Ram Mandir Ayodhya: जगातील सर्वांत मोठ्या स्वरुपाचा धार्मिक सोहळा असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. या दिवशी सुमारे १.४४ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. तर १३ जानेवारी २०२५ पासून ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६६.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. हर हर महादेवच्या जयघोषाने महाकुंभ मेळ्याचा परिसर निनादला होता. अखेरच्या दिवशी पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे प्रयागराजमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभमेळ्याची सुरुवात झाल्यापासूनच अयोध्येत भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षी भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत. परंतु, महाकुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे राम मंदिराचे व्यवस्थापनही गडबडले. राम मंदिर व्यवस्थापनावरही मोठा ताण आला. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासन, राम मंदिर ट्रस्ट यांनी अनेक बदल केले.
४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन
१४ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अयोध्येत येऊन तब्बल १.२६ कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. अयोध्येत येणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. अयोध्येत भाविकांचा जनसागर लोटला आहे. ही गर्दी आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. तसेच या महाकुंभमेळ्याच्या कालावधीत राम मंदिरही १९ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. रामललाच्या चरणी दररोज सुमारे ३.५ ते ४ लाख भाविक नतमस्तक होत आहेत. यामुळे रामललाची दिनचर्या पूर्णपणे बदलून गेल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून १३ जानेवारी रोजी १.७० कोटी, १४ जानेवारी रोजी ३.५० कोटी, २९ जानेवारी रोजी ७.६४ कोटी, ३ फेब्रुवारी रोजी २.५७ कोटी, १२ फेब्रुवारी रोजी २ कोटी आणि २६ फेब्रुवारी रोजी १.४४ कोटी भाविकांनी हजेरी लावली. या दिवशी विक्रमी संख्येने भाविक महाकुंभमेळ्यात आले होते.