Shani Sade Sati 2025: सन २०२५ची सुरुवात झाली आहे. २०२५ हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. यावर्षी नवग्रहांपैकी चार महत्त्वाचे आणि अधिक प्रभावकारी ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. याचा केवळ राशी, मूलांक यावर नाही, तर देश-दुनियेवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जाते आहे. यंदाच्या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन राशींना मोठा दिलासा मिळणार आहे. यातील एका राशीची साडेसाती संपणार असून, दोन राशींवरील शनिचा ढिय्या प्रभाव संपुष्टात येणार आहे. परंतु, याच वेळी एका राशीची साडेसाती सुरू होणार असून, दोन राशींवर ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे.
सन २०२५चा मार्च ते मे हा कालावधी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या कालावधीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर धनु आणि मीन राशीचा स्वामी असलेला नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे गुरु अतिचारी गतीने यावर्षी गोचर करणार आहे. तर छाया, क्रूर ग्रह मानले गेलेले राहु आणि केतु विद्यमान मीन आणि कन्या राशीतून अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत वक्री गतीने प्रवेश करणार आहे.
शनि अडीच वर्ष मीन राशीत असणार
नवग्रहांमध्ये शनि हा मंदगतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनिने मीन राशीत प्रवेश केला की, पुढील अडीच वर्ष याच राशीत असणार आहे. शनिच्या मीन राशीतील प्रवेशानंतर या राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे विद्यमान घडीला राहु ग्रह मीन राशीत आहे. मे महिन्यात राहु कुंभ राशीत वक्री गतीने प्रवेश करणार आहे. त्यामुळे या कालावधीत शनि आणि राहुची युती मीन राशीत होणार आहे. याचा मोठा प्रभाव दिसू शकणार आहे.
कोणत्या राशींना ढिय्या आणि साडेसातीतून मुक्तता मिळेल?
शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तसेच कर्क आणि वृश्चिक या राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू होता. शनिने मीन राशीत प्रवेश केल्यावर कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव संपुष्टात होणार आहे. कर्क आणि वृश्चिक राशीसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.