक्षम व्हायला हवे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशाप्रकारे स्वामी सेवा, पूजा, भक्ती करावी. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया...

तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का?

- स्वामीसेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे. वाईट आचरण करणे, खोटेपणाने वागणे, या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत. अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत, असे म्हटले जाते. 

- आपले विचार नेहमी सकारात्मक असावे. काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात. असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत. ज्यांना स्वत:वर विश्वास नाही, त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे. चांगले तेच बोलावे. सकारात्मक विचार ठेवायला हवेत.

- स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. आपले नित्य कर्म करावे. कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी. एकदा संकल्प घेतला की, तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा. वेळेचे पालन अशावेळी काटेकोरपणे करावे. 

- दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे, दुसऱ्यांवर विनाकारण जळणे, इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असते. स्वाम या मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. मन चांगले ठेवा, स्वामी सदैव साथ देतील.

- स्वामींवर विश्वास असला की, अशक्यही शक्य होते. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात, असे म्हटले जाते. स्वामींविषयी तर तारकमंत्रातही हेच सांगितले आहे की, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसांत शक्य होत नाहीत. त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा. स्वामीसेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, असे सांगितले जाते.

‘हे’ही नेहमीच लक्षात असू द्या

- स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. 

- स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. 

- स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात, असे म्हटले जाते. 

- कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत, आपले कार्य त्यांना समर्पित करावे. स्वामी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा.

श्री स्वामी समर्थ

 

Web Title: do you wish your seva puja will reach the shree swami samarth maharaj should do 5 things and see miracles swami makes the impossible will become possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.