Datta Jayanti 2023: दत्त मंदिराला प्रदक्षिणा घालताना दत्त गुरुंची भेट होणे शक्य आहे का? ऐका 'हे' दत्तभजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 07:00 AM2023-12-25T07:00:00+5:302023-12-25T07:00:00+5:30

Datta Jayanti 2023: गायक आर. एन. पराडकर आणि दत्त भजन हे समानार्थी शब्द म्हणता येतील, दत्त जयंती निमित्त त्यांनी भजनातून दत्त प्रदक्षिणेचे महत्त्व सांगितले आहे ते पाहू. 

Datta Jayanti 2023: Is it possible to meet Datta Guru while circumambulating Datta Temple? Listen to this Datta Bhajan! | Datta Jayanti 2023: दत्त मंदिराला प्रदक्षिणा घालताना दत्त गुरुंची भेट होणे शक्य आहे का? ऐका 'हे' दत्तभजन!

Datta Jayanti 2023: दत्त मंदिराला प्रदक्षिणा घालताना दत्त गुरुंची भेट होणे शक्य आहे का? ऐका 'हे' दत्तभजन!

संत महंतांनंतर या महाराष्ट्राला दत्त भजनाची गोडी लावली, ती आर. एन. पराडकर यांच्या गोड आवाजानी. त्यांच्या असंख्य प्रचलित भजनांपैकी एक भजन म्हणजे, दत्त गुरूंची प्रदक्षिणा-

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची,  झाली त्वरा सूरवरा विमान उतरायाची।।  
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी, अनुभवी ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।। 
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशि, सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करुनी काशी ।। 
मृदुंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती,  नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती ।।   
कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत,  लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।।   
प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला,  श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||

दत्तजयंतीला आमचे मंदिरात दरवर्षी एक भक्त खड्या आवाजात दत्त जन्म,  आरती, कीर्तन, पुष्पांजली झाली की ही “प्रदक्षिणा” म्हणत असे. लहानपणापासून  ऐकल्यामुळे ती गोडीच लागली. आणि आजही ती कायम आहे. तो जो प्रसंग असेल तो डोळ्यासमोर उभा राहतो. आणि “भक्त आनंदाचे डोही आनंद तरंग” होतो. खरेच हा सोहळा पाहायला सूरवरांची विमाने घिरट्या घालत असतील परंतु येथील प्रचंड गर्दीत त्यांना धावपट्टीच मिळत नसेल (लॅंडींग करायला) उतरायला. 

आजपर्यंत अनेक आले आणि गेले. पण त्यांना गुरु उमगले नाहीत. म्हणून तर “नेती नेती शब्द, न ये अनुमाना” “ चारी (ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद) श्रमले परंतु न बोलवे काही, साही (षटशास्त्रे) विवाद करिता पडले प्रवाही” “अभाग्यासी कैसी न कळे ही मात” “पराही परतली कैसा हा हेत” वाणीचे चारही प्रकार (परा, पश्यन्ति,  मध्यमा,  वैखरी) गुरूंचे वर्णन करतांना थकले तेथे आपले अस्तित्व ते काय? ज्यांना उमगले ते मात्र “गुरुपदीचे रहिवासी” झाले. ते सांगायला जागेवर आहेत कोठे? “दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन” दत्तस्वरूप झाले आहेत. 

प्रदक्षिणा हा षोडशोपचारातील एक संस्कार आहे. स्वत:भोवती किंवा जमल्यास देवळाभोवती, मूर्तीभोवती, गाभाऱ्याभोवती उजवीकडून डावीकडे स्वतः जाऊन जशी देवालाच प्रदक्षिणा घालत आहोत असा विचार करणे व कृती करणे. ईश्वर सगळीकडे भरला आहे, मग त्याला दाही दिशांनाही नको का पाहायला, “डोळ्यान पाहीन रूप तुझे” साठवून ठेवीन माझ्या हृदयात कायमचा. ओझरते का होईना दर्शन व्हायलाच हवे. कारण आजकाल सगळीकडे गर्दिच गर्दी, त्यात ते लाइन लावणे, वशिला, ओळख पाळख, पैसे देऊन, देणगी देऊन, लाइन तोडून दर्शन घ्यायचे किती दुष्कर, आणि शेवटाला मूर्तीच्या जवळ आलो की तेथील व्यवस्थापक आपले डोके आपटणार आणि “उभा क्षणभरी” काय दर्शन घेणार. म्हणून प्रदक्षिणा. 

ज्याअर्थी आपण त्याला सगळीकडे व सर्व बाजूने बघत आहोत, म्हणजे तो सुद्धा आपल्या भक्तांना बघत असेलच ना!! “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” 

नामदेवांचे मधुर कीर्तन ऐकतांना विठ्ठलाला राहवले नाही, त्याला मंदिरात कीर्तन करायला बंदी केल्यावर, साक्षात मंदिरानेच प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठलाला नामदेवांचे म्हणजे आपल्या भक्ताचे दर्शन घडले. 

आता कळले का प्रदक्षिणेचे महत्व? कोणी भेटले नाही की आपण म्हणतो ना तोपर्यंत जवळच एक राऊंड मारून येतो, ना तसे. तो एक क्षण पकडायचा असतो विलक्षण. चला पकडू या तर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 

Web Title: Datta Jayanti 2023: Is it possible to meet Datta Guru while circumambulating Datta Temple? Listen to this Datta Bhajan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.