यंदा १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. त्यानिमित्त आपण विविध प्रकारे दत्त उपासना सुरू केली असेल. कोणी गुरुचरित्राचे पारायण करेल, तर कोणी दत्त बावनी म्हणेल. प्रत्येकाची उपासनेची पद्धत वेगळी. पण ही नैमित्तिक अर्थात उत्सवापुरती उपासना न करता कायमस्वरूपी दत्त कृपा व्हावी असे वाटत असेल तर दिलेले उपाय करा.
दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्त भक्ताचे स्वप्न असते. पण त्यासाठी दत्त गुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल. त्यासाठी एका दत्त भक्ताने सांगितलेले उपाय जरूर करून बघा.
आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा.
घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.
घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.
शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.
एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. सफाई कामगाराला बक्षिस दिले तर तो हात उंचावून आशिर्वाद देणार नाही, थँक यु म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंदलहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फिल्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच. म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे.
फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना, स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.